Friday, 30 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३०  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येईल.
****
केरळची भूमी आपल्यासाठी विशेष असून केरळच्या धरती आणि संस्कृतीला प्रणाम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज कोची इथं मनोरमा वृत्त वाहिनीच्या संमेलनात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.

दरम्यान, योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या योग अभ्यासक आणि प्रशिक्षकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली इथं योग पुरस्कार देऊऩ गौरव करणार आहेत. २०१६ मधे चंदीगड इथं दुसरा अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतांना मोदी यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. आयुष प्रणालीचे प्रमुख चिकित्सक आणि विशेषज्ञांच्या उपस्थितीत १२ स्मृती टपाल टिकीटांचं लोकार्पण मोदी आज करणार आहेत.
****
आमदार अवधूत तटकरे हे आपला निर्णय घ्यायला समर्थ असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांच्या खासदारकीला काल शंभर दिवस पूर्ण या पार्श्वभूमीवर ते काल पत्रकारांशी बोलत होते. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे, पुतणे आमदार अवधूत तटकरे तसंच भास्कर जाधव यांनी नुकतीच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली, त्यासंदर्भात तटकरे बोलत होते.
****
मुंबईमध्ये सामहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळ जालना इथल्या तरूणीच्या मृत्यूप्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करावा आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.
****
बैलपोळा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. यासाठी काल सायंकाळी हळद दुधानं बैलांची खांदेमळणी करण्यात आली. आज बैलाला विविध आभुषणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या निमित्तानं पुरण पोळीचं खास जेवण बैलांना खाऊ घातलं जातं.
****


No comments: