Saturday, 20 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.06.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
                                     आकाशवाणी औरंगाबाद             
प्रादेशिक बातम्या
दिनांक जून २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  देशाच्या रक्षणासाठी सैन्यदलाला चोख कारवाईचे अधिकार - पंतप्रधानांची माहिती
Ø  कोरोना विषाणू संसर्गाचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचं कृती दल नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Ø  औरंगाबाद शहरात काल आठ कोविडग्रस्तांचा मृत्यू; जालना २९, नांदेड ५, लातूर ३ बीड २ तर हिंगोलीत एक नवा रुग्ण
आणि
Ø  अव्यावसायिक तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
****

 देशाच्या रक्षणासाठी सैन्यदलाला चोख कारवाईचे अधिकार दिले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. भारत चीन सीमेवर निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बोलत होते. देशाच्या सीमेवरून घुसखोरी झालेली नसून, सैन्याची चौकीही कोणी बळकावलेली नाही, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. चीनच्या सीमेवर आपल्या वीस सैनिकांनी प्राणांचं बलिदान दिलं, मात्र त्यापूर्वी त्यांनी शत्रू सैन्याला योग्य धडा शिकवल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या हुतात्मा सैनिक कुटुंबांच्या पाठीशी देश सदैव उभा असल्याची खात्री पंतप्रधानांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, यांच्यासह विविध पक्षांचे अध्यक्ष या चर्चेत सहभागी झाले. चर्चा आणि संवादाच्या आपल्या भूमिकेचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर त्याला चोख उत्तर द्यायला हवं, संकट समयी महाराष्ट्राचं केंद्र सरकाला पूर्ण सहकार्य असेल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केल, तर अशा प्रकरणातली संवेदनशीलता सर्व पक्षांनी समजून घेण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली.
****

 राज्यसभेच्या २३ जागांसाठी काल निवडणूक झाली, यापैकी भाजपनं दहा, तर काँग्रेसनं पाच जागांवर विजय मिळवला. गुजरातमध्ये चार पैकी भाजप तीन तर काँग्रेस एक, राजस्थानात तीन पैकी काँग्रेस दोन तर भाजप एक, मध्यप्रदेशात तीन पैकी दोन भाजप तर काँग्रेस एक, कर्नाटकाल्या चारपैकी भाजप दोन तर धर्मनिरपेक्ष जनता दल तसंच काँग्रेस प्रत्येकी एक तर आंध्रप्रदेशातल्या चार जागांवर वायएसआर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. कालच्या निकालानंतर भाजपची राज्यसभेतली सदस्यसंख्या ७५ वरून ८५ झाली आहे, तर काँग्रेसची सदस्यसंख्या ३७ झाली आहे. राज्यसभेवर निवडून गेलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे, अशोक गस्ती, काँग्रेसचे दिग्वीजयसिंह, मल्लिकार्जुन खरगे, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा समावेश आहे.
****

      कोरोना विषाणू संसर्गानं होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर, प्रत्येक जिल्ह्यात तज्ञ डॉक्टरांचं कृती दल नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यानी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातल्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. टाळेबंदी शिथिल केल्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत असून, रुग्ण तसंच रुग्णाच्या संपर्कातले लोकंही जलद गतीनं शोधणं हाच रोगप्रसाराला प्रतिबंधाचा एकमेव मार्ग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. प्रयोगशाळांमधून कोरोना विषाणू चाचणीचे अहवाल तात्काळ देण्याच्या सूचना असतांनाही काही ठिकाणी विलंब होत असेल, तर ती गंभीर बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पावसाळ्यात  इतर आजारांच्या रुग्णांमध्येही वाढ होऊ शकते, अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.
****

      कोविड संसर्ग चाचणीसाठी देशभरात समान चाचणी शुल्क असावं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यागणिक भिन्न चाचणी शुल्क असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे, काही राज्यात या चाचणीसाठी दोन हजार दोनशे रुपये तर काही राज्यात साडे चार हजार रुपये शुल्क आकारलं जातं, या प्रकरणी केंद्र सरकारनं लक्ष घालावं, असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबत आपला निर्णय नंतर देणार असल्याचं म्हटलं आहे. देशभरात सध्या ७०३ सरकारी आणि २५७ खासगी अशा एकूण ९६० प्रयोगशाळांमधून कोविड संसर्गाची चाचणी केली होती.

      दरम्यान, रुग्णांच्या योग्य व्यवस्थापनाची खात्री करून घेण्याच्या सूचना न्यायालयानं महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. कोविडग्रस्तांच्या देखभालीवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांचं पथक नियुक्त करण्याचे तसंच रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले जाण्याचे संकेतही न्यायालयानं दिले आहेत.
****

      कोविड संक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा सर्व राज्यांनी अवलंब करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. यामध्ये कोविडग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा सर्वसमावेशक तपास आणि प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश आहे. प्रत्येक रुग्णाच्या संपर्काचा प्रभावी माग काढणं, हा उपाय कोविड संसर्गाला योग्य प्रतिबंध करू शकतो, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****

      देशात नवीन कोविडग्रस्तांच्या संख्येनं काल उच्चांक गाठला. काल संपूर्ण देशभरात १३ हजार ५८६ नवे कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण आढळले, त्यामुळे देशातल्या या रुग्णांची संख्या आता तीन लाख ऐंशी हजार ५३२ झाली आहे. यापैकी दोन लाख चार हजार ७११ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५३ पूर्णांक ८० शतांश टक्के एवढं झालं आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत १२ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण मृत्यू दराचं प्रमाण तीन पूर्णांक तीस शतांश टक्के झालं आहे. सध्या देशभरात एक लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****

      राज्यात काल आणखी तीन हजार ८२७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख २४ हजार ३३१ झाली आहे. काल या आजारानं १४२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत पाच हजार ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल राज्यभरात एक हजार ९३५ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ६२ हजार ७७३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ५५ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

 औरंगाबाद शहरात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये घाटी रुग्णालय परिसरातला ४५ वर्षीय, शिवशंकर कॉलनीतला ६४ वर्षीय, हडको एन अकरा मयूर नगरमधील ३८ वर्षीय, आझाद चौक रहीम नगरमधील ४४ वर्षीय, रहेमानिया कॉलनीतला ६५ वर्षीय आणि आकाशवाणी परिसरातल्या ६७ वर्षीय पुरुषाचा तसंच रोशन गेट भागातल्या एका ६५ वर्षीय आणि जुन्या मुकुंदवाडीमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील एका ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या ही १७८ एवढी झाली आहे.

 दरम्यान, काल जिल्ह्यात आणखी १२२ नवे रुग्ण आढळले. यामध्ये १०४ रुग्ण औरंगाबाद शहरातले तर १८ रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले आहेत.

  ग्रामीण भागात वाळूज बजाज नगरमधल्या सुयोग हाऊसिंग सोसायटीत चार, वडगाव कोल्हाटीच्या जय भवानी चौक आणि बजाजनगरमधल्या लोकमान्य चौकात प्रत्येकी दोन, तर पिसादेवीमधल्या जय हिंद नगर, वाळूज- सिडको महानगर तसंच साऊथ  सिटी, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, शिवालय चौक, सारा गौरव, फुलंब्री तालुक्यातलं खामगाव, सिल्लोडची झाकीर हुसेन कॉलनी, वडगाव कोल्हाटीतल्या जागृती हनुमान मंदिर परिसर आणि देवळाईच्या नाईक नगरमध्ये प्रत्येकी एक रुग   ण आढळला आहे. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३२३८ एवढी झाली आहे. यापैकी एक हजार ७८१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर एक हजार २७९ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
****

      जालना जिल्ह्यात काल आणखी २९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. जालना शहरातल्या खडकपुरा भागातील नऊ, आनंदनगर तीन, लक्कडकोट चार, समर्थनगर दोन, रामनगर पाच, कन्हैय्यानगर, राजेंद्र प्रसाद रोड, क्रांतीनगर, मंगळबाजार भागातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर एक रुग्ण जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांचा संख्या आता ३५३ झाली आहे. दरम्यान, उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या चार रुग्णांना काल सुटी देण्यात आली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत २२५ रुग्ण बरे झाले असून, ११३ जणांवर उपचार सुरू आहेत.
****

      बीड शहरात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. दोन्ही रुग्ण छोटीराज गल्ली इथले आहेत. बीड जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ९७ झाली असून, ७० पेक्षा जास्त जण बरे झाले आहेत. सध्या २२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

      नांदेड जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ३० झाली आहे. त्यापैकी १८६ रूग्ण बरे झाले आहेत तर १३ रुग्ण कोरोनाविषाणू बाधेमुळे मृत्यू पावले आहेत. सध्या १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****

      हिंगोली जिल्ह्यात काल एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. सेनगाव तालुक्यातला कहाकर बुद्रुक इथला हा १८ वर्षीय तरुण मुंबईहून आला होता. हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २३८ झाली असून, २०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

      लातूर जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. लातूर शहरातल्या माताजी नगर इथं एक, तसंच औसा आणि निलंगा इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या २२० झाली आहे. त्यापैकी १३९ जण बरे झाले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

      उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. भूम तालुक्यातल्या जांब इथले दोन, तर परंडा तालुक्यातल्या खानापूर इथला एक रुग्ण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १६८ झाली आहे. त्यापैकी १२९ रुग्ण बरे झाले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

      मुंबईत काल आणखी एक हजार २६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ११४ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल ३५० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात काल आणखी ७५ बाधित रुग्ण आढळले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबईत १२४, सातारा १३, सांगली सात, बुलडाणा सहा, वाशिम बारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  अहमदनगर जिल्ह्यात काल १३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****

      पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग तेराव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर ५६ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतीलिटर ६३ पैसे वाढ नोंदवण्यात आली. १३ दिवसानंतर पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे सात रुपये ११ पैसे, तर डिझेलच्या किमतीत लिटरमागे सात रुपये ६७ पैसे वाढ झाली आहे.

      दरम्यान, पेट्रोल-डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा जनतेला लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी पेट्रोल-डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसच्या किंमती एप्रिल २००४ मध्ये होत्या त्या पातळीवर आणाव्यात असं सावंत यांनी म्हटलं आहे.
****

      देशभरात प्राथमिक शिक्षणाचा एकसमान अभ्यासक्रम असावा, अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. भाजप नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत, एक देश एक शिक्षणमंडळ या धोरणांतर्गत भारतीय शालांत प्रमाणपत्र शिक्षण मंडळ आयसीएसई आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसई च्या एकत्रीकरणाची मागणी केली आहे. देशात सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी सर्व शाळांमधून एकसारखं प्राथमिक शिक्षण मिळावं, असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे.
****

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या, राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल काल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. साताऱ्याचा प्रसाद चौगुलै राज्यात पहिला आला, तर मुलींमध्ये  अमरावती जिल्ह्यातली पर्वणी पाटील पहिली आली आहे. उस्मानाबादचा रविंद्र शेळके  मागासवर्गीयांमधून पहिला आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली होती. एकूण ६ हजार ८२५ विद्यार्थी  मुख्य परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ विद्यार्थी हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. त्यापैकी  ४२० जणांची अधिकारी म्हणून निवड होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचे योगेश चंद्रकांत रांजणकर, अजय विलास कोकाटे यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली आहे.
****

      आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होत आहे. हा दिवस नागरिकांनी सामाजिक अंतर पाळत आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधानांनी, ‘घरीच योग आणि परिवारासोबत योग’ हा यंदाच्या योग दिनाचा विषय असल्याचं सांगितलं. दरवर्षी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, मात्र यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे आपल्याला घरी राहुनच हा दिवस साजरा करायचा असल्याचं ते म्हणाले.

*****
        शिवसेनेसोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, तो मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री पद स्वीकारलं. मात्र शिवसेनेनं आपली विचारधारा बदलली नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचं आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात शिवसेनेची शाखा असायला पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.
****

      लातूर इथं शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला.

      नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****

 राज्यातल्या अव्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत काल घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले.

 राज्यातील कोविड-19 ची परिस्थिती विचारात घेता, व्यावसायिक अभ्यासक्रम, अव्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा हि आम्ही घेणार नाही आहोत. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम वर्षांतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसेच त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरून त्यांचे निकाल घोषित करावे. या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसेच त्यांच्याकडून लेखी स्वरूपात देऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी. बाकी असलेल्या (बॅकलॉक) विषयांच्या परीक्षा संदर्भात विद्यापीठांचे कुलगुरू संबंधित अधिकारी यांची शासन स्तरावर बैठका घेऊन विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल.
****
      टाळेबंदी नंतरच्या परिस्थितीत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून योग्य त्या खबरदारीनं शैक्षणिक वर्षाचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या सर्व नवनियुक्त संविधानिक अधिकाऱ्यांची काल बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आगामी वर्षात प्रवेश प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत शैक्षणिक दिनदर्शिका तयार करण्यात येईल. कोणी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पीएचडीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागा आणि विद्यार्थी संख्या याचा आढावा घेऊनच प्रवेशपूर्व परीक्षा - पेट घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****

      आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्र सेविका समितीच्या वतीनं १४ जून पासून ऑनलाईन योग शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात ५० हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. आज या शिबिराचा समारोप होणार असून, विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा पदमश्री निवेदिता भिडे यांचं उद्या व्याख्यान होणार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या फेसबूक पेज वर सकाळी साडे सात वाजता व्याख्यानाला सुरुवात होणार आहे.
****

      जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापारी महासंघानं शहरात पुकारलेल्या तीन दिवसांच्या जनता संचारबंदीला कालपासून प्रारंभ झाला. व्यापारी महासंघाच्या या आवाहनास प्रतिसाद देत बहुतांश व्यापाऱ्यांनी काल आपले व्यवहार बंद ठेवले. बाजारसमिती मधला भुसार आणि किराणा बाजारही बंद ठेवण्यात आला होता. मात्र, औषधी आणि कृषी साहित्याची दुकानं सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

      दरम्यान, जालना शहरात मागील आठवडा भरापासून रहदारीला अडथळा ठरणारी तसंच नागरिकांची गर्दी होत असलेल्या भागातली अतिक्रमणं हटवण्यात येत आहे. काल शहरातल्या फुलबाजार, कपडा बाजार परिसरातल्या मुख्य रस्त्यांवरची अतिक्रमणं नगरपालिकेच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली.
****

      उस्मानाबाद इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीनं प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे, या संपूर्ण प्रकरणांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी आणि दोषींवर भ्रष्टाचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे.
****

      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बाजरी बियाण्याचं मोफत वाटप करण्यात आलं. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आमदार चव्हाण यांनी बाजरी बियाण्यांचं वाटप केलं.
****

      नांदेड जिल्ह्यात कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत  तालुकानिहाय समतोल आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हा दक्षता समितीची चव्हाण यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. अन्न-धान्याची गुणवत्ता टिकून राहण्याकरीता गोदाम व्यवस्थाही अधिक परिपूर्ण करावी असंही ते म्हणाले.
****

      औरंगाबाद जिल्ह्यातल्या निपाणी इथं १३ वर्षाच्या मुलीचा विवाह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रोखला. शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं त्यांनी अल्पवीयन वधु, वरांच्या पालकांचं समुपदेशन केलं. तसंच अल्पवयीन मुलीला औरंगाबाद इथल्या बालगृहात ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

      नांदेड तालुक्यात सोमेश्वर परिसरातल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पत्रकार आनंदा बोकारे आणि सदाशिव कदम यांनी केली आहे. या मागणीसाठी हे पत्रकार उपोषणाला बसले आहेत.
****

      हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात कनेरगाव नाका, आखाडा बाळापूर, कळमनुरी, नर्सी, आदी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरातही काल सायंकाळी सुमारे ताभर पाऊस झाला. शहराच्या सखल भागात काही घरांमध्ये पाणी शिरल्याचं वृत्त आहे. अंबाजोगाई शहर परिसरात काल रात्री जवळपास अडीच तास पाऊस झाला.
****

      औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या पंधरा दिवसांत सव्वा दोन दशकोटी घनफुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात ५४६ दशकोटी घनफूट पाणी साठा आहे, यापैकी २८६ दशकोटी घनफूट जिवंत पाणीसाठा आहे. हे प्रमाण धरणाच्या एकूण साठवण क्षमतेच्या ३७ पूर्णांक ३३ शतांश टक्के एवढं आहे.
****

      लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयाच्या विधी चिकित्सालय विभागातर्फे बालन्याय - मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ या विषयावर वेबिनार घेण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लातूर पॅनलचे विधिज्ञ एस व्ही सलगरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
*****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 11 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...