Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 February
2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
कृषी कायद्यांविरोधात
विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे, संसदेचं कामकाज ठप्प.
·
राज्यातल्या जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, दूध संघांच्या निवडणुका घेण्यास
परवानगी.
·
केंद्रीय माध्यमिक
शिक्षण मंडळाची दहावी-बारावीची चार मे पासून परीक्षा.
·
राज्यात एक हजार ९२७
नव्या कोविड रुग्णांची नोंद तर मराठवाड्यात दोन बाधितांचा मृत्यू.
·
यवतमाळमध्ये बालकांना
पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
तर दोन जण बडतर्फ.
आणि
·
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना
बांबू लागवड करण्याचं माजी आमदार पाशा पटेल यांचं आवाहन.
****
तीन कृषी कायद्यांविरोधात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे,
काल संसदेचं दोन्ही सदनांचं कामकाज होऊ शकलं नाही. लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर
काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, शिवसेना आणि अन्य पक्षाच्या
सदस्यांनी, अध्यक्षांच्या आसनाच्या समोर येऊन सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरूवात केली.
अध्यक्ष ओम बिरला यांनी विरोधकांना या मुद्यावर चर्चेला वेळ मिळेल असं सांगितलं, मात्र
त्यानंतरही विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती, परिणामी सदनाचं कामकाज स्थगित करण्यात
आलं. तत्पूर्वी राज्यसभेतही या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर,
सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विरोधकांनी सदनाच्या मध्यभागी येऊन
घोषणाबाजी सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चेची मागणी केली. त्याआधी
सभापती व्यंकय्या नायडू यांनी, विरोधकांना या मुद्यावर चर्चा घेण्याचं आश्वासन दिलं,
मात्र विरोधकांनी सभापतींना कार्य स्थगितीचा प्रस्ताव देऊन तत्काळ चर्चेची मागणी केली.
दरम्यान, सभापतींनी ही मागणी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
****
राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने,
सुतगिरण्या, दूध संघ अशा ४७ हजार सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यास सरकारनं परवानगी
दिली आहे. ऊस गाळप हंगामाचं कारण पुढे करत तीन महिन्यांसाठी या सहकारी संस्थांच्या
निवडणुकांवर आणलेली स्थगिती राज्य सरकारनं मागे घेतली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग
विभागानं निवडणुकांची कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले
आहेत.
****
राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी; आणि विविध ३१ नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी, येत्या १५ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात
येणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगानं तयार केलेल्या, आणि १५ जानेवारी
२०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या, या निवडणुकांसाठी ग्राह्य
धरण्यात येणार असल्याचं, राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी सांगितलं. दरम्यान,
नवी मुंबई, वसई- विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसंच
इतर विविध १६ महानगरपालिकांतील २५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी, येत्या १६ फेब्रुवारी
रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही, मदान यांनी सांगितलं.
****
‘विकेल ते पिकेल’ योजनेंतर्गत उत्पादकता वाढीबरोबरच बाजारात
मागणी असलेला माल उत्पादीत करण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं, असं कृषीमंत्री
दादा भुसे यांनी म्हटल आहे. राज्यातल्या कृषि विभागाचे सर्व संचालक, विभागीय कृषि सहसंचालक
आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची आढावा बैठक काल मंत्रालयात झाली, त्यावेळी ते
बोलत होते. शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पेाहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. असे
निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या कामी विविध पिकांच्या मूल्यसाखळी विकसित करण्यावरही
भुसे यांनी भर दिला.
****
सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
काल मंत्रालयात कापूस नुकसान भरपाई संदर्भात बैठक झाली. यावेळी पाटील यांनी अवकाळी
पाऊस आणि वादळामुळे खराब झालेल्या कापसाच्या नुकसानीसंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश
दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगाम २०१९-२० मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० पर्यंत
कापूस खरेदी करण्यात आली. अनजिंन कॉटन, डॅमेज गाठी, सरकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशी अधिकारी नियुक्त करुन प्रत्येक
केंद्राची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईनं इयत्ता दहावी आणि
इयत्ता बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक काल जाहीर केलं. या दोन्ही परीक्षा चार मे ते
११ जून या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं मंडळानं सांगितलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोग-युजीसीकडून ज्युनिअर रिसर्च फेलोशिप
आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी घेण्यात येणारी नेट परीक्षा येत्या दोन मे पासून
होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ही माहिती दिली. ही परीक्षा
ऑनलाईन होणार असून, याबाबतची अधिक माहिती युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा
निर्णय महाविकास आघाडी सरकारनं त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा येत्या पाच तारखेला भारतीय
जनता पक्ष राज्यभरातील महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, असा इशारा, माजी ऊर्जामंत्री
आणि भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मुंबईत काल वार्ताहरांशी
ते बोलत होते. टाळेबंदीत जनतेला शंभर युनिटपर्यंतचं वीज बिल माफीचं आश्वासन देणारं
हे सरकार, आता सक्तीनं वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे, हे बिल भरण्याची
क्षमता सामान्य जनतेत नसल्याचं बावनकुळे म्हणाले.
****
‘बाल हक्क’ या विषयाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी
प्रयत्न करण्याचं आश्वासन, महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलं आहे.
महिला आणि बालकांच्या विकासाचे प्रश्न, धोरणं, कायदे, कल्याणकारी उपक्रम आणि सध्या
सुरु असलेल्या योजनांचा सखोल अभ्यास करुन, सूचना करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या
विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांच्या बैठकीत, त्या काल बोलत होत्या. बाल न्याय कायद्याची
अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी, बालगृहातील मनुष्यबळाला प्रशिक्षणाची गरज, सध्या
कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, सोयी सुविधांच्या कमतरतांमुळे,
बालकांना तसंच कर्मचाऱ्यांना होणारा ताणतणाव यावर या बैठकीत चर्चा झाली.
****
एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी
सर्जील उस्मानी याच्याविरोधात पुण्यातल्या स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी
हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सर्जीलविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
****
ऊसतोड कामगारांसाठी निर्माण केलेल्या महामंडळाची, राज्य आणि
केंद्र सरकारच्या पातळीवरील नोंदणी तसंच मंजुरी प्रक्रिया होऊन, लवकरच याबाबतचा कायदा
अंमलात येईल, असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते काल बीड
इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींसाठी वसतीगृहं
सुरू करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून, बीडसह अहमदनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये
देखील ही वसतिगृहे सुरू केली जातील, असं ते म्हणाले.
****
वाहन चालवण्यासाठी परवाना आणि नूतनीकरण करताना आता वैद्यकीय
प्रमाणपत्रासंदर्भात अधिक पारदर्शकता ठेवणं आवश्यक असल्याचं, परिवहन मंत्री अनिल परब
यांनी म्हटल आहे. मुंबईत वाहन चालवण्यासाठीचा परवाना आणि नूतनीकरण करताना, वैद्यकीय
प्रमाणपत्रासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात येत्या
१७ फेब्रुवारीपर्यंत ३२ वा राज्य रस्ता सुरक्षा माह मोहिम सुरु असून, अपघाताचं प्रमाण
कमी करण्यासाठी, अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचं परब म्हणाले. वाहनचालकांना परवाना
देताना सादर केली जाणारी वैद्यकीय प्रमाणपत्र, ही वैद्यकीय व्यवसायिकांनी दिली आहेत
का, याची खातरजमा करण्याचे निर्देशही परब यांनी यावेळी दिले.
****
राज्यात काल एक हजार ९२७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ३० हजार २७४ झाली आहे. काल
३० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५१ हजार १३९ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे.
तर काल चार हजार ११ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ३६ हजार
३०५ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ३७ शतांश टक्के
झाला आहे. सध्या राज्यभरात ४१ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी
एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १०५ रुग्णांची नोंद
झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात २८ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात
२२, बीड १५, नांदेड १४, जालना १३, हिंगोली सहा, उस्मानाबाद पाच, तर परभणी जिल्ह्यात
दोन नवे रुग्ण आढळून आले.
****
यवतमाळ इथं पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पोलिओ डोस
देण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याप्रकरणी, भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय
अधिकारी भूषण मसराम आणि वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना, कारणे दाखवा नोटीस बजावण्यात
आली आहे. तर बाल आरोग्य अधिकारी अमोल गावंडे तसंच आशा वर्कर संगीता मसराम यांना, बडतर्फ
करण्यात आलं आहे. कोपरी कापसी इथल्या अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांच्याविरुद्ध
देखील कारवाईचा प्रस्ताव असून, तो महिला आणि बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
चौकशीअंती दोषी आढळल्यास या सर्वांविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉक्टर हरी पवार यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या
१२ बालकांना कसलाही त्रास नसल्याचं, डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या जायकवाडी प्रकल्पाच्या,
पुनर्वसित गावातल्या नागरी सुविधांचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, मदत
आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. मुंबईत काल या पुनर्वसित गावातल्या
नागरी सुविधांबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जायकवाडी प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्त
गावांचं पुनर्वसन, पैठण तसंच गंगापूर तालुक्यात करण्यात आलं आहे. या पुनर्वसित गावांना
नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं सादर करण्याचे
निर्देशही, वडेट्टीवार यांनी दिले.
****
पुण्याच्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि गदिमा प्रतिष्ठान
यांच्या वतीनं दिला जाणारा, गदिमा काव्य प्रतिभा पुरस्कार, ज्येष्ठ कवी डॉ.जगदीश कदम
यांना, काल नांदेडमध्ये त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. सांगली जिल्ह्यात
माडगुळे या ग.दि.माडगूळकरांच्या जन्मगावी झालेल्या गदिमा महोत्सवात, कवी कदम सहभागी
होऊ शकले नव्हते, त्यामुळे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम
सदाफुले यांच्या हस्ते, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कामगार साहित्य परिषदेचे
विभागीय अध्यक्ष कवी राजेंद्र वाघ आणि रानकवी श्रीनिवास मस्के उपस्थित होते.
****
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्याचं आवाहन,
माजी आमदार पाशा पटेल यांनी केलं आहे. मराठवाडा यासाठी पोषक असल्याचं ते म्हणाले. केंद्र
सरकारनं बांबूला झाडाच्या व्याख्येतून गवतामध्ये आणलं, यामुळे आता बांबू तोडणं किंवा
त्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही, असं ते म्हणाले. लातूर जिल्ह्यात
औसा तालुक्यात लोदगा इथं, बांबूपासून फर्निचर तयार करण्याचा कारखाना लवकरच सुरू होत
आहे, त्याचप्रमाणे बांबू पदविका अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासही राज्य शासनानं
मान्यता दिली असल्याचं, आंतरराष्ट्रीय बांबू आणि वेत संघटनेच्या सूकाणू समितीचे सदस्य,
संजीव करपे यांनी सांगितलं.
****
राज्यात अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या
आहेत, अशावेळी गृहमंत्र्यांना गावगुंडांबरोबर फोटो काढायला वेळ आहे, परंतु पीडितांचे
अश्रू पुसायला वेळ नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या चित्रा
वाघ यांनी, गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारवर टीका केली.
तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन
मुलीवर चार दिवसांपूर्वी सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या पीडितेच्या कुटुंबियांची
वाघ यांनी काल भेट घेतली. त्यानंतर त्या उस्मानाबादमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या.
राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी, आरोपींवर ठोस कारवाई
करावी, अन्यथा भाजपाच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही, वाघ यांनी दिला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार ग्रामीण रुग्णालयात कालपासून
कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांच्या
हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब शिंदे हे उपस्थित होते.
कंधार तालुक्यात ६५० आरोग्य कर्मचाऱ्यांना, सहा दिवसांत लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाचा
लाभ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घ्यावा असं आवाहन, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक
डॉक्टर सुर्यकांत लोणीकर यांनी केलं आहे. ते म्हणाले –
आमच्या रुग्णालयाचे वैद्यकीय
अधिकारी डॉ.महेश खोकले यांनी प्रथमतः लस घेऊन लसीचा आरंभ केलेला आहे. या शहरातील जे
प्रायव्हेट प्रॅक्टीसेसवाले आहेत, जे खाजगी व्यवसाय करतात, त्यातील काही लोकांनीसुध्दा
आजच्या लसीकरणाचा फायदा घेतलेला आहे. अंगणवाडीच्या सेविका आहेत, आशाताई यांचंही जास्त
प्रमाणात लसकरण करण्यात आलेलं आहे. आज सत्तर ते ऐंशी लोकांना जवळपास लस दिलेली आहे.
हा कार्यक्रम जवळपास पाच ते सहा दिवस चालणार आहे. तर या लसीकरणाचा चांगल्या रितीने
फायदा घ्यावा आणि या लसीकरणाला चांगला प्रतिसाद द्यावा.
****
औरंगाबाद तसंच लातूर जिल्ह्यात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेनं,
सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठं सुरु करावीत, या मागणीसाठी काल आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या
विविध महाविद्यालयांच्या प्रवेश द्वारावर हे आंदोलन झालं.
****
ऑनलाईन नोंदणी करूनही ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी
आणलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत तो आणावा, असं आवाहन, परभणी जिल्ह्यातल्या
पालम बाजार समितीचे सचिव आत्माराम जाधव यांनी केलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी
ऑनलाईन नोंदणी केली आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ५ ते १० टक्केच शेतकरी कापूस विक्रीसाठी
आणत आहेत, या पार्श्वभूमीवर जाधव यांनी हे आवाहन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment