Thursday, 29 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचं काम वेगात  सुरू असून, कामाची गती अशीच राहिल्यास डिसेंबर २०२० पर्यंत या महामार्गावरून प्रवास करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त जालना इथं आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. ते म्हणाले...

 समृध्दी महामार्ग याचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे, कदाचित डिसेंबर २०२० सालापर्यंत त्या महामार्गावरून प्रवास करता येईल, इतक्या वेगाने हे काम चालेलं आहे. आणि याच्या मुळे जालन्याला आणि औरंगाबादला देखील चटाई लोकेशन तयार होणार आहे. आणि डि.एम.आय.सी. जो आहे, त्याच्या करता खूप मोठ वरदान याठिकाणी समृध्दी महामार्ग आणि ड्राययपोर्ट हे ठरवणार आहे. आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक हि आपण करतो आहे.

 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन, दुष्काळ निवारण योजनांचा आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शासन सूक्ष्म सिंचन योजने अंतर्गत ८० टक्के अनुदान देत असून, दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करून उसाचं पीक घ्यावं, त्याचवेळी पर्यायी पिकांचांही प्राधान्यानं विचार करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
****

 राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत फिट इंडिया मुव्हमेंटला प्रारंभ केला. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचं वितरण होणार आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलिट दिपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेडाळु रविंद्र जडेजा, फुटबॉलर गुरुप्रीत सिंग सिंधू, हॉकीपटू चिंगलेनसना कांगुजम, यांना अर्जून पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. भारतीय पोलीस सेवेतल्या अपर्णा कुमार यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी ‘तेन्सींग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 देऊन गौरवण्यात येणार आहे.
****

 काश्मीर मुद्यावर हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला काहीही अधिकार नसल्याचं, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ते आज लड्डाखमध्ये लेह इथं सव्वीसाव्या किसान जवान प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांवर होत असलेले अत्याचार आणि मानवी हक्क उल्लंघनाचे प्रकार थांबवण्यावर पाकिस्तान सरकारनं लक्ष द्यावं, असं राजनाथसिंह म्हणाले.

 दरम्यान, पाकिस्ताननं गजनवी या कमी अंतराच्या क्षेपणास्त्राचं आज परीक्षण केलं. दोनशे नव्वद किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचं परीक्षण, यशस्वी झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
 ****

 उत्तम प्रशासन आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती या दोन बाबी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं, माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. वस्तू आणि सेवा करामुळे करप्रणाली अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी पायाभूत सुविधा आणि कृषीविकासाची गरजही त्यांनी नमूद केली. पुढच्या पाच वर्षांत भारत ही पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****

 राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकानं आज पुण्यात आढावा बैठक घेतली. यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी या पथकाला जीवित तसंच आर्थिक नुकसानाची माहिती दिली.

दरम्यान, हे पथक उद्या सांगली शहर आणि सांगलीवाडी तर परवा म्हणजेच ३१ ऑगस्टला ब्रम्हनाळ, भिलवाडी, बुर्ली, शिरगाव आणि वाळवा या गावांना भेटी देणार आहे. त्यानंतर हे पथक राज्यसरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
*****
***

No comments: