Friday, 18 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी बीड जिल्ह्यातील आठ तर जालना जिल्ह्यात दोन तालुक्यात २० वसतिगृहं उभारण्यास मंजुरी.

·      जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादचे सहकार महर्षी अंबादास मानकापे यांच्यासह १२ जणांना अटक.

·      राज्यात नऊ हजार ८३० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २७ जणांचा मृत्यू तर ५८७ बाधित.

·      राज्यात कोकण तसंच कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मराठवाडा आणि विदर्भात काही भागात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

आणि

·      श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरच्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी देण्याची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागणी.

****

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. आरक्षण प्रश्नी मूक आंदोलनानंतर काल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर चव्हाण यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. पुनर्विचार याचिका व्यवस्थित दाखल करण्याच्या दृष्टीनं तयारी केली जात असल्याचं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमत्र्यांसमोर सात प्रमुख मागण्या मांडल्या असल्याची माहिती देखील चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले –

जवळपास सात मागण्या प्रामुख्याने त्याच्यामधे हॉस्टेल फॅसिलिटीसुध्दा आहे. त्या तिनही जिल्ह्यांमधे लवकर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. बाकीच्या कामासंदर्भात ज्या काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत, कोपर्णीच्या प्रकरणासंदर्भामधे लवकरात लवकर मेंशन करून ती केस लवकर लावण्यात यावी हा प्रयत्न शासन करणार आहे. ज्या नोकऱ्यासंदर्भातले विषय आहेत, केस टु केस तो विषय पहावं लागेल की नेमकं त्याच्यामधे काय करण्याची गरज आहे. या सर्व मागण्या अतिशय गतीमान पद्धतीने मार्गी लावण्याच्या बाबतीमधे मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.

 

सारथी संस्थेच्या प्रश्नांबाबत पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बैठक घेणार आहेत. या संस्थेला मागणीनुसार निधी देण्यास राज्य सरकार तयार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार आपल्या प्रत्येक मागणीच्या पाठीशी असून आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, असं सांगत आंदोलन मागे घेण्याचं आवाहन यावेळी केलं.

आपल्या मागण्यांविषयी राज्य सरकारनं सकारात्मक दृष्टीकोन दाखवला असल्याचं, खासदार संभाजीराजे यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. मात्र, त्याचवेळी आंदोलन अद्याप स्थगित झालेलं नसून, पुढील निर्णय २१ जून रोजी नाशिकमध्ये घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाने राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या, आणि त्या मागण्यांवर राज्य सरकारने दिलेलं आश्वासन याचा पाठपुरावा करण्यासाठी, समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं, खासदार संभाजीराजे यांना सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकारनंही समन्वयासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

****

मराठा आरक्षणप्रश्नी मागण्या पूर्ण करा अन्यथा पुढील गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे दिला आहे. आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावं. हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात येईपर्यत समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी, असंही उदयनराजे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएससीच्या इयत्ता दहावीचा निकाल २० जुलैला, तर बारावीचा निकाल ३१ जुलैला जाहीर केला जाणार आहे. काल सीबीएससीनं याबाबत घोषणा केली. जे विद्यार्थी आपल्या गुणांविषयी समाधानी नसतील, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी दिली. कोरोना महामारीमुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या.

दरम्यान, सीबीएससीनं बारावीच्या पर्यायी गुणांकनाचे निकष सर्वोच्च न्यायालयात काल सादर केले. त्यानुसार दहावी आणि अकरावीच्या गुणांचा प्रत्येकी ३० टक्के आणि, बारावीच्या गुणांचा ४० टक्के, याप्रमाणे निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावी आणि अकरावीमध्ये सर्वात जास्त गुण मिळालेल्या तीन विषयांचे गुण आधारभूत मानून मुल्यांकन केलं जाईल.

****

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात, निवडक दहा तालुक्यांत स्वतंत्र २० वसतिगृहं उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक पदभरतीसही मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत काल जारी करण्यात आला असून, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी, एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात, बीड जिल्ह्यातल्या पाटोदा, केज, बीड, गेवराई, माजलगाव, परळी तसंच जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यांत, ही वसतिगृह उभारायला मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक वसतीगृहात १०० मुलांची प्रवेश क्षमता असणार आहे.

****

शिव भोजन थाळी मोफत देण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं १४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल जारी करण्यात आला. नव्यानं सुरू झालेल्या शिवभोजन केंद्रांवरही १४ जुलैपर्यंत शिवभोजन थाळी मोफत मिळेल. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून राज्यात शिवभोजन थाळीचं मोफत वाटप करण्यात येत आहे

****

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्था -‘एनआयए’च्या पथकानं काल मुंबई पोलिस दलातले माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे. या पथकानं त्यांच्या मुंबईतल्या घरावर त्या आधी छापाही टाकला होता. `एनआयए`च्या विशेष न्यायालयानं त्यांना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये परवा झालेल्या हाणामारी प्रकरणी, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या सात आणि भारतीय जनता पक्षाच्या ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर दोन्ही पक्ष कार्यालयांबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

जळगाव इथल्या भाईचंद हिराचंद रायसोनी- बी एच आर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी पुणे इथल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने जळगाव, भुसावळ, जामनेर, पाळधी, धुळे, अकोला, औरंगाबाद आणि मुंबई इथं एकाच वेळी टाकलेल्या धाडसत्रात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली. त्यात जळगावचे दालमिल उद्योजक प्रेम नारायण कोगटा आणि हॉटेल, मद्य आणि सुवर्ण व्यावसायिक भागवत भंगाळे, औरंगाबादमधून आदर्श महिला नागरी सहकारी बँक, आदर्श पतसंस्था, आदर्श दूध डेअरीचे संस्थापक सहकार महर्षी अंबादास मानकापे, माजी मंत्री गिरीष महाजन यांचे स्वीय सहायक जितेंद्र पाटील यांचा समावेश आहे. पुणे इथल्या सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी दिनांक २५ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी बीएचआरचे तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे आणि साई मार्केटिंगचे संचालक सुनील झंवर तेव्हापासून फरार आहेत.

****

राज्यात काल नऊ हजार ८३० नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ४४ हजार ७१० झाली आहे. काल २३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १६ हजार २६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९५ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ८९० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ८५ हजार ६३६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ६४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ३९ हजार ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ५८७ कोविड बाधितांची नोंद झाली, तर २७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या आठ, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी सहा, जालना चार, परभणी दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात २२४ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद १२६, उस्मानाबाद ९३, जालना ४२, नांदेड ३८, लातूर ३५, परभणी २८, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळून आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जूनला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे आपले विचार व्यक्त करतील. नमो ऍप, माय गव्ह या संकेतस्थळावर, १९२२ किंवा १८०० - ११ - ७८०० या नि:शुल्क क्रमांकावर नागरिकांना आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. 

****

राज्यात कोकण तसंच कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. कोल्हापुरात रात्रभर झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. कोयना धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणाची पाणी पातळी वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरु असल्यानं सगळी धरणं भरली आहेत.

जालना शहरासह तालुक्यातल्या काही भागात, मंठा शहर परिसर तसंच भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई परिसरात काल पाऊस झाला. औरंगाबाद इथंही काल दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या.

दरम्यान, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र या तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची, तर मराठवाडा आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारनं परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. बीड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला जात असते, मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या दिंडीला परवानगी दिली नाही. वारीच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू नये, तसंच गहिनीनाथ गडाच्या वारीचा विषय हा लाखो भक्तांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय असल्यानं ही परंपरा अखंड चालू रहावी, यासाठी सरकारनं कोविड नियमांचं पालनं तसचं शासकीय नियमाप्रमाणे या वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

****

केंद्र सरकारच्या लक्ष कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय नामांकन प्राप्त झालं आहे. केंद्रीय स्तरावरील पथकानं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून, या रुग्णालयातल्या सर्व बाबींची पाहणी केली होती. यावेळी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, स्वच्छता, प्रसूती त्या संदर्भातील कौशल्य आणि ज्ञान याची माहिती देण्यात आली. तसचं माता मृत्यूदरही शून्यावर असल्यानं या गुणांच्या आधारावर, उपजिल्हा रुग्णालयास राष्ट्रीय नामांकन प्राप्त झालं आहे.

****

केंद्र सरकारच्या गरिब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, नांदेड जिल्ह्यातल्या एकूण २२ लाख ४४ हजार ३५२ लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो प्रमाणे, ५३ हजार ८९२ क्विंटल गहू, तर प्रति व्यक्ती दोन किलो प्रमाणे एकूण ३२ हजार ९५९ क्विंटल तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील सेलगाव इथले लाभार्थी नामदेव राजेगोरे यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या विषयी बोलतांना ते म्हणाले –

सेलगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड दुकान क्रमांक दोन या दुकानचा लाभार्थी आहे. शासनाने मोफत धान्य वाटपाची योजना राबवली त्याचा मला पूर्ण लाभ भेटलेला आहे. माझ्या घरामधे पाच सदस्य असून प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळतो. त्याबद्दल शासनाचे तसेच दुकानदाराचा मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.

****

हरित विद्यापीठ- स्वच्छ विद्यापीठ अभियानांतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल ‘वन महोत्सव २०२१’ साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात २५० वृक्षांची लागवड करण्यात आली.

****

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त काल उस्मानाबाद नगरपालिकेतील स्वच्छता विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना तसचं शहरातील गरीब होतकरू महिलांना सुमारे तीन महिने पुरेल एवढं किराणा सामानाचं वाटप करण्यात आलं.

दरम्यान, जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा प्रेमा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

****

इतर मागासवर्गीय प्रवर्गातलं राजकीय आरक्षण रद्द केल्याप्रकरणी काल ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. परभणी इथल्या गंगाखेड नजीक परळी नाका इथं कार्यकर्त्यांनी `रस्ता बंद` आंदोलन केलं. इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधला राजकीय प्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्य आणि केंद्र सरकारनं रद्द झालेलं राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही आंदोलकांनी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...