Saturday, 5 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

स्वच्छ उर्जेचे अनेक फायदे भारताच्या कृषी क्षेत्रात पोहोचले पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. वातावरण बदलामुळे येत असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. प्लास्टिकचा वापर थांबवण्याच्या अभियानात देशाचा प्रत्येक नागरिक सहभागी होणं गरजेचं असून, भारतानं आतापर्यंत केलेल्या प्रयत्नातून करोडो टन कार्बन उत्सर्जन थांबवलं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. पुण्यात तीन ठिकाणी उभारलेल्या ई - १०० इंधन वितरण स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि २०२० ते २०२५ या काळात भारतात इथेनॉल मिश्रण आणखीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अहवालाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.      

****

जागतिक पर्यावरण दिन आज राज्यभरात विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर शहरात पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सीड बॉल बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. दोन दिवसांपासून तालुक्यातल्या विविध डोंगरावर हे सीड बॉल फेकण्यात येत आहेत.

सोलापूर इथं महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं.

****

येत्या सोमवारपासून राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल होत आहेत. त्यासाठी सरकारने कोविड बाधित रुग्णांची संख्या आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन खाटा याच्या आधारावर जिल्ह्यांचं पाच टप्प्यात वर्गीकरण केलं आहे.

जालना जिल्हा पहिल्या गटात असून, जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु होतील. उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट असून, जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसह इतर दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवारी आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

****

ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना उत्पादनं आणि सेवांसंदर्भात मदत उपलब्ध करून देण्यासाठी, सामाजिक न्याय मंत्रालयानं ‘सेज’ म्हणजेच, सिनियर केअर एजिंग ग्रोथ, हे पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते काल झालं. विश्वासार्ह स्टार्ट अप उद्योगांच्या सहाय्यानं ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेली घरगुती किंवा आरोग्य विषयक उत्पादनं आणि सेवा उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश आहे.

****

गेल्या वर्षी मार्चपूर्वी भारतात आलेल्या आणि कोविड-19 मुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे इथेच अडकलेल्या परदेशी प्रवाशांच्या व्हिसाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांच्या व्हिसाची मुदत संपली असेल त्यांना वाढीव मुदतीसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.

****

कोविड-19 रुग्णांसाठी आवश्यक ठरणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची मूळ किमतीपेक्षा कितीतरी अधिक किमतीनं विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्यानं, त्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं निर्बंध जारी केले आहेत. केंद्रीय औषध मूल्य प्राधिकरणानं, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या किमतीचे व्यापारी मार्जिन ७० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवता येणार नसल्याचं जाहीर केलं आहे. नऊ जूनपासून हे नवीन नियम लागू होणार असून, ते ३० नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहेत.

****

जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओ उस्मानाबाद मध्ये शंभर खाटांचं फिरतं कोविड सेंटर उभं करणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हा पहिलाच प्रयोग असून, पाच राज्यातल्या प्रत्येकी एका जिल्ह्याची यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी लागणारं साहित्य उस्मानाबादेत दाखल झाले असून, शहरात किंवा ग्रामीण भागात हे रुग्णालय कमीत कमी वेळात हलवण्यात येणार आहे. लवकरच हे रुग्णालय सुरू होणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.

****

वाशीम जिल्ह्यातल्या साखरा इथल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामासाठी निती आयोगामार्फत दोन कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक दर्जासाठी आणि विविध अत्याधुनिक संसाधनासाठी ही शाळा सूपरिचित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात रासायनिक खताची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्हास्तरीय भरारी पथकाने तुळजापूर तसंच उमरगा परिसरात तपासणी करून ही कारवाई केल्याची माहिती, परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली. कारवाई केलल्या दुकानांमध्ये तुळजापूर इथल्या कृष्णा एजन्सी, तसंच उमरगा इथल्या लक्ष्मी कृषी सेवा केंद्र, आणि विशाल कृषी एजन्सीचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथंही आज पहाटे जोरदार पाऊस झाला. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या दोंडाईचा परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली तर विजेच्या तारा तुटून पडल्या.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीनं मुख्यमंत्री सहयाता निधी ‘कोविड-१९' अंतर्गत २० लाख ६८ हजार रुपये रकमेचा धनादेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे काल सुपूर्द केला. आतापर्यंत ८१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...