आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ सप्टेंबर
२०१९ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक
इथं समारोप होत आहे, या निमित्तानं नाशिक इथं होत असलेल्या जाहीर सभेला पंतप्रधान उपस्थित
राहतील.
****
राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी
तारखा ठरवताना महत्त्वाचे सण, सुरक्षा व्यवस्थेसाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि इतर
महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊ, असं आश्वासन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी
दिलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत
होते. या निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येईल,
असं अरोरा यांनी सांगितलं.
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी
काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी, २० सप्टेंबरपर्यंत जाहीर करू अशी माहिती, महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. उमेदवारांची यादी निश्चित
करण्यासाठी पक्षाच्या छाननी समितीची बैठक नवी दिल्लीत काल झाली. त्यानंतर थोरात यांनी
बातमीदारांना ही माहिती दिली.
****
राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीला स्वच्छ भारत ही आदरांजली ठरावी यादृष्टीनं वर्धा जिल्ह्यातल्या
सेवाग्राम इथं स्वच्छ भारत विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीनं उच्च आणि तंत्र शिक्षण
मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये
ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त निपुण
विनायक, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा समावेश आहे. ही
समिती स्वच्छ भारत विद्यापीठासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालयं याबरोबरच
या विद्यापीठाचा अभ्यासक्रम, मनुष्यबळ यांचा अभ्यास करुन दोन महिन्यांमध्ये अहवाल सादर
करणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment