Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेस नेते पी चिदंबरम
यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयानं लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं
अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय -ईडी आणि केंद्रीय गुन्ह अन्वेषण
विभाग - सीबीआयनं चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी काल सायंकाळपासून त्यांचा शोध घेत
आहेत. मात्र त्यांचा काहीही ठावठिकाणा लागत नसल्याने, लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सीबीआयने काल रात्री चिदंबरम यांच्या घरावर, दोन तासात
हजर होण्याची नोटीस चिकटवली होती. मात्र या मुदतीत चिदंबरम सीबीआयसमोर हजर झाले नाहीत.
आज सकाळीही सीबीआयने चिदंबरम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले
नाहीत.
दरम्यान, दिल्ली उच्च
न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्याच्या निर्णयावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं
तुर्तास नकार दिला आहे. चिदंबरम यांची ही याचिका आज न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा यांच्या
पीठासमोर सादर झाली असता, न्यायमूर्ती रमण्णा यांनी ही याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई
यांच्या पीठासमोर सादर करण्याचे निर्देश चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांना दिले.
या प्रकरणी दाखल याचिकेत चिदंबरम यांनी, ही कारवाई राजकीय हेतुनं प्रेरित असल्याचं
म्हटलं असून, आयएनएक्स मीडिया घोटाळ्याचे सूत्रधार असल्याच्या आरोपाचा इन्कार केला
आहे.
दरम्यान, सध्याच्या सरकारचे
अपयश निर्भीडपणे जनतेसमोर मांडत असल्यामुळे चिदंबरम यांच्यावर सरकार सूड उगवत असल्याचं,
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून केंद्र
सरकारवर टीका करताना, प्रियंका गांधी यांनी, चिदंबरम सांगत असलेलं सत्य, भित्र्या लोकांसाठी
गैरसोयीचं असल्यानं, ही कारवाई केली जात असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयानंही
सिक्स्टी थ्री मून्स टेक्नोलॉजी कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात
चिदंबरम यांना येत्या १५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.
****
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री
बाबुलाल गौर यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते एकोणनव्वद वर्षांचे होते. रक्तदाब कमी
झाल्याच्या तक्रारीनंतर गेल्या सात ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. विधानसभेवर दहा वेळा निवडून गेलेले बाबुलाल गौर
२००४ ते २००५ दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
छोट्या उपग्रहांसाठी
येत्या डिसेंबरपर्यंत प्रक्षेपक यान सुरु करण्याचं उद्दीष्ट असल्याचं भारतीय अंतराळ
संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथं आकाशवाणीला दिलेल्या
विशेष मुलाखतीत सिवन यांनी, पाचशे किलोग्राम वजन असलेले छोटे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत
स्थापित करण्याच्या उद्देशानं या नवीन प्रक्षेपक यानाची रचना करण्यात आल्याची माहिती
दिली. यामुळे कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात छोट्या उपग्रहांचा व्यावसायिक वापर करता
येऊ शकेल. बोलत होते.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांच्या प्रवासाबाबत प्रवाशांना वेळच्या वेळी माहिती मिळावी
यासाठी ट्रॅकिंग यंत्रणा, सुरु करण्यात आली आहे. एसटीच्या ताफ्यात १८ हजार गाड्या असून
या सर्व गाड्यांमधे जीपीएस यंत्र बसवली जाणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी
या यंत्रणेचं उद्घाटन केलं. सध्या मुंबई-नाशिक मार्गावरच्या सर्व शिवनेरी गाड्यांमधे
ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. सर्व गाड्यांमधे ही यंत्रणा बसवण्यासाठी ३२ कोटी
रुपये खर्च येणार आहे, असं रावते यांनी सांगितलं.
****
येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी
मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असुन कोण कोणत्या पक्षात आहे हे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच
कळणार असल्याचं राष्टवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं
आहे.पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे आज यवतमाळ मध्ये आगमन झाल्यानंतर ते पत्रकारांशी
बोलत होते.
****
राज्य सरकारच्या गोपीनाथ
मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आता शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचाही
समावेश करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शेती व्यवसाय
करताना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा
अपंगत्व ओढवल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. यामुळे
या योजनेस आता व्यापक व सर्वसमावेशक स्वरुप लाभले आहे. या योजनेच्या निकषानुसार शासनाने
नियुक्त केलेली विमा कंपनी 2 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास नुकसान भरपाई देते.
****
जपानमधे टोकियो इथं सुरु
असलेल्या ऑलिम्पिक पूर्वतयारी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना न्युझिलंडसोबत
होणार आहे. रात्री साडेआठ वाजता सामना सुरु होईल.
*****
***
No comments:
Post a Comment