Wednesday, 1 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 01.01.2020 TIME - 07.10 AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** दोन हजार वीस या नववर्षाला जल्लोषात प्रारंभ; आतिषबाजी आणि मेजवान्यांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत 
** एकशे दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  
** मावळते लष्करप्रमुख बिपीन रावत देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष; तर जनरल मनोज नरवणे नवे लष्कर प्रमुख
आणि
** औरंगाबाद तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांवर शिवसेनेचं वर्चस्व
****
दोन हजार वीस या नववर्षाला आज जल्लोषात प्रारंभ झाला. देशभरात मध्यरात्री बारा वाजता हर्षोल्हासात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. मध्यरात्री औरंगाबादसह सर्वच मोठ्या शहरांचे रस्ते तरुणाईनं फुलून गेले होते. अनेक ठिकाणी आतिषबाजी करून तसंच मेजवान्यांच्या आयोजनातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचं जावो, तसंच आपलं राज्य आणि आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर राहो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळे आनंदानं आणि उत्साहानं करू या, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १०२ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं काल उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेनुसार येत्या पाच वर्षांत ही कामं करण्यात येणार असल्याचं, सीतारामन यांनी या उद्घाटनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. २०१९ ते २०२५ करिता नॅशनल इंफ्रास्ट्रक्चर पाइपलाइन एनआयपी साठी गठीत केलेल्या कृती-दलाचा अहवाल सीतारामन यांच्या हस्ते यावेळी प्रकाशित करण्यात आला. या परियोजनेमध्ये ऊर्जा, रेल्वे, नागरी सुविधा, सिंचन, शिक्षण, आणि आरोग्य आदी पायाभूत क्षेत्रात काम केलं जाणार आहे.
****
मावळते लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष म्हणून काल कार्यभार स्वीकारला. लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये समन्वय राखणं आणि सैन्यदलाशी संबंधित सर्व बाबींमध्ये सरकारचा सल्लागार म्हणून काम करणं, या त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या असतील. संरक्षण मंत्रालय नव्यानं निर्माण करत असलेल्या संरक्षण व्यवहार विभागाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पहातील.
दरम्यान, जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी काल देशाचे अट्ठाविसावे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. मावळते लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाची सूत्रं स्वीकारली. सदोतीस वर्षांच्या सेवेत नरवणे यांनी जम्मू काश्मीर तसंच पूर्वोत्तर भारतातल्या सुरक्षा सेवेसह इतर अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. आकाशवाणीच्या माजी वृत्तनिवेदक दिवंगत सुधा नरवणे यांचे ते पुत्र आहेत.
****
ऐतिहासिक कोरेगाव भीमा लढाईच्या दोनशे दोनाव्या वर्धापन दिनानिमित्त, आज पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं दहा हजारांहून जास्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. २०१८मध्ये या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं. सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह साहित्य टाकणाऱ्यांवर याआधीच कारवाई सुरू केली असून, कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोहोचेल, असे संदेश कोणीही टाकू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.
****
गडचिरोली इथं नक्षलवाद्यांच्या विविध दलममध्ये कार्यरत पाच जहाल नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं, त्यात तीन महिला आणि दोन पुरुष नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर सुमारे २७ लाख  रुपयांचं बक्षीस होतं.
****
रेल्वेनं प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय काल जाहीर केला. या भाडेवाढीनुसार, द्वितीय श्रेणी, शयनयान आणि प्रथम श्रेणीसाठी प्रति किलोमीटर एक पैसा अशी भाडे वाढ करण्यात आली आहे. तर मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी द्वितीय श्रेणी, शयनयान आणि प्रथम श्रेणीसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर वातानुकुलित श्रेणीसाठी एसी चेअर कार, एसी-३ टायर, एसी-२ टायर आणि एसी प्रथम श्रेणीसाठी प्रति किलोमीटर चार पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आजपासून लागू झाली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली आहे. महापालिकेत काल झालेल्या निवडणुकीत जंजाळ यांना एक्कावन्न, भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिलेले उमेदवार गोकुळ मुळके यांना चौतीस तर एम आय एमचे शेख जफर अख्तर यांना तेरा मतं मिळाली. दरम्यान, या निवडणुकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एम आय एम पक्षाच्या सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती या पक्षाचे गटनेते गंगाधर ढगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
****
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती पदासाठी काल निवडणूक घेण्यात आली. दोन्ही जिल्ह्यातल्या सभापतीपदांवर शिवसेनेनं वर्चस्व मिळवलं आहे. औरंगाबाद इथं नऊ सभापती पदांपैकी पाच शिवसेनेनं, दोन भारतीय जनता पक्षानं तर काँग्रेस आणि रायभान जाधव विकास आघाडीनं प्रत्येकी एक सभापती पद मिळवलं.

पैठण इथं शिवसेनेचे अशोक भवर, वैजापूर इथं शिवसेनेच्या सिना मिसाळ, गंगापूर इथं शिवसेनेच्या सविता केरे, सिल्लोड इथं शिवसेनेच्या कल्पना जामकर, तर सोयगाव पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या रस्तुलबी पठाण विजयी झाल्या. 

फुलंब्री इथं भाजपच्या सविता फुके, तर खुलताबाद इथं भाजपचे गणेश अधाने निवडून आले.

औरंगाबाद इथं काँग्रेसच्या छाया घागरे, तर कन्नड पंचायत समितीच्या सभापती पदी रायभान जाधव विकास आघाडीचे आप्पाराव घुगे यांची निवड झाली आहे.
दरम्यान, औरंगाबादच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी येत्या तीन जानेवारीला निवडणूक होणार आहे. हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ पंचायत समित्यांपैकी शिवसेनेनं चार, तर भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी दोन पंचायत समित्यांची सभापतीपदं जिंकली. कळंब पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या संगीता माने, भूम - शिवसेनेच्या अनुजा दैन, परंडा - शिवसेनेच्या मैना भडके, तर वाशी पंचायत समितीच्या सभापती पदावर शिवसेनेच्या रूपाली घोलप निवडून आल्या.

उस्मानाबाद इथं भाजपच्या हेमलता चांदणे, तुळजापूर - भाजपच्या विमल मुळे, लोहारा -  काँग्रेसच्या हेमलता रणखांब तर उमरगा पंचायत समितीच्या सभापतिपदी महाविकास आघाडीचे सचिन पाटील यांची निवड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, उस्मानाबाद नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अभय इंगळे विजयी झाले.
****
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप आघाडीचे अनिरुद्ध कांबळे यांची आणि उपाध्यक्षपदी भाजप आघाडीचेच दिलीप चव्हाण यांची निवड झाली.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले पाटील आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली.
****
अखिल भारतीय विद्यार्थी महासंघातर्फे काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विशेष अधिवेशन घेण्यात आलं. विद्यापीठातल्या अनेक प्रश्नांबाबत या अधिवेशनात चर्चा करण्यात आली. यावेळी महासंघाचे विद्यापीठ अध्यक्ष म्हणून विश्वदीप खोसे यांची तर सचिव म्हणून संदीप घुमरे यांची निवड करण्यात आली.
****
देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न फक्त चिंतेचा नसून तो चिंतनाचा असल्याचं मत, लातूर जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या उमा व्यास यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं काल माहिती जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं महिला सुरक्षा या विषयावर झालेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
****
परभणी इथं काल पत्रकारांसाठी महिला सुरक्षा विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक रुपाली कांबळे यांनी, महिलांना मदत करण्यासाठी कार्यरत असलेल्या समित्यांबद्दल माहिती दिली.
****
दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार काल जाहीर झाले. समाजरत्न पुरस्कार लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या कुशावर्ता बेळे यांना, शिक्षणरत्न पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातले सुधीर खाडे यांना, जनजागरण रत्न पुरस्कार लातूरचे जयप्रकाश दगडे यांना जाहीर झाला. याशिवाय कृषीरत्न, आरोग्यरत्न, क्रीडारत्न, बचतगट रत्न, ग्रामरत्न आणि अध्यात्मरत्न पुरस्कारही जाहीर करण्यात आले. आळंदीचं विश्वशांती केंद्र, पुण्याच्या माईर्स एमआयटी शिक्षण संस्था आणि भारत अस्मिता फाउंडेशन यांच्या वतीनं हे पुरस्कार दिले जातात.
****
हिंगोली जिल्ह्यात काही भागात काल सकाळी पावसानं हजेरी लावली. औंढा नागनाथ परिसरात सकाळी सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. कळंबोली भागात पावसाच्या हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यातही काही भागात काल पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात काही भागात गारपीट झाल्याचं वृत्त आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
****
जालना इथं पन्नास लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या एका व्यापाऱ्याची पोलिसांनी सुटका केली. व्यापारी खेराजभाई भानुशाली परवा रात्री दुचाकीवरून घरी जात असताना काही संशयितांनी त्यांचं अपहरण केलं होतं. स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष कृती दलाच्या पथकानं अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी सापळा लावला होता.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 August 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छ...