Thursday, 2 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 02.01.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

मराठवाड्यात आज अनेक भागात पाऊस झाला. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा नांदापूर परिसरातही आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली तर नांदेड जिल्ह्यातही हलका पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

विदर्भातही वाशिम, अमरावती जिल्ह्यात पहाटे पासून गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून आज पहाटेपासूनही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे तूर आणि कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत एकूण ७३ सदस्य आहेत. त्यापैकी शिवसेनेचे २५ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १७ आणि काँग्रेस पक्षाचे ८ सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादी काँग्रेस कडे उपाध्यक्ष पद राहण्याची शक्याता आहे.

****

शीख धर्मियांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांची जयंती आज सर्वत्र उत्साहाने साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये या निमित्तानं शबद, कीर्तन, आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

येत्या रविवार पासून सुरू होत असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या रविवार गुवाहाटी इथं होणार आहे. त्यानंतरचे दोन सामने अनुक्रमे पुढच्या मंगळवारी आणि शुक्रवारी, इंदूर आणि पुण्यात होणार आहेत. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका या दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

****


No comments: