Sunday, 13 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** देशात लाभार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी २५ कोटींहून अधिक मात्रा

** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये नऊ तर जालन्यात सहा रुग्णांचा मृत्यू

** गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

आणि

** औरंगाबाद इथून २६ जून पासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात- आमदार विनायक मेटे

****

देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक सीच्या २५ कोटींहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल देशभरात ३१ लाख, ६७ हजारांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. त्यापैकी ४ कोटी ८२ लाख नागरिकांना लसीच्या दोन्हीही मात्रा दिल्यानं त्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून १४८ दिवसात देशानं हा टप्पा ओलांडला आहे. यात ४ कोटीपेक्षा जास्त मात्रा १८ ते ४५ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना दिल्या असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय-घाटीत गेल्या चोवीस तासांत नऊ कोविड बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यात आठ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले तर एक रुग्ण अकोला जिल्ह्यातला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. घाटी रुग्णालयात आतापर्यंत दोन हजार ८५७ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, घाटीत आज या संसर्गाचे आठ नवे रुग्ण दाखल झाले असून सध्या एकूण २५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज सोळा जणांना ते या संसर्गातून बरे झाल्यानं सुटी देण्यात आली आहे. घाटी रुग्णालयात आतापर्यंत दहा हजार दोनशे ४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्यांची एकूण संख्या एक हजार ५६ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार, ७९७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार, २३८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ४३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे १०८ रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २७ रुग्ण आष्टी तालुक्यात, त्याखालोखाल केज तालुक्यात २४, बीड तालुक्यात १३, अंबाजोगाई ९, शिरुर आणि वडवणी ८, माजलगाव ६, परळी-पाटोदा-धारुर प्रत्येकी चार आणि गेवराई तालुक्यातील एक याप्रमाणे बाधित आढळले.

****

राज्यातल्या गड-किल्ल्यांचं पावित्र्य टिकवत त्यांचं संवर्धन करण्याचं काम सुरू असून दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी याबबत आपल्या सूचना-प्रस्ताव आपल्या सचिवालयातल्या संकल्प कक्षाकडे पाठवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील अडीचशे दुर्गप्रेमींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत त्यांच्या सुचना जाणून घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. किल्ल्यांच्या संवर्धनातल्या अडचणी दूर करण्यासाठी पुढं येत कामाला सुरुवात करावी असंही ते यावेळी म्हणाले. या संवर्धनाच्या कामासाठी  दुर्गप्रेमी-अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचना विचारात घेत नियोजनबध्द आराखडा तयार करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दूर्ग संवर्धनासाठीच्या  सुचना ‘सीएम’ ‘संकल्प कक्ष’ @ महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन  या ईमेलवरही पाठवता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

****

संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे प्रास्ताविक भाषण करणार आहेत. भविष्याच्या परिप्रेक्ष्यात जमिनीचा ऱ्हास, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या विषयावर हे चर्चासत्र असणार आहे. जगातलं जमिनीचं वाळवंटीकरण रोखण्याच्या हेतून संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेल्या परिषदेच्या १४ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष या नात्यान मोदी संबोधित करतील. संयुक्त राष्ट्रांनी चालू दशक हे "वाळवंटीकरणाला आवर आणि परिसंस्थांचं पुनर्वसन" याकरता समर्पित असल्याचं जाहीर केलं आहे. हवामान आणि जैवविविधतेच्या रक्षणाकरता विविध उपाययोजनांवर या चर्चासत्रात विचारविनिमय होणार आहे.

****

राज्यात पाचही वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री कायम राहील हे अगोदरच ठरलं असल्याचं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते  आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणं गैर नाही, अनेकांना तसं वाटत असतं असं ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आता दिल्लीत मोर्चा काढून केंद्र सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देणं योग्य असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

****

औरंगाबाद इथून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जून पासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर  आपण राज्याचा दौरा करत असल्याचंही त्यांनी आज औरंगाबादमध्ये समाज बांधवांशी संवाद साधल्यानंतर एका पत्रकार परिषदेत सांगितलं. येत्या पाच जुलै पर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर येत्या सात जुलैपासून सुरु होणारं राज्य विधीमंडाळाचं पावसाळी आधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं हे आरक्षण घालवलं असून यासंदर्भात समाजात चीड असल्याची टीका मेटे यांनी यावेळी केली.

****

जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर आज सकाळी खासगी बस आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील एक महिला ठार झाली तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील तीन लहान मुलांसह दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जालन्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त प्रवासी सोलापूर जिल्ह्यातल्या म्हाडा तालुक्यातल्या चांदर इथले रहिवासी असून, ते जालन्यातल्या रामनगर इथं विवाहसोहळ्यासाठी येत असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असून जिल्ह्यातल्या कंधार, लोहा, अर्धापूर या तालुक्यांत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणी सुरू केली आहे. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोयाबीनंचं वाढीव उत्पादन देणारं `वंरबा सरी` तंत्रज्ञान या भागात उपयोगात आणलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

उस्मानाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील गमावलेल्या अठरा वर्षाखालील मुलांना शिवसेना जिल्हा कार्यकारिणीतर्फे आज प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य म्हणून मुदतठेव प्रमाणपत्र देण्यात आलं. राज्याचे पर्यटन मंत्री - शिवसेना युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

****

जागतिक कसोटी विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेटसंघ दोन दिवसांचा अंतर्गत सराव सामना खेळून तयारी करत आहे. सौदम्पटनमध्ये दहा दिवसांच्या विलगीकरणादरम्यान हॅम्पशायर इथं हा सामना खेळला जात आहे. तीन महिन्यांच्या या दौऱ्यात भारतीय संघ अठरा जूनपासून न्यूझीलंडबरोबर जागतिक कसोटी विश्वचषक विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक क्लब अथवा काउंटी संघाशी सराव सामना खेळायची भारतीय संघाला परवानगी नसल्यानं अंतर्गत सराव सामन्याद्वारे त्याची उणीव भरुन काढली जात आहे.

****

महाराणा प्रतापसिंह यांची आज जयंती. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून पराक्रमाचा महान वारसा मिळाला आहे. उत्कृष्ट सेनानायक, मूर्तीमंत त्याग, शौर्याचे प्रतिक असलेल्या अशा या महान योद्ध्याला जयंतीनिमित्त शतशः नमन करत असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त आज नांदेड इथं त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केलं.

//********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...