Sunday, 6 June 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०६ जून २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०६ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

शिवराज्याभिषेक दिन आज साजरा होत आहे. रायगडावर शिवराज्‍याभिषेक सोहळा पारंपरिक पध्दतीने मात्र मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.

बीड इथं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थांना त्यांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या तसचं कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कोरोना योध्दांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले. नांदेड इथं जिल्हा परिषद प्रांगणात शिवराज्याभिषेकदिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शिवस्वराज्य दिन सोहळ्यानिमित्त इतिहास संशोधक प्रा. डॉ. रविंद्र देशमुख यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून काल दिवसभरात केवळ १ लाख ४१ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या ६० दिवसांतील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. काल देशभरात १ लाख ८९ हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर दोन हजार ६८१ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्याचं कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण गेल्या तीन महिन्यात काल प्रथमच ९५ टक्क्यांवर पोहोचलं.

****

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. यानुसार पेट्रोलच्या किमतींत प्रती लिटर २७ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर २९ पैशांनी वाढ झाली आहे.

****

आयकर विभाग उद्यापासून आपले नवीन पोर्टल www.incometax.gov.in सुरु करत आहे. यावर करदात्यांना ऑनलाईन विवरणपत्र आय टी आर भरता येणार आहे. यामुळे करदात्यांना लवकर परतावा मिळणार आहे.

****

मान्सूनचं राज्यात नियोजित वेळेपेक्षा ५ दिवस आधी आगमन झालं असून येत्या चार दिवसात मराठवाड्या काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

********

संक्षिप्त बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या यू ट्यूब चॅनेलवर पुन्हा ऐकू शकता.

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...