Wednesday, 10 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी नऊ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश

·      एकही महिला मंत्री नसल्याचा आक्षेप लवकरच दूर होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

·      राज्य विधी मंडळाचं येत्या १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेना नेते अंबादास दानवे यांची नियुक्ती

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे १ हजार ७८२ रुग्ण, मराठवाड्यात ८१ बाधित

·      माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची अधिकृत घोषणा

·      निवडणूक चिन्ह दाव्या संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची चार आठवड्यांची मुदत

·      ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त राज्यभर राष्ट्रगानसह विविध कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार

****

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या विस्तारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी नऊ कॅबिनेट मंत्र्यांचा मंत्रिमंड‍ळात नव्याने समावेश करण्यात आला आहे. मुंबईत राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटातून उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संदीपान भुमरे, दीपक केसरकर यांनी, तर भारतीय जनता पक्षाकडून, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगलप्रभाग लोढा, रविंद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या या सर्व नव्या मंत्र्यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं. मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधीत्व दिलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

नव्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांच्या समावेशावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राठोड यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचं वाघ यांनी सांगितलं.

या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, राज्यातल्या स्त्री शक्तीवर हा अन्याय असल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

****

नव्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा आक्षेप लवकरच दूर होईल, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, ज्यांना क्लीन चिट मिळाली आहे त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

****

राज्य विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबतचं पत्र काल जारी केलं. या अधिवेशनातलं कामकाज, अधिवेशनाचा कालावधी यासंदर्भात लवकरच कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल, अशी माहिती विधीमंडळातल्या सुत्रांनी दिली आहे.

****

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेना नेते अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केली होती.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ७८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ६२ हजार ५१९ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १५० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ८५४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, लाख दोन हजार ४८० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ८१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २४, औरंगाबाद २३, लातूर २१, जालना सहा, बीड तीन, तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस पात्र नागरिकांना मोफत देण्यात येत आहे. उस्मानाबाद इथल्या गट प्रवर्तक प्रमिला पवार यांनी हा बूस्टर डोस घेतल्यानंतर नागरिकांनाही खबरदारीची लस मात्रा घेण्याचं आवाहन केलं.

‘‘मी पवार प्रमिला किशनराव. प्राथमिक आरोग्य केंद्र, येडशी येथील आशा प्रवर्तक आहे. माझ्या अंडर शिंगोली हे गाव आहे. शिंगोली गावामध्ये तीन आशाताई माझ्या अंडर आहेत. आशाताई, बचत गटाच्या महिला आणि अंगणवाडी कार्यकर्ते यांनी कोविडच्या कालावधीमध्ये छान प्रकारे काम केलेलं आहे, कोविडचा फर्स्ट, सेकंड डोस त्यांनी घेतलेला आहे, त्याचपद्धतीने कोविडचा बुस्टर डोस घेतलेला आहे. आणि मी नागरीकांना आवाहन करत आहे की, कोविडचा बुस्टर डोस घेऊन स्वत: सुरक्षित रहावं, सर्वांना सुरक्षित करावं.’’

****

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून स्वराज्य संघटनेची अधिकृत घोषणा केली. या संघटनेचा लोगो, ध्वज आणि बोधवाक्याचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. शिव - शाहुंचे विचार हाच राष्ट्राचा विकास, असं या संघटनेचं बोधवाक्य असून, तुळजापूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संघटनेच्या राज्यातल्या पहिल्या शाखेचं उद्घाटन संभाजीराजे यांच्या हस्ते झालं. ही संघटना शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करेल, तसंच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठीही काम करेल, असंसंभाजीराजे यांनी सांगितलं.

****

धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हावर दाव्याच्या संदर्भात कागदोपत्री पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या ठाकरे गटाला, चार आठवड्यांची मुदत दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटाचा निवडणूक चिन्हाबाबतचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत, शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्याबाबत निकाल येईलपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, पक्षाच्या चिन्हावर निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते.

****

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग असलेल्या १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना काल ऑगस्ट क्रांतीदिनी अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण केलं, महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन छोडो भारत आंदोलनात ज्येष्ठ नेते लोकनायक जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरातले लोक सहभागी झाले होते, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

****

काँग्रेस पक्षाच्या आझादी गौरव पदयात्रांना कालपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी नऊ वाजता लाडसावंगी इथून या पदयात्रेला सुरुवात झाली, माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले.

****

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर सामुहिक राष्ट्रगान करण्यात आलं. शहरातल्या विविध शाळांचे आणि महाविद्यालयाचे सुमारे १६ हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते. खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी यावेळी राष्ट्रभक्तीपर गाण्यांवर नृत्य करत सगळ्याचं लक्ष वेधलं.

****

हिंगोली जिल्ह्यात काल जिल्हा परिषद शाळांच्या वतीनं हर घर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण असतानाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभाग घेऊन ग्रामस्थांना हर घर तिरंगा उपक्रमाची माहिती दिली.

****

परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त क्रीडा संकुलावर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येनं नागरिकांनी सामुहिक राष्ट्रगान केलं. यावेळी मानवी साखळी तयार करून क्रांतीविरांचा जयघोष करण्यात आला.

दरम्यान, परभणी इथल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून १५ ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज महिलांची प्रबोधन फेरी, ११ तारखेला सांस्कृतिक स्पर्धा, १२ तारखेला आरोग्य तपासणी, यासह परसबाग लागवड कार्यक्रम राबवला जात आहे.

****

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीनं काल तिरंगा मोटर सायकल रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायतींच्या वतीने रांगोळ्या काढून हर घर तिरंगाबाबत जनजागृती करण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे एक फूउचलून सध्या सुमारे साडे तीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या ५२ हजार ७३७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून धरणातला पाणी साठा साडे ९५ टक्क्यांवर गेला असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. जयवंत वाडकर, विजय पाटकर, विजय गोखले, विघ्नेश जोशी, पॅडी कांबळे, विशाखा सुबेदार हे मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतले कलाकार, तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आशिष शेलार, खासदार अनिल देसाई आदी नेते यावेळी उपस्थित होते.

प्रदीप पटवर्धन यांचं काल मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या ईसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे पैनगंगा नदीवरील हिंगोली जिल्ह्यातल्या शिऊर पुलावरून पाणी वाहत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा शेंबाळपिंपरी ते कळमनुरी हा मार्ग कालपासून बंद झाला असून, या मार्गावरची बस वाहतुकही ठप्प झाली आहे.

दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातलं सिद्धेश्वर धरण पूर्ण  भरल्यानं धरणाच्या १४ पैकी दोन दरवाज्यातून काल सक हजार ६४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आलं. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पूर्णा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

****

हवामान:

येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा, तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर जालना, बीड, आणि लातूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...