Sunday, 21 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या १३७ रुग्णांमधे ४४ महिला आणि ९३ पुरुषांचा समावेश आहे.  ग्रामीण भागात सर्वाधिक दहा रूग्ण पळशी इथं आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या तीन हजार ४९७ झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमधे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यांत कोरोना विषाणूच्या रुग्णांमधे सर्वाधिक वाढ होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची देशातील टक्केवारी पंचावन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता चार लाख १० हजार ४६१ झाली आहे. काल आतापर्यंतचे सर्वाधिक पंधरा हजार ४१३ नवे रुग्ण आढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आठ रुग्ण आज कोरोना विषाणूवर मात करून घरी परतले आहेत. यामधे नगर शहरातील चार, राहाता इथले तीन आणि संगमनेर इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाविषाणू मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २४५ झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात योगाभ्यासाद्वारे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न  ठेवणं शक्य होईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. योगाभ्यासाचं प्राचीन विज्ञान ही भारतानं जगाला दिलेली मोठी भेट असल्याचं राष्ट्रपतींनी  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा देताना आपल्या संदेशात म्हटलं आहे. त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे योग करतानाची स्वतःची छायाचित्र आज प्रसारित केली आहेत. अधिकाधिक लोक योग अंगीकारत असल्याचं पाहून आनंद होतो, असंही राष्ट्रपतींनी नमुद केलं आहे.       
****
देशवासियांनी निरोगी राहण्यासाठी नियमीतपणे ध्यान आणि योगाभ्यास करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी योग दिनाच्या संदेशात केलं आहे. आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून `घरी आणि कुटुंबांसमवेत योगाभ्यास` असं यंदाचं घोषवाक्य आहे.
****
डिझेल, पेट्रोलच्या किमतीमधे आज सलग पंधराव्या दिवशी वाढ झाली. डिझेल लिटरला साठ पैसे तर पेट्रोल लिटरला पस्तीस पैसे महाग झालं आहे. या पंधरवड्यात डिझेलची आठ रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पेट्रोलची सात रुपये सत्यान्नव पैसे वाढ झाली आहे. यानुसार विविध राज्यांत स्थानिक विक्री कर किंवा मूल्यावर्धित करानुरुप पेट्रोल, डिझेल दरांमधे वाढ करण्यात आली आहे.
****
या दशकातलं पहिलं, सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण आज पहायला मिळत आहे. भारतातल्या फक्त उत्तर भागात हे कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळत असून उर्वरित भागात ते खंडग्रास दिसत आहे. सकाळी सुमारे १०  वाजून १ मिनीटांनी याला सुरुवात झाली असून ११ वाजून ३८ मिनीटांनी ग्रहणमध्य होता. या कालावधीत सूर्याचा अंदाजे ७० टक्के भाग चंद्रानं व्यापलेला होता. दुपारी १ वाजून २८ मिनीटांनी ग्रहण पुर्णपणे सुटणार आहे. देशात थेट ११ वर्षांनी म्हणजे २०३१ मध्ये पुढलं सूर्यग्रहण दिसणार आहे.
****
सुर्यग्रहणानिमित्त तुळजापूर इथं श्री तुळजा भवानी मातेची मुर्ती पुर्वापार प्रथेप्रमाणं सोवळ्यात, पांढ-या श्वेत कपड्यात ठेवण्यात आली असल्याची माहिती देवीचे मुख्य भोपे अमरराजे कदम यांनी दिली आहे. ग्रहण कालावधीनंतर पुढील सर्व धार्मिक विधी पुर्वीप्रमाणे केले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****    
सांगली, कोल्हापुरात गेल्या वर्षी आलेल्या महापुराशी अलमट्टी धरणाचा संबंध नसल्याचं याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन समितीचे प्रमुख नंदकुमार वडनेरे यांनी म्हटलं आहे. ते सांगली इथं या संबंधी आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. अतिवृष्टी आणि नाल्यावरील अडथळे यामुळे हा पूर आला होता, असंही त्यांनी नमुद केलं.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...