Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05
January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्य मंत्रिमंडळाच्या
खातेवाटपाची यादी मंजुरीसाठी राज्यपालांना सादर; अनिल देशमुख - गृह, अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम, अमित देशमुख
- वैद्यकिय शिक्षण, राजेश टोपे - आरोग्य तर संदिपान भुमरे यांना रोजगार हमी आणि फलोत्पादन
खातं, अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल आणि
ग्रामविकास खात्याचं कारभार
** राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ
** औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र विकास आघाडीच्या
मीना शेळके तर उपाध्यक्षपदी भाजपचे लहानू गायकवाड; बीड जिल्हा परिषदेचा निकाल १३ जानेवारीला जाहीर होणार
आणि
** जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याच्या
निषेधार्थ नगराध्यक्षासह जिल्हा
परिषद सदस्य आणि नगरसेवकांचा सामुहिक राजीनामे देण्याचा निर्णय
****
राज्य मंत्रिमंडळाच्या
खातेवाटपाची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली असल्याचं मंत्री
जयंत पाटील यांनी सांगितलं. या
यादीनुसार अजित पवार यांना अर्थ खातं, अनिल देशमुख - गृह, बाळासाहेब थोरात - महसूल, अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम, एकनाथ शिंदे - नगरविकास, सुभाष देसाई - उद्योग, अनिल परब - परिवहन, उदय सामंत - उच्च
आणि तंत्रशिक्षण, दादा
भुसे - कृषी, संदीपान भुमरे - रोजगार हमी आणि फलोत्पादन, अमित देशमुख - वैद्यकिय शिक्षण
आणि सांस्कृतिक, जयंत पाटील - जलसंपदा, छगन भुजबळ - अन्न
आणि नागरी पुरवठा, दिलीप
वळसे पाटील - उत्पादन शुल्क, धनंजय मुंडे - सामाजिक
न्याय, राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य, हसन
मुश्रीफ - ग्रामविकास, वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण, यशोमती
ठाकूर यांना महिला आणि बालविकास खातं तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना महसूल आणि
ग्रामविकास तर संजय बनसोडे यांना पर्यावरण,पाणीपुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या यादीला लवकरच राज्यपालांची मंजुरी मिळेल, असं पाटील यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
राज्याच्या औद्योगिक धोरणातल्या सुधारणा कामगारांना केंद्रस्थानी ठेऊन
कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत काल झालेल्या उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. राज्याची औद्योगिक प्रगती गतीनं व्हावी अशा प्रकारे धोरणांची
अंमलबजावणी व्हावी, यापुढे
उद्योगांना सवलती देताना आर्थिक गुंतवणुकीबरोबरच रोजगारनिर्मिती हा महत्त्वपूर्ण
निकष समोर ठेवला जावा, असं
मुख्यमंत्री म्हणाले. मोठे उद्योग सुरू करताना, आवश्यक मनुष्यबळ स्थानिक युवकांमधून उपलब्ध करण्यासाठी, कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही, उद्योगांवर सोपवण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
सरकारनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याचा
निर्णय घेतला आहे. सुमारे
१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी, तसंच सात लाख सेवानिवृत्त कर्मचारी आणि अन्य पात्र पूर्णवेळ
कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या
वाढीनंतर महागाई भत्त्याचा दर आता १२ टक्क्यांवरुन १७ टक्क्यांवर गेला आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र विकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या
मीना शेळके यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी भाजपचे लहानू गायकवाड विजयी झाले. अध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीच्या काल झालेल्या या निवडणुकीत
कॉंग्रेसच्या मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी
तीस मतं मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी भानुदास
पालवे यांनी ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला. तिसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी समर्थ मिटकर याने काढलेली चिठ्ठी मीना शेळके
यांच्या नावाची असल्यानं, त्यांना
विजयी घोषित करण्यात आलं. उपाध्यक्ष
पदासाठी काँग्रेसचे किशोर बलांडे यांनी माघार घेतल्यानं भाजपचे लहानू गायकवाड आणि शिवसेनेच्या
शुभांगी काजे यांच्यात थेट लढत झाली. गायकवाड यांना ३२, तर
काजे यांना २८ मतं मिळाली.
****
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची
निवडणूकही काल झाली. या
निवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट यांनी
अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी तर भाजपच्या वतीने योगिनी थोरात
यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी भारत काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना ३२ मते मिळाल्याचा दावा आघाडीकडून करण्यात
आला आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या निवडणुकीचा निकाल
१३ जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याच्या
निषेधार्थ जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह काँग्रेसचे
जिल्हा परिषद सदस्य तसंच नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन सामुहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार गोरंट्याल यांनी काल जालना इथं आपल्या समर्थकांच्या घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव करत तीन वेळेस निवडून आल्यामुळे, मंत्रिमंडळ विस्तारात आपणाला संधी मिळेल, अशी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, तसं आश्वासनही आपल्याला देण्यात आलं होतं, मात्र ऐनवेळी आपल्याला डावलण्यात आल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याचं
गोरंट्याल यांनी यावेळी सांगितलं. यापुढे
कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो
आपणाला मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद इथल्या नियोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
पार्श्वभूमीवर उस्मानाबाद इथं राज्यस्तरीय भित्तीचित्रण स्पर्धा घेण्यात येत आहे. सर्व वयोगटाले विद्यार्थी, कलाशिक्षकांसह ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, या स्पर्धेत शहरातल्या भिंतींवर रेखाचित्र, अक्षरचित्र, पर्यावरण, प्लास्टिकमुक्ती यांसह संत साहित्याच्या मौलिक विचार रेखाटता
येणार आहेत. सात जानेवारीला सकाळी आठ वाजता
संमेलनाच्या कार्यालयातून ही स्पर्धा सुरू होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचावरून रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
पुणे इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल खुल्या गटाच्या मॅट
विभागातल्या लढतीत महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, सागर बिराजदार, मियांलाल
मुल्लाणी, यांनी पहिल्या फेरीत विजयी सलामी
दिली. माती विभागात मारुती जाधव, सिकंदर शेख, संकेत
घाडगे, सागर मोहोळकर, बाला रफिक शेख यांनी आपापल्या गटात विजय मिळवला.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड ते पोखर्णी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पटरीच्या
दुरुस्ती करता उद्यापासून ते २२ मार्च पर्यंत लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत आदिलाबाद ते परळी सवारी गाडी परभणी पर्यंतच
धावेल, तसंच परळी ते अकोला सवारी गाडी
परभणी ते अकोला अशी धावेल.
****
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना कालबध्द पद्धतीनं राबवून पात्र लाभार्थ्यांना
३१ मे २०२० पर्यंत लाभ देण्याचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी सांगितलं आहे. काल
नांदेड इथं या योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जुनमध्ये शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज वाटप करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. येत्या
सात जानेवारीला शेतकर्यांचं बॅंक खातं आधार क्रमांकाला जोडण्याकरता नांदेड जिल्ह्यात
विशेष मोहीम राबवणार असल्याचंही जिल्हाधिकार्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या विरेगावजवळ टेम्पोनं दुचाकीला धडक दिल्यानं
झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. सुनिल राऊत असं मृत तरुणाचं नाव असून, काल संध्याकाळी भोकरदनच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात दिव्यांग केंद्रांची उभारणी करण्यासाठी शासनाकडे
पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमदार अभिमन्यू पवार यांनी दिलं आहे औसा इथं काल दिव्यांगांसाठी
कृत्रिम अवयव, सहाय्यक उपकरणं तपासणी शिबिराच्या
उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
****
उस्मानाबाद इथं ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचं जिल्हास्तरीय विक्री
आणि प्रदर्शन ‘आद्या हिरकणी महोत्सवाचं’ काल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या महोत्सवात महिलांनी उत्पादीत केलेल्या विविध जीवनोपयोगी वस्तु
आणि खाद्यपदार्थांसह शासकीय विभागांची आणि योजनांची माहिती देणारे एकूण शंभर स्टॉल्स
लावण्यात आले आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या स्वयंसहायता समुहातल्या महिलांसाठी तीन दिवसीय उद्योग प्रशिक्षण
सत्राचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये
कापडी तसंच कागदी पिशव्या, कापडी
खेळणी, सॅनीटरी नॅपकीन, आदी
तयार करण्यासह शेतमाल प्रक्रिया, भाजीपाला
प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया इत्यादी उद्योगांबाबतचं
प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक बचत गट सदस्यांनी पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे येत्या आठ
जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या जिल्हा न्यायालयातल्या अभिलेख कक्षातला कनिष्ठ लिपीक ज्ञानेश्वर
गुळस्कर याला दोन हजार रूपये लाच घेतांना काल लाचलुचपत पथकानं रंगेहात पकडलं. न्यायालयातल्या निकाली लागलेल्या फौजदारी संचिका त्रुटी न काढता
तात्काळ जमा करून घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment