Saturday, 31 August 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. आज उस्मानाबाद इथं, परिवार संवाद या कार्यक्रमात जगजीतसिंह पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले....
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्या हक्काचं पाणी आणलं. युवकांना न्याय देण्यासाठी इथं उद्योग आणून रोजगार उपलब्ध करून देणं, आणि हे सर्व आपल्याला करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचंय, अडीअडचणी दूर करायच्यात. आपलं सामर्थ्य वाढवायचंय. आणि हे करण्यासाठी आपण सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू.
माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातून पाटील यांचे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा उद्या उस्मानाबाद इथं पोहोचते आहे.
****
राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्ष तुरुंगवास आणि शंभर कोटी रुपये दंड तसंच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धुळे विशेष न्यायालयानं या प्रकरणात आज सर्व ४८ आरोपींना शिक्षा सुनावली. या सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी रसायन कारखाना स्फोटातल्या मृतांची संख्या तेरा झाली आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला. यामध्ये सुमारे ५८ जण जखमी झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली. जखमींमध्ये सहा लहान बालकांचाही समावेश आहे. पंधरा गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळाची पाहणी करून, जखमींची चौकशी केली.
दरम्यान, या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत शासनानं जाहीर केली आहे. जखमींचा उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
****
सत्ता असो किंवा नसो शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला पाहिजे, ही आमची भूमिका असून त्यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज जालन्यात दोन दिवसीय महारेशीम महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते. रेशीम कोष उत्पादनात जालना जिल्ह्यानं मोठी प्रगती केली असून, देशाच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन जिल्ह्यात होत असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात एक लाख रुपयांपर्यंत माल वाहतुकीवर “ई-वे” बिल आवश्यक नाही, असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही किंमतीचा कापूस, सूत, कापड, वस्त्र यासारखा माल राज्यांतर्गत ५० किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवला, तर तो “ई-वे” बिलामधून वगळण्यात आला असल्याचं,  मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
मराठवाडा विकास मंडळाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं, ‘मानव विकास निर्देशांक’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आलं. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, माजी सनदी अधिकारी भास्कर मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या जिल्ह्यातल्या तीस तालुक्यांमधला मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात वाई गोरखनाथ इथं आज महापोळा साजरा झाला. मराठवाड्यासह विदर्भातूनही आलेल्या शेकडो बैलजोड्यांनी गोरखनाथाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली.
****
दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांत काल रात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
परभणी जिल्ह्यातही अनेक भागात आज दुपारी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद तसंच जालना शहर परिसरातही आज पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या.
****

No comments: