आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ जानेवारी २०२० सकाळी
११.०० वाजता
****
महिला अत्याचार प्रकरणातल्या पीडीत महिला आणि
अल्पवयीन मुलींना जलदगतीनं न्याय देण्यासाठी देशभरातल्या महिला आणि बाल न्यायालयांची
संख्या येत्या तीन महिन्यात जवळपास दुप्पट केली जाणार असल्याचं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया
रहाटकर यांनी सांगितलं आहे. काल, त्या कोल्हापूर इथं,
आयोग आपल्या दारी या उपक्रमानंतर, पत्रकार परिषदेत
बोलत होत्या. देशभरात अशा प्रकरणांसाठी साडे पाचशे न्यायालयं
कार्यरत आहेत, ही संख्या एक हजारपर्यंत वाढवली जाणार असल्याची
माहिती रहाटकर यांनी दिली.
****
साहित्य अकादामी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचा
आज औरंगाबाद इथं, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात
येणार आहे. परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात, आज संध्याकाळी
सहा वाजता हा कार्यक्रम होईल. पाटील यांच्या ’कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहास यंदाचा, साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात येत्या
९ ते १२ जानेवारी दरम्यान, विवेकानंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाचे
प्राचार्य श्याम शिरसाठ यांनी ही माहिती दिली. या व्याख्यानमालेत
पत्रकार गिरीश कुबेर, प्रख्यात लेखक गणेश देवी, आणि फासे पारधी समाजातल्या बालकांच्या शिक्षणासाठी प्रयत्नरत असणारे,
मतीन भोसले यांची व्याख्यानं होणार आहेत. तसंच
महाविद्यालयात येत्या सहा आणि सात जानेवारीला राज्यस्तरीय भक्तीगीत गायनाची स्पर्धा
होणार असल्याची माहीती ही प्राचार्य शिरसाठ यांनी दिली.
****
कंपनी सचिवांनी, औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित,
योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीत, सहभागी होण्याचं आवाहन राज्यपाल भगत सिंह
कोश्यारी यांनी केलं आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा, मुंबई इथं सुरु असलेल्या
कंपनी सचिवांच्या, पहिल्या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या
या परिषदेतून चांगले विचार मंथन होऊन भावी पिढीला दिशा देणारे मार्गदर्शक या माध्यमातून
घडावे, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment