Tuesday, 2 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.

****

कोविड प्रतिबंधासाठी सहकार्य करण्यासाठी दोन उच्चस्तरीय गट महाराष्ट्र आणि केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशात जवळपास ७० टक्के कोविडचे रुग्ण या दोन राज्यांमध्ये असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात येणाऱ्या गटात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या विशेषज्ञांचा समावेश आहे. हे गट राज्यातल्या आरोग्य विभागासोबत मिळून काम करतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील. कोविडवर प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखील हे गट सुचवतील.

****

राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच कृषी विधेयकाच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज तीन वेळा स्थगित करावं लागलं. 

****

देशात काल आठ हजार ६३५ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी सात लाख ६६ हजार २४५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५४ हजार ४८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार ४२३ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी चार लाख ४८ हजार ४०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६३ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सहा लाख ५९ हजार ४२२ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १९ कोटी ७७ लाख ५२ हजार ५७ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

दरम्यान, देशात आतापर्यंत ३९ लाख ५० हजार १५६ नागरिकांचं कोविड लसीकरण झालं आहे.

राज्यात काल ५३१ केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार ३३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आलं. राज्यात सर्वाधिक १६१ टक्के लसीकरण मुंबई उपनगर जिल्ह्यात झालं. राज्यात आतापर्यंत तीन लाख नऊ हजार ८४६ कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात ११२ जणांना, औरंगाबाद ७५, मुंबई ७१, पुणे इथं ५९, नागपूर १४३, सोलापूर ११ असे, ४७१ जणांना काल ही लस देण्यात आली.

****

राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्राच्या पथकानं प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन आणि दिल्लीतील शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करुन मानाच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. एनसीसी पथकातले विद्यार्थी, मार्गदर्शक अधिकाऱ्यांसाठी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभिनंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिद्दीनं आणि हिंमतीनं देशहिताचं कार्य करणाऱ्या युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिसांच्या पाल्यांना तसंच राज्याचा रहिवासी असलेल्या आणि दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या लष्करी जवान/ निमलष्करी जवान यांच्या पाल्यांना प्रति अभ्यासक्रम जास्तीत जास्त एका जागेवर प्राधान्यानं प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

****

नांदेड इथले जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना कंधारच्या दुर्गादास सराफ प्रतिष्ठानचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता पुरस्कार’ माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते काल कंधार इथं प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकार अनिल कसबे, दिगंबर गायकवाड, बा. पु. गायखर आणि मुखेड इथले चंद्रशेखर पाटील यांनाही हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारांनी आपल्या बातमीतून वस्तुस्थिती समाजासमोर मांडावी, ज्यामुळे माध्यमांची विश्वार्हता वृद्धींगत होईल, असं मत सामंत यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातल्या कोपरी इथं बालकांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम आणि वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा प्रस्ताव चौकशी समितीनं दिला आहे. त्याचबरोबर सीएचओ अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम याचेवर सेवा समाप्ती ची कारवाई, तर अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परवा पोलिओ लसीकरणाच्या दिवशी १२ बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आलं असून, या बालकांवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

परभणी इथं हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क यांच्या दर्गाच्या शासकीय संदलचं काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते दर्ग्याकडे प्रस्थान करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संजय बिरादार, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचा वक्फ बोर्डाच्या वतीनं सन्मान करण्यात आला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...