Monday, 3 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.08.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

देशभरात कोविड संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ११ लाख ८६ हजार झाली आहे. त्यामुळे या संसर्गातून बरे होण्याऱ्या रुग्णांचं प्रमाण ६५ पूर्णांक ७६ शतांश टक्के एवढं झालं असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ लाख ३ हजार ६९५ झाली असून सध्या देशात ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३८ हजार १३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक ११ शतांश टक्के असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, देशात सध्या एक हजार ३४८ प्रयोगशाळांमधून कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ९१४ सरकारी प्रयोगशाळा तर ४३४ खासगी प्रयोगशाळा आहेत. आतापर्यत देशभरात २ कोटी २ लाख २ हजार ८५८ कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद- आय सी एम आरनं दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ८७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या १४ हजार ६४० झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले ४९ तर ग्रामीण भागातल्या ३८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ९०१ रुग्ण बरे झाले असून, ४८४ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार २५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ६३ कैद्यांचे कोविड चाचणी अहवाल बाधित आले आहेत. यात ३ महिला आणि ६० पुरुष कैद्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी दिली आहे.

****

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे. यामुळे चाचण्यांचा वेग वाढणार आहे. बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातल्या किंवा अन्य गंभीर आजारांनी त्रस्त असतील व्यक्तींनी या प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेनं ‘चेस द व्हायरस’ हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आज २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजाराच्या वर रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

नाशिक शहरात ९६ ताप उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात ७५ केंद्र येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. डेंगू, मलेरिया, सर्दी, खोकला यासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्या अंगणवाडी, समाज मंदिर आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये हे सुरू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, नाशिक विभागातील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीवर आदिवासी विकास विभागाने भर दिला असून १४०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

****

राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरसिंह यांचं परवा प्रदीर्घ आजारानंतर सिंगापूर इथं उपचारादरम्यान निधन झालं होतं. त्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, तसंच माजी खासदार अभिनेत्री, जयाप्रदा यांच्यासह अनेक मान्यवरांनी अमरसिंह यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

****

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. आर्थिक अनियमिततेच्या प्रकारानंतर तत्कालीन सभापती आणि सदस्यांना बरखास्त करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता.त्यानंतर पुढे शासनाकडून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून गेल्या दीड वर्षातील हे चौथे प्रशासक मंडळ आहे.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना संस्कृत दिवसानिमित्त तसंच राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राचीन वेद हे संस्कृत भाषेतील असून संस्कृत भाषा ही अन्य भाषांची जननी असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

****

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी झाडाला राखी बांधून पर्यावरणाचा संदेश देत राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. वृक्षाला राखी बांधून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सोपवत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...