Saturday, 19 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा

** आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळ मोफत बसगाड्या पूरवणार

** पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात चर्चा

आणि

** शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार

****

देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा इशारा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजेच एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. सध्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्याचं दिसत असल्यानं, निर्बंध शिथील झालेले असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आपण अधिक सावध राहण्याची गरजही गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.

****

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात २ कोटी ८७ लाख कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रा उपलब्ध असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत मंत्रालयानं २८ कोटी ५० लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे.

****

कोविडग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ३२ हजार ४६४ मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायु आतापर्यंत देशाच्या विविध भागात ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे पोहचवला असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. ४४८ गाड्यांद्वारे १५ राज्यांमध्ये प्राणवायू पोहचवण्यात आला आहे.

****

आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मुंबईत आज ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीनं करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान महामंडळाला मिळाल्याबद्दल परब यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १९ जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसंच प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असंही परब यांनी सांगितलं. 

****

यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी तसंच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगळूरु इथं भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीदरम्यान येणाऱ्या काळात कृष्णा आणि भीमा नद्यांच्या पूराचं नियंत्रण कशा पध्दतीनं करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीनं दोन्ही राज्यानं समन्वय ठेवता येईल याची चर्चा झाली.

ासंदर्भात माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. 

एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रातील पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॉमिकली आपण जर कंट्रोल ठेवला तर मग कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची
आणि खास करुन अलमट्टीची वर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशी चर्चा झाली. मला खात्री आहे की, आलेल्या पावसाळ्यात आणि पुढे देखील या पद्धतीत अधिक सुधारणा होत जाईल. या वर्षीच्या पावसाळ्यातील येणाऱ्या संभाव्य पुराची येईलचं असं नाही, पण जर आलाच पूर तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्वय चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे.

****

राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात दुपारी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सावित्री, गंधारी, कुंडलिका, आंबा, गाडी, उल्हास, पाताळ गंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वडखळ ते अलिबाग मार्गावर पर्यटकांची वाहनं मोठ्या प्रमाणात जमली असून कार्ले खिंडीत पर्यटकांची अँटीजेन चाचणी सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटनाला बंदी आहे, पोलिस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड इथ महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महागाई विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं केंद्र सरकार विरूध्द तीव्र निदर्शन केली. परभणी जिल्ह्यातही जिंतूर इथं कॉंग्रेसच्यावतीनं शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथं एक एकर जागेमध्ये तीन हजार वृक्ष लागवडीची मोहीम आजपासून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. आनंदवन घनवन योजनेतून एकाच जागी विविध प्रकारचे तीन हजार वृक्ष लागवड करून मियावाकी मिशन २०२१ बळकट करण्यासाठीची ही मोहीआहे.

****

शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीनं राज्यातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. वर्धापन दिन, कोरोना लसीकरण, रक्तदान शिबिरं, शैक्षणिक साहित्यांचं वाटप आदी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

****

सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाकडून दिव्यांगांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबवण्यात आली, यामध्ये दोन हजार जणांना लसीच्या मात्रा देण्यात आली असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींचे तातडीनं लसीकरण पुर्ण करुन घेण्याचा सूचना होत्या. त्यानुसार ही मोहीम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण विशेष मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. या मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून ठाकरे यांनी या विषाणुच्या उच्चाटनासाठी सर्वांना सरकारी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

****

लातूर शहरात उद्यापासून ३० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक हजार १३४ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३८ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ९९६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ५४६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे मंगल कार्यालयांना टप्याटप्यानं कार्यक्रमासाठी परवानगी मिळवून देण्यात येईल असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. लातूर  जिल्ह्यातील मंगल कार्यालयं पूर्ववत सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी मंगल कार्यालय संघटनेच्या शिष्टमंडळानं आज लातूर इथं देशमुख यांची भेट घेऊन  केली, त्यावेळी ते बोलत होते. व्यावसायिकांच्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून मार्गदर्शक सुचनांचं पालन करीत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 20 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...