Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १९
जून २०२० दुपारी १.०० वा.
****
लद्दाखच्या
गलवान खोऱ्यात चिनी सैन्यानं केलेला हल्ला पूर्वनियोजित होता, आणि आपले सैनिक प्राणांचं
बलिदान देत असताना, केंद्र सरकार गाढ झोपेत होतं, अशी टीका काँग्रेस नेते खासदार राहुल
गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर आज सायंकाळी बोलावलेल्या
सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. आपल्या या
वक्तव्याच्या समर्थनात गांधी यांनी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या एका वक्तव्याचा
संदर्भ दिला आहे. चिनी सैनिकांनी केलेल्या या पूर्वनियोजित हल्ल्याला भारतीय सैनिक
सडेतोड उत्तर देतील, असं नाईक यांनी यात म्हटलं असल्याचं, पीटीआयच्या बातमीत नमूद आहे.
दरम्यान,
भारत - चीन सीमा भागामधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी आज बोलावलेली
सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी पाच वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार
आहे. यावेळी विविध पक्षांचे प्रमुख या बैठकीत सहभागी होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं
सांगितलं आहे.
****
जम्मु
काश्मिरच्या केंद्रशासीत प्रदेशातल्या दक्षिण काश्मिर इथल्या दोन वेगवेवळ्या ठिकाणी
आज सुरक्षा दलांनी केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत आठ दहशतवादी मारले गेले. मिज पंपोर,
बांदापावा आणि शोपियां या भागात दहशतवादी लपुन
असल्य़ाची माहिती मिळाल्यावर राज्य पोलिस दल, केंद्रींय रायफल्स आणि केंद्रींय राखीव पोलिस दलानं ही संयुक्त कारवाई केली असल्याची
माहीती सुरक्षा दलानं दिली आहे.
****
जालना
जिल्ह्यात आज सकाळी आणखी २६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ३५० झाली आहे. बाधितांमध्ये जालना शहरातल्या
विविध भागातल्या २५ जणांसह जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथल्या एका रुग्णाचा समावेश
आहे. दरम्यान,आतापर्यंत २२१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले असून, एकशे एकोणीस
जणांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या तीन हजार २०७ वर पोहोचली आहे. यापैकी
एक हजार सातशे त्रेपन्न रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १७० जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एक हजार दोनशे चौऱ्यांऐंशी रुग्णांवर उपचार सुरू
आहेत. आज सकाळी जिल्ह्यात एक्याण्णव नवीन रुग्णांची वाढ झाली. यामध्ये ३५ महिला आणि
छप्पन्न पुरुषांचा समावेश असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात कोरोना विषाणुबाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढत असुन आज तेरा रुग्ण
उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.यामध्ये संगमनेर इथले सात, राहाता इथले तीन, मनपा
२ आणि नगर तालुक्यातील एका रुग्णाला सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या
रुग्णांची संख्या दोनशे तेहतीस झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
मुंबईच्या
पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कांदिवली इथल्या येथील पावनधाम कोविड
रुग्णालयातील अठ्ठावन्न कोरोना विषाणु बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असुन
१२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.या रुग्णालयात अद्ययावत सुविधांसह कमीत कमी शुल्कात
कोरोना विषाणुबाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं.
****
नांदेड
इथं गेल्या वर्षी पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त
प्रकाशित करण्यात आलेल्या सचित्र कार्यपुस्तिकेचं प्रकाशन विधान सभेतले विरोधी पक्ष
नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. नांदेडचे खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यावेळी उपस्थित होते.
****
सोलापूर
जिल्ह्यात केतूर इथल्या उजनी जलाशयाच्या पात्रात आज सकाळी एका अंदाजे ३५ ते ४० वर्षीय
व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं मासेमारी करणाऱ्यांना आढळून आलं. याबाबत
कोणाला माहिती असल्यास करमाळा पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, धरणाच्या
पाणीसाठ्यात गेल्या पंधरा दिवसांत सव्वा दोन दशकोटी घनफुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात
५४६ दशकोटी घनफूट पाणी साठा आहे, यापैकी २८६ दशकोटी घनफूट जिवंत पाणीसाठा आहे.
****
No comments:
Post a Comment