Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12
June 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर
पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे.
सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा
स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३
९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
औरंगाबादच्या रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्नशील- मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत
**
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच
विश्वकोश निर्मिती मंडळावर मुस्लिम साहित्यिकांची नियुक्ती
करण्याची मागणी
**
रेमडिसिविर औषधावरील वस्तू आणि सेवा कर ५
टक्के करण्यास वस्तू आणि सेवा कर परिषदेची सहमती
आणि
**
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात नऊ
कोविड बाधितांचा मृत्यू
****
औरंगाबादमधील
ऑरिक सिटी ही उद्योगाप्रमाणेच
वसाहती, अतिथी सेवा, पर्यटन आणि
व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे एकात्मिक
सर्वागिंण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणली जाईल.
यासाठी रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या
सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्न करीत आहे, असं निती
आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी आणि दिघी
पोर्ट औद्योगिक क्षेत्र विकासाचा कांत यांनी आज शेंद्र्याच्या
ऑरिक सिटीत सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ऑरिक सिटीत सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे आगामी
काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगांची
भर पडणार आहे. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल तसंच चिकलठाणा विमानतळाचं
विस्तारीकरण झाल्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची वाहतूक सुरु होईल. यामुळे
उद्योगांबरोबरच पर्यटनालाही
चालना मिळेल. परिणामी औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास मदत होईल. या
विकासात्मक बदलासाठी निती आयोग निश्चितच सहकार्य करेल, असं
त्यांनी सांगितलं.
****
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता
आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या
भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत १८ ते ३२ वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना
व्यावसायिक तसंच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज
उपलब्ध करुन दिले जातं. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त
अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असं मलिक
यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय
समित्यांमध्ये मुस्लिम साहित्यिकांची नियुक्ती
करण्यात यावी, अशी मागणी उर्दू मराठी साहित्य
परिषद आणि अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेनं केली आहे. या दोन्ही
समित्यांची नुकतीच पुनरर्चना करण्यात आली असून यात एकाही मुस्लिम साहित्यिकाचा समावेश नाही. मुस्लिम मराठी
साहित्यिकांपैकी किमान चार साहित्यिकांचा समावेश करावा,
अशी मागणी परीषदेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना
पाठवलेल्या पत्रात केली आहे.
****
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील
प्रलंबित याचिकेवर येत्या २१ जूनपर्यंत निर्णय अपेक्षित असून या निकालानंतरच आपली
भूमिका स्पष्ट करु असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. परभणीत ते
आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्यातील मागासवर्गीयांना एकजूट करण्यासाठी आपण दौरा करत आहोत अशी माहिती
त्यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील
सरकारनं केलेल्या अक्षम्य चुकांमुळे मागासवर्गीयांच्या
पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
भारतीय अन्न महामंडळ- एफसीआईनं
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना
७० लाख टनांहून अधिक मोफत अन्न धान्य पुरवठा केला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक
लाभार्थी परिवाराला दरमहा ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जातात. येत्या
नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या जवळपास ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ देण्याची
घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली
आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक औषध रेमडिसिविर वरील वस्तू आणि सेवा कर- जीएसटी ५ टक्के करण्यास वस्तू आणि सेवा कर परिषदेनं सहमती दर्शवली
असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला
सीतारामण यांनी दिली. त्या नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होत्या. या आधी या
औषधीवर १२ टक्के कर होता. म्युकरमायकोसीस बुरशीच्या आजारावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एमफोटेरिसिन-बी
या औषधीला जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आल्याचंही सीतारामण यांनी सांगितलं.
परिषदेनं येत्या सप्टेंबरपर्यंत ही सूट दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
केंद्र सरकारनं आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विषाणू
प्रतिबंधक लसीच्या २५ कोटी ८७ लाखहून अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापैकी
आतापर्यंत २४ कोटी ७६ लाख मात्रा वापरल्या गेल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं
सांगितलं आहे, यामध्ये निकामी झालेल्या मात्रांचाही
समावेश आहे. येत्या तीन दिवसात आणखी १० लाख ८१ हजार मात्रा उपलब्ध करुन दिल्या
जाणार असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड -सोयगाव मतदार
मतदारसंघातील पोलीसांना राहण्यासाठी निवासस्थान आणि पोलीस चौकी उपलब्ध करुन
देण्यात येईल, एक पथदर्शी प्रकल्प म्हणून हा प्रयोग
विचाराधीन आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यभर हा
प्रकल्प राबवणार
असल्याची घोषणा महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल
सत्तार यांनी केली आहे. सिल्लोड इथं सत्तार यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस
ठाण्याच्या नूतन इमारतीचं तसंच महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या
महिला विश्रांती कक्षाचं लोकार्पण आज झालं, त्यावेळी ते बोलत
होते. सोयगाव, फर्दापूर आणि अजिंठा इथल्या पोलिस ठाण्याच्या
जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रस्ताव सादर केल्यास तिन्ही
पोलीस ठाण्याला लवकरच नवीन इमारतीसाठी मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी
यावेळी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात आज नऊ
कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सहा, अहमदनगर जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश
आहे. दरम्यान, घाटीत आज नऊ नवे रुग्ण दाखल झाले तर नऊ जणांना
सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात आज १५ बाधित रुग्ण
आढळले तर ४६ जण बरे होऊन घरी गेले. उपचारादरम्यान
दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात २६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ७७५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना
विषाणूमुक्त झालेल्या ८४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९
हजार ३०७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ४१८ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
परभणी शहरातील स्मशानभुमीत विद्युत वाहिनी उभारण्यासाठी
महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ५१ हजार रुपयांचा निधी दिला आहे. महापालीका आयुक्त
देविदास पवार यांनी स्मशानभूमी आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी
बॅंकानी, उद्योजकांनी मदत करण्याचं आवाहन
केलं होतं.
****
औरंगाबाद शहरात परवा १४ जूनपासून ६ नवीन बसेस सुरू करण्यात येणार असल्याचं
स्मार्ट शहर बस विभागातर्फे सांगण्यात आलं. कोविड १९ प्रतिबंधक
निर्बंध शिथिल झाल्यानंतर गेल्या आठ जूनपासून शहर बससेवा सुरु झाली आहे.
****
कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं पोलंड इथं झालेल्या वरसाई क्रमवारी श्रृंखला
स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं आहे. फोगटनं युक्रेनच्या
की क्रिस्टिना हिचा पराभव करत हा विजय मिळवला.
****
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसह
दोन बस आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार आहे, अशी माहिती
संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे प्रशासक समितीतील सदस्य ॲडव्होकेट
बाळासाहेब गंभीरे यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे केवळ एका
बसमधून पालखी पाठवण्यात आली होती, यंदा राज्य शासनानं निर्बंध शिथिल केल्यानं दोन बसमधून ६० वारकरी या
पालखी समवेत जाणार आहेत, राज्य शासनाकडून अधिकृत परवानगी
आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असंही गंभीरे यांनी सांगितलं.
//*********//
No comments:
Post a Comment