Saturday, 12 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन आपली गावं कोरोनामुक्त ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरपंचांना आवाहन.

·      कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपवण्यात आली नसल्याचा राज्याच्या आरोग्य विभागाचा खुलासा.

·      आषाढी एकादशी वारीसाठी फक्त दहा पालख्यांनाच बसमधून जाण्यास परवानगी.

·      राज्यात १२ हजार २०७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २९ जणांचा मृत्यू तर ५६२ बाधित.

·      ब्रेक दी चेनच्या निकषांनुसार परभणी जिल्ह्याचा पहिल्या स्तरात तर हिंगोली जिल्ह्याचा दुसऱ्या टप्प्यात समावेश.

आणि

·      महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचा फायदा करणारे निर्णय घेतल्याची माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची टीका.

****

कोविड विषाणू संसर्गाची तिसरी लाट येणार की नाही हे कोरोनाला न ठरवू देता, गावांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, आणि आपली गावं कोरोनामुक्त ठेवावीत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंचांना केलं आहे. काल औरंगाबाद, अमरावती, नागपूर या तीन विभागातल्या १९ जिल्ह्यांतल्या सरपंचांशी साधलेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी सावधानता बाळगत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. प्रत्येक गावाची एक ग्रामभाषा असते, या भाषेच्या माध्यमातून गावात कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करावी, दवंडीचा उपयोग करावा, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक गावांच्या सरपंचांची मतं जाणून घेतली.

औरंगाबाद नजिक कुंभेफळच्या सरपंच कांताबाई मुळे यांनी आपलं गाव कोविडमुक्त राहील, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांशी संवादाच्या आपल्या अनुभवाबद्दल आकाशवाणीशी बोलताना कांताबाई मुळे म्हणाल्या –

कोविड रोगाची साथ सुरू झाली तेव्हापासून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांचे व शासनाच्या निर्णयाचे पालन करून गावात कमी कोरोना रुग्ण राहतील यावर भर दिला. ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करून घेतले. ग्राम पंचायत तर्फे बांधलेल्या दवाखान्यामध्ये ग्राम पंचायतने कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन केले आहे. आमच्या गावात मागच्या महिन्यांत कोरोना पेशंट ९० होते. आता एकही कोरोना पेशंट नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या संवाद साधला. त्यामधे त्यांनी कोरोनामुक्त गाव चळवळ व्हावी असे म्हटले. त्यानुसार आमचे गाव कोरोनामुक्त झालेले आहे. यापुढेही कोरोनामुक्तच राहील.

 

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या खादगावाने कोविड काळात आपला वेगळा पायंडा निर्माण केला. या गावाने साध्य केलेल्या यशाची माहिती मुख्यमंत्र्यांनी सरपंच सावित्रीबाई राजेश फड यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेतली.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिंगोली गावचे सरपंच येडबा शितोळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला. ते म्हणाले –

माझं गाव कोरोनामुक्त गाव या संदर्भातून शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशाताई कार्यकर्ती यांच्याकडे ४० कुटुंबांची जबाबदारी देऊन दररोज त्या ४० कुटुंबांची तपासणी केली. गावामधे ३३ बेडचे विलगीकरण कक्ष लोकसहभागातून ओपन केले होते. सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप ग्राम पंचायत मार्फत केले होते. ४५ ते ६० वयोटातील ८० टक्के लोकांना लस मिळालेली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपवण्यात आली नसल्याचा खुलासा राज्याच्या आरोग्य विभागानं केला आहे. कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपवण्याचा प्रश्नच येत नाही, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि, ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि महापालिका यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला जातो असंही विभागातर्फे सांगण्यात आलं.

****

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी वारीसाठी फक्त दहा पालख्यांनाच बसमधून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील, प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाही पायी वारीला परवानगी दिलेली नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात उभारण्यात येणाऱ्या २५ हजार मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पातंर्गत १७ हजार मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या निधोना उपकेंद्राचे ई - लोकार्पण महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयातून ऊर्जामंत्री राऊत यांच्या हस्ते काल झालं. त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अंतर्गत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे प्रकल्प येणार असून रोजगार वाढीला चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. टाळेबंदीनंतर अनेक संघटनांनी वीज देयकाच्या माफी संदर्भात मागणी केली आहे. मात्र, वीज देयकाची माफी होवू शकत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले –

जी जी मंडळी वीज वापरत असेल, त्या लोकांनी वीजेचं बील तर भरलंच पाहिजे. परंतू त्यांना जर काही अडीअडचणी असतील तर आमच्या अधिकाऱ्यांचे ॲप्स आहेत, त्या ॲपवर जावं. आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवावी. त्यांना जर हफ्ते पाडून पाहिजे असतील. तर हफ्ते सुद्धा त्याठिकाणी पाडून दिले जातील, सवलत दिली जाईल, परंतू वीजेची माफी होवू शकत नाही आणि होवू शकरणार नाही. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण वीजेची जी माफी आहे ते देण्याचं काम राज्य सरकारचं असतं केंद्र सरकारचं असतं. ते काही खात्याचं असतं. कारण खातं हे सार्वजनिक कंपन्या आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत. आणि त्यामुळे ते करता येणे शक्य नाही.

 

विदर्भ, मराठवाड्यातल्या उद्योगांसाठी वीज देयकात असलेलं अनुदान बंद झालेलं नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, वीज देयकातली शासनाकडे जमा होणारी रक्कम माफ करावी, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन महासंघाच्या वतीनं ऊर्जामंत्र्यांना देण्यात आलं.

औरंगाबाद नजिक वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या ३३ किलोव्हॅट उपकेंद्राचं लोकार्पणही राऊत यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

****

राज्यात काल १२ हजार २०७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख ७६ हजार ८७ झाली आहे. काल ३९३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख तीन हजार ७४८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७७ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ४४९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख आठ हजार ७५३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ४५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ६० हजार ६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ५६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २९ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या १०, औरंगाबाद ९, परभणी ३, बीड आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि उस्मानाबाद-हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १३० नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद १२३, औरंगाबाद ११३, लातूर ६३, जालना ४५, नांदेड ४४, परभणी ३३ आणि हिंगोली जिल्ह्यात ११ नवे रुग्ण आढळून आले.

****

ब्रेक दी चेनच्या नव्या निकषांनुसार परभणी जिल्ह्याचा पहिल्या स्तरात तर हिंगोली जिल्ह्याचा दुसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल सायंकाळी एक आदेश काढून १४ जून पासून काही निर्बंध शिथील केले आहेत. सामाजिक सांस्कृतिक, क्रीडा तसंच करमणुकीचे कार्यक्रम नियमित सुरु होतील, लग्न समारंभात १०० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्ययात्रा आणि अंत्यविधींना ५० जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही सुधारित आदेश जारी करुन जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकानं आजपासून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद असतील. धार्मिक जत्रा, यात्रा, उरुस, तसंच मिरवणुकांनाही पुढील आदेश येईपर्यंत बंदी असेल.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अधिक सजगतेनं काम करण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. ते काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते. लहान मुलांसाठी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी आवश्यक सूचना केल्या.

औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाच्या वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते काल करण्यात आलं. जिल्हा नियोजन आणि विकास निधीतून ही वाहनं पोलिस दलाला प्राप्त झाली आहेत.

औरंगाबाद शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत खाम नदी पुनरूज्जीवन विकास प्रकल्पाच्या कामाची पालकमंत्र्यांनी काल पाहणी केली.

****

महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचा फायदा करणारे निर्णय घेतल्याची टीका राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे सरकारने उंबरठा उत्पादन तीन वर्षाकरिता गोठवलं, त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न मिळता, विमा कंपन्यांना लाभ झाल्याचं बोंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले –

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना २०१९ मध्ये १२८ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता, त्यापैकी ८५ लाख शेतकऱ्यांना पाच हजार ७९५ कोटी रुपयांचा विमा मिळाला. आणि उद्धव ठाकरे सरकारने उंबरठा उत्पादकता घटवली, हवामानाचे निकष बदलवले आणि परिणाम हा झाला की, २०२० मध्ये १३८ लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. त्यापैकी फक्त १५ लाख शेतकऱ्यांना ९७४ कोटी रुपयांचा विमा प्राप्त होतो आहे. आणि कंपन्यांना चार हजार २३४ कोटी रुपयांचा नफा होत आहे.

****

लातूर शहरातल्या शिवाजीनगर भागात घराच्या परिसरातली दोन झाडं परवानगी न घेता अनधिकृतपणे तोडल्याबद्दल महानगरपालिकेनंनं संबंधित नागरिकाला एक लाख रुपये दंड ठोठावला. झाडं तोडण्यास मदत करणाऱ्या पालिकेच्या उद्यान विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यालाही १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसंखेच्या तिप्पट म्हणजे ४५ लाख झाडं लावण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केला आहे. जागतिक पर्यावरण दिनापासून वृक्ष लागवडीला प्रारंभ झाला, काल उस्मानाबाद तालुक्यात पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपणानंतर कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या –

यामधे घनदाट वृक्षलागवडीवर आपण जास्तीत जास्त भर देत आहोत. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तीन पट वृक्ष लागवड करण्यावर भर आहे. ग्राम पंचायत पातळीवर गावातल्या प्रत्येक पीएचसी असेल, शाळा परिसर असेल त्याचबरोबर जनावराचे दवाखाने असतील, प्रत्येक शासकीय कार्यालयामधे कुठेही जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी घनदाट वृक्ष लागवड करण्यावर आपण जास्तीत जास्त भर देत आहोत. आणि आता या कोरोनाच्या काळामधे जिथे ऑक्सिजन बेड कमी होते, किंवा आरोग्याच्या सुविधा कमी होत्या. जास्तीत जास्त वृक्ष लागवड जर झाली तरी आपण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करू शकतो. तर या काळामधे ऑक्सिजनची जी कमतरता होती किंवा या पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल आपण या वृक्ष लागवडीने साधू शकतो.

 

दरम्यान, उस्मानाबाद शहरात वृक्ष लागवड करण्यासाठी महिला मंडळांनी पुढाकार घेतला आहे. धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनच्या नेतृत्वात शहरातील २२ महिला मंडळांनी उपजिल्हाधिकारी रूपाली आवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वृक्षलागवडीचा संकल्प केला.

****

लातूर जिल्ह्यातील मुरुडचे स्वातंत्र्य सेनानी, सहकारमहर्षी शिवाजीराव तुकाराम नाडे यांचं वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. लातूर -उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलं. त्यांच्या पुढाकारानं मुरुड परिसरात ग्रामविकासाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या. त्यांच्यावर आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.   

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...