Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.
****
· राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मदतीचा
लवकरच निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
· मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं मत.
· राज्य सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरल्याची विधान सभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका.
· राज्यात आणखी पाच हजार ९८४ कोविड बाधितांची नोंद, १२५ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात १५ रुग्णांचा मृत्यू तर, नव्या ४३२ रुग्णांची
नोंद.
आणि
· परळीच्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक पन्नालाल
जैन याला दहा लाख रुपयांची लाच घेताना अटक.
****
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे,
अनेकांचे प्राणही गेले आहेत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक असून, याबाबत
लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. सोलापूर
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर ते सोलापूर इथं पत्रकारांशी
बोलत होते. राज्यावरचा अतिवृष्टीचा धोका अद्याप कायम आहे, यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं
आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नुकसान भरपाईसाठी गरज पडल्यास केंद्र सरकारकडे
मदत मागितली जाईल, पंतप्रधानांनी आपल्याला दूरध्वनीवरून मदतीची तयारी दर्शवली असल्याचं,
त्यांनी सांगितलं.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सकाळी अक्कलकोट तालुक्यात
अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सोलापुरात अधिकाऱ्यांची
बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्या १०
व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
वितरित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी केली, तसंच आपदग्रस्तांशी
संवाद साधून त्यांना दिलासा दिला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे,
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार
यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं वार्ताहरांशी बोलताना, अतिवृष्टीग्रस्तांच्या
मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही असं मत व्यक्त केलं. उस्मानाबाद जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता या भागात पूर्वी झालेल्या भूकंपाइतकीच मोठी
असल्याचं ते म्हणाले. या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं असून, पिक विमा निकषात
दुरुस्ती करणं, बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणं, हे राज्यासमोर आव्हान
असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं पवार म्हणाले
****
दरम्यान, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही
काल तुळजापूर इथं वार्ताहरांशी बोलताना, अतिवृष्टीमुळे जेवढं नुकसान झालं आहे, तेवढी
मदत नक्कीच केली जाणार असल्याचं आश्वासन दिलं. विमा संरक्षणाखाली येणारी जमीन तसंच
पीक विमा भरलेल्या खातेदारांची माहिती तयार करावी, पिक विमा कंपनीने त्वरित पंचनामे
पूर्ण करून पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
नुकसान झालेले रस्ते, पूल, पाझर तलाव आदीच्या दुरुस्तीबाबत स्वतंत्र अहवाल शासनाला
सादर करावा, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जालना तालुक्यातल्या
आंतरवाला, गोलापांगरी, कुंभेफळ या गावांमध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीपिकांची
पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
राज्य सरकार नाकर्ते असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरलं
असल्याची टीका, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी
काल पुणे जिल्ह्यातील बारामती इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर
ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना
सरकारचा बचाव करावा लागतो आहे, यातून सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येत असल्याचं ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या आडगाव मंडळामध्ये
आमदार मेघना बोर्डीकर यांनी नुकसानीची पाहणी केली.
****
सरकारनं पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना तत्काळ
२५ हजार रुपये मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
यांनी केली आहे. त्यांनी काल पंढरपूर इथं अतिवृष्टीमुळे आणि भीमा नदीच्या पुरामुळे
झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती
निवारण निधी निर्माण करून त्यातून ३५ हजार कोटी रुपये राज्याला द्यावेत अशी मागणीही
त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, शेट्टी यांनी काल लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या
तुंगी या गावीही नुकसानीची पाहणी केली. दापेगाव साठवण तलावाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात
शिरल्यानं उभ्या पिकांचं नुकसान झाल्याबाबत त्यांनी तहसीलदारांना संपर्क साधून पंचनामा
करण्यास सांगितलं.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही काल लातूर जिल्ह्यात
अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख
यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे ४८ तासांत पूर्ण करण्याचे,
निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणं, वारंवार
हात धुणं आणि सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी केलं आहे.
****
परभणी इथल्या शंभर खाटांच्या महिला रुग्णालयास उर्वरित
निधी देऊन सक्षम करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. परभणी
जिल्ह्यातल्या कोविड-19 संबंधी आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्यातला
कोविडचा मृत्यूदर कमी करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी कोविड सेंटरमधल्या रुग्णांवर उपचार
करावे, तसंच नागरिकांनीही लक्षणं दिसल्यास तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी
केलं. परभणी इथं उभारण्यात आलेल्या द्रवरुप प्राणवायू प्रकल्पाचं काल टोपे यांच्या
हस्ते उद्घाटन झालं.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथल्या सचखंड
गुरुद्वाराच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं निर्णय
घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तीनशे वर्ष जुना दसरा महोत्सव साजरा
करण्याच्या परवानगीसाठी नांदेडच्या गुरुद्वारा सचखंड मंडळानं केलेल्या याचिकेवर न्यायालयानं
स्थानिक परिस्थितीनुसार याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला
दिले असल्याची माहिती मंडळाचे सचिव रविंद्रसिंग बुंगई यांनी दिली.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार ९८४ कोविड बाधितांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख एक हजार ३६५ झाली आहे. राज्यभरात
काल १२५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४२ हजार
२४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १५ हजार ६९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी
सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले
असून, सध्या एक लाख ७३ हजार ७५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला, तर नव्या ४३२ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू, तर नवे १०१ रुग्ण,
जालना जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू, तर नवे २७ रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात
प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात नव्या ११३, तर लातूर जिल्ह्यात
४६ रुग्णांची नोंद झाली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू
झाला, बीड जिल्ह्यात ७३ तर उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ४२ रुग्णांची भर पडली. परभणी
जिल्ह्यात २१, तर हिंगोली जिल्ह्यात आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक हजो २३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळले, तर ४५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५४९ नवे रुग्ण आणि ४२ मृत्यूंची नोंद
झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी ३१८ रुग्ण आढळले, तर नऊ जणांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात
२१५, सातारा २०९, जळगाव १५२, रायगड १४३, गडचिरोली ८०, यवतमाळ ५९, भंडारा ३२, अमरावती
२८, धुळे २४, वाशिम २०, रत्नागिरी १८, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ एका रुग्णाची नोंद
झाली.
****
जालना इथल्या कोविड रुग्णालयात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या
वेगवेगळ्या चाचण्यांसाठी बसवण्यात आलेल्या इम्युनोसे यंत्रासह दोन कार्डियाक रुग्णवाहिकांचं
लोकार्पण काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. इम्युनोसे या एकाच मशीनच्या
मदतीने अँटीबॉडीजसह विविध शारीरिक चाचण्या करणं शक्य होणार असल्यानं हे मशीन रुग्णांसाठी
वरदान ठरेल, असं टोपे यावेळी म्हणाले.
****
बीड जिल्ह्यातल्या परळीच्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे
अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन याला दहा लाख रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली.
वैद्यनाथ बँकेनं कळंब इथल्या एका व्यापाऱ्याला अडीच कोटी रुपयाचं कॅश क्रेडिट मंजूर
केल्याचा मोदबला म्हणून, जैन यानं १५ लाख रुपये लाच मागितली होती, त्यापैकी १० लाख
रुपये घेताना, त्याला काल त्याच्याच परळीतल्या अन्नधान्याच्या दुकानात पकडण्यात आलं.
जर्न याला ताब्यात घेण्यात आलं असून, या प्रकरणी परळीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल विविध मागण्यांसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानापोटी सरसकट हेक्टरी
७५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, पीक विमा देण्यात
यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, रब्बीच्या पेरणीसाठी २५ हजार रुपये अनुदान
द्यावं, या आणि इतर मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. गंगापूरचे माजी पंचायत
समिती सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांनी
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात जाण्याचा
प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखलं, त्यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेले
टमाटे, मक्याची कणसं, सोयाबीन आणि इतर पिकं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकून
निषेध नोंदवला.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन
सेनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी काल जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. माता
रमाई तसंच पंतप्रधान घरकुल योजनेच्या घरकुलांचे हप्ते त्वरित वितरित करण्यात यावेत,
यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण इथं काल कांद्याला प्रतिक्विंटल
आठ हजार ५०० रूपये इतका उच्चांकी भाव मिळाला. दिंडोरी तालुक्यातल्या वणी इथं कांद्याला
आठ हजार शंभर रुपये, लासलगाव बाजार समितीत सहा हजार ८९१ रुपये तर विंचूर इथंही सहा
हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. गेल्या काही दिवसांत पावसामुळे झालेलं नुकसान
तसंच कांद्याची वाढलेली मागणी, या कारणांमुळे कांद्याचे भाव वाढल्याचं सांगितलं जात
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्र सरकारच्या
विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत सर्व प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे
निर्देश जिल्हा विकास समन्वय आणि संनियत्रण - दिशा समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल दिशा समितीच्या बैठकीत ते काल बोलत
होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तातडीने पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देऊन
घर बांधण्यास सहकार्य करावं, जिल्ह्यांतर्गत रस्ते तसंच महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण
सुधारणा करावी, असं ते म्हणाले.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं
आवाहन उस्मानाबादचे
रब्बी हंगामासाठी हरभरा बियाण्यांसाठी लागू केलेली सोडत
पद्धत बंद करुन, शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर एक हरभरा बियाण्यांची बॅग द्यावी अशी
मागणी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा
तालुक्यातल्या अनसरवाडा, सोनखेड, लिंबाळा या भागात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकांची
पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. शेतकऱ्याला पुन्हा पायावर उभं करण्यासाठी सरकारनं
पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकता तात्काळ मदत देऊन दिलासा देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
परभणीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यानं आपल्या वाढदिवसानिमित्तानं
ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे घेण्यात येत असून, यापुढे रक्ताचा पुरवठा कमी पडू देणार नसल्याचं
आमदार राहुल पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल परभणी
इथं झालेल्या रक्तदान शिबिरात शंभर जणांनी रक्तदान केलं.
****
No comments:
Post a Comment