Saturday, 4 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.01.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****



 रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं  रेल्वेनं १३९ या एकाच क्रमांकात एकत्रीकरण  केलं आहे. सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या जागी १३९ हा नवा क्रमांक कार्यरत होईल. प्रवासादरम्यान प्रवाशांच्या   कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील. या क्रमांकावर १२ भाषातून माहिती उपलब्धअसेल.

****



 केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी ८ जानेवारीला  पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेना  सहभागी होणार आहे अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक  यावेळी उपस्थित होते. देशात उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे   शिवसेना कामगारांच्या पाठिशी असून हा संप यशस्वी ठरेल असं राऊत म्हणाले.

****



 राज्यात थंडीचा कडाका वाढला असून आज सकाळी बहुतांश ठिकाणी धुकं पडलं होतं वाशिम जिल्हा आणि परिसरात सकाळी आठ वाजेपर्यंत धुक दाटलं होतं. हिंगोली शहर आणि परिसरातही सकाळी दाट धुके पसरले होते. या धुक्यामुळे गहू, हरभरा, हळद, तूर आदी पिकांचं  मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात असल्याचं आमच्या वार्तहरानं कळवलं आहे.

 जालना  जिल्ह्यातही  आज सर्वत्र ढगाळ वातावरण असून पहाटे सर्वत्र दाट धुके होते.  अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात थंडी पडली असून धुकं पसरलं आहे. नाशिक शहर आणि  परिसरात थंडी कायम असून आज अकरा पूर्णांक सहा दशांश सेल्सियस एवढं तापमान नोंदलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 आज जागतिक ब्रेल दिवस. ब्रेल लिपीचे जनक लुइ ब्रेल यांच्या  जयंतीनिमित्त गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ पासून ४ जानेवारी हा दिवस अधिकृतपणे ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. अंध आणि दृष्टिबाधित लोकांना मानवाधिकार प्रदान करणं आणि संवादाच्या क्षेत्रात ब्रेल लिपी विषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं आजचा दिवस विशेष कार्यक्रमांनी साजरा केला जातो.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...