Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
अघोषित
प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळा आणि
तुकड्या तसंच घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान मंजुरीचा
निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. शिक्षण मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. यापूर्वी २० टक्के अनुदान
मंजूर असलेल्या शाळा तसंच तुकड्यांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं
आज घेतला.
मुख्यमंत्री
सौरकृषी पंप योजनेचा दुसरा तसंच तिसरा टप्पा राज्यात राबवण्यासही मंत्रिमंडळाने आज
मान्यता दिली. या योजनेच्या अंमलबजावणीत ७५ हजार कृषी पंप बसवण्यात येणार असून त्यासाठी
एक हजार ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. योजना
प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून १८ महिन्यात ती राबवण्यात येणार आहे. या दोन्ही टप्प्यात
शेतकऱ्यांना तीन, पाच, तसंच साडे सात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप देण्यात येणार
आहेत.
शासकीय
वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातल्या आंतरवासितांचं
विद्यावेतन सहा हजार रुपयांवरून अकरा हजार रुपये करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
यासह
ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ, दारुचा अवैध साठा तसंच विक्री
प्रकरणी शिक्षेत वाढ करण्यासाठी दारुबंदी अधिनियमात सुधारणा, कवयित्री बहिणाबाई उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राची स्थापना,
विघटनशील अर्थात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन
अनुदान, अशा अनेक निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.
****
वॉटर
ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या कामासाठी चार हजार कोटी रूपयांची
निविदा आज प्रसिध्द झाली असून पुढच्या चार महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात
होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज महाजनादेश यात्रेतून
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं जनतेशी बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संस्थाकडून
२३ लाख ६१ हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले. सिल्लोड इथंही मुख्यमंत्र्यांनी
जनतेशी संवाद साधला. माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा
धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. सिल्लोडहून ही यात्रा जालना जिल्ह्यात भोकरदनकडे
रवाना झाली. आज सायंकाळी जालना शहरातही मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे.
****
युवासेना
प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं यवतमाळ इथं आगमन झालं, आदित्य ठाकरे
यांनी तूर तसंच सोयाबीन या शेतमालाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. येलगुंडा
गावात ठाकरे यांनी मेंढपाळ धनगर बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. वनमंत्र्यांशी चर्चा
करून चराईसंदर्भात नव्याने कायदा करण्याची भूमिका मांडू असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी
दिलं. बंजारा तसंच कोलाम आदिवासी बांधवांशी त्यांनी संवाद साधला.
****
मध्य
रेल्वेनं आज सोलापूर तसंच पुणे मंडळांतर्गत खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत लातूरचे
खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी, लातुर मुंबई नवीन रेल्वे, त्री साप्ताहिक हैदराबाद-पुणे
रेल्वे नियमित करणे, लातूर इथं मंजूर पिटलाईनचे काम, कुर्डुवाडी-लातूररोड मार्गाचं
दुहेरीकरण तसंच विद्युतीकरण, आदींसह एकूण ३० विविध मागण्या मांडल्या. रेल्वे प्रशासन
या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं, मंडळाकडून सांगण्यात आलं.
****
मुद्रा
बँक योजनेतंर्गत हिंगोली जिल्ह्यात सर्व बँकांनी पात्र लाभार्थ्यांना तत्काळ कर्ज मंजूर
करुन या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत. ते आज हिंगोली इथं या संदर्भात झालेल्या
बैठकीत बोलत होते.
****
सरकारी
धोरणांमुळे सध्या क्रीडा विश्वाला आश्वासक दिवस आल्याचं विश्व विजेती बॅडमिंटनपटू पी,व्ही.
सिंधू नं म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सिंधूने प्रत्येक शाळेने
क्रीडांगण विकसित करून तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं
नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment