Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 13
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद.
· समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र
वैध-जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दिलासा.
· औरंगाबाद इथं अग्निपथ भरतीत
पहिल्या दिवशी १ हजार ३०० युवकांचा सहभाग.
आणि
· जालना इथल्या उर्मी संस्थेचे
विविध राज्य पुरस्कार जाहीर;उद्या वितरण.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी वर्षाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाला आजपासून
सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘घरोघरी तिरंगा हे अभियान
मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू असून, त्यामुळे राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची मोठी
लाट आली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अमृत महोत्सवानिमित्त
मुंबईत हॉटेल ताज महल इथं एका कार्यक्रमात शिंदे बोलत होते.
मुंबईत
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि लायन्स इंटरनॅशनल क्लब यांनी बेलापूर इथल्या एकता विहार
इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रध्वजाचं वाटप
करण्यात आलं. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या जवानांनी मोटारसायकल फेरी काढली.
औरंगाबाद
जिल्ह्यात या उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. शहराच्या
सर्वच भागात अनेक नागरिकांनी आपापल्या घरांवर, दुकानांवर तसंच आस्थापनांवर तिरंगा ध्वज
उभारला आहे. हा ध्वज घेण्यासाठी आज सकाळीही नागरिकांनी टपाल कार्यालयं, तसंच महापालिकेच्या
प्रभाग कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागानं शहरातील
पुरवठादारांच्या मार्फत एक लाख २१ हजार ध्वज खरेदी करुन मोफत वाटप केल्याची माहिती
महापालिकेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे. परवा स्वातंत्र्यदिनापर्यंत हे ध्वज रात्रंदिवस
फडकते ठेवता येणार आहेत.
औरंगाबाद
इथल्या सुभेदारी विश्रामगृहासमोरच्या सिटीसेंटर इथं उभारण्यात आलेल्या शंभर फूट स्मारक
ध्वजाचं लोकार्पण, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते आज करण्यात
आलं. सामाजिक दायित्व निधीतून डीके फ्लॅग फाऊंडेशनच्या वतीनं हा शंभर फूट उंच राष्ट्रध्वज
उभारण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली. शहरात
यामुळे आता अशा पद्धतीच्या उंच ध्वजस्तंभांवरच्या राष्ट्रध्वजांची संख्या तीन झाली
आहे.
****
केंद्रीय
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन इथल्या निवासस्थानी कुटुंबियांसमवेत
तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर बोलताना दानवे यांनी, प्रत्येक नागरिकाने हर घर तिरंगा
अभियानात सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असं आवाहन केलं. दानवे यांच्या
हस्ते आज अनेक शाळा, महाविद्यालयांमध्येही ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान, हर घर तिरंगा
अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह घराघरावर आज तिरंगा ध्वज
फडकवण्यात आला.
****
बीड
इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज वाहन फेरी आणि एकता दौड काढण्यात आली. या
उपक्रमाला बीडवासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण
करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते या दौडला सुरवात करण्यात आली. दौडमध्ये
सहभागी झालेल्या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त प्राचीन नळदुर्ग किल्ल्यावर, तुळजापूरच्या
तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारावर आणि महसूल उपविभाग कळंब यांच्या निजामकालीन कार्यालयवर
भारतीय ध्वजाच्या रंगांनी रोषणाई करण्यात आली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या सुवर्ण
महोत्सवी वर्षाला यावर्षी प्रारंभ होत आहे.
****
तृतीयपंथीय,
उपेक्षित आणि वंचितांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार आहे, असं राज्यपाल
भगतसींग कोशारी यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या
'स्नेहालय' पुनर्वसन संकुलात 'युवा प्रेरणा शिबिराचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते
करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते स्नेहालयात सामाजिक काम
करणाऱ्या व्यक्तींचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी स्नेहालय
संस्थेला १० लाख रुपये मदत जाहीर केली. याप्रसंगी 'स्नेहालय'चे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी,
अध्यक्ष संजय गुगळे आदी उपस्थित होते.
****
सांगली
जिल्ह्यात पुराचे पंचनामे करण्याचं काम जवळपास पूर्ण झालं असून, सांगली कोल्हापूर इथल्या
नुकसानीबाबत जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या विटा इथं आमदार अनिल बाबर यांच्या
पत्नीच्या निधन झाल्यानं, बाबर त्यांचं सांत्वन करण्यासाठी आज शिंदे आले होते, त्यावेळी
त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही, अशी
ग्वाहीही शिंदे यांनी दिली. मंत्र्यांचं खाते वाटप झालं नसल्याबाबत विरोधकांच्या कडून
आरोप होत आहेत, आरोप करणं हे त्यांच कामच असल्याचंही शिंदे म्हणाले.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २४ लाख
४३ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०७ कोटी ७१
लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
अंमली
पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचं हिंदू महार हे जात
प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह चार जणांनी जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात
तक्रार केली होती. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगत
धर्माने मुस्लीम असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. मात्र, समीर आणि त्यांच्या वडिलांनी
मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही, तसे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
त्यामुळे या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने म्हटलं
आहे.
****
औरंगाबाद
इथं सुरु असलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीविरांच्या भरतीत आज १ हजार ३०० युवकांनी
सहभाग घेतला. या युवकांची शारिरीक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भरतीसाठी आलेल्या ज्या युवकांना या भरतीत
संधी नाही मिळणार नाही, त्यांना यापुढील पाच भरतीत सहभागी होता येणार असल्याचं, चव्हाण
यांनी सांगितलं.
****
साहित्य
क्षेत्रात कार्यरत असलेल्या जालना इथल्या उर्मी संस्थेच्यावतीने प्रतिभावंत कवी, कलावंतांना
देण्यात येणाऱ्या राज्य पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. उर्मीचे संस्थापक प्रा.
जयराम खेडेकर आणि सचिव डॉ. चंद्रकांत गायकवाड यांनी जालना इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा
केली. दिवंगत माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या स्मृतिपीत्यर्थ दिला जाणारा २०२१ चा
'नागमणी' पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महात्मा गांधी मिशन
औरंगाबादचे अंकुशराव कदम यांना, तर साहित्य क्षेत्रात भाषांतराच्या माध्यमातून योगदान
दिल्याबद्दल २०२२ चा नागमणी पुरस्कार नांदेडचे डॉ. पृथ्वीराज तौर यांना जाहीर झाला
आहे. 'कोलंबस पुरस्कार' कवितेच्या समग्र योगदानासाठी कवी प्राध्यापक जयराम खेडेकर यांना
जाहीर झाला आहे. एक लाख रुपये पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, असं
या पुरस्काराचे स्वरुप आहे. उद्या या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे
****
सोलापूर
जिल्ह्यातलं प्रस्तावित विमानतळ बोरामणी ऐवजी पंढरपूर इथं उभारण्याची मागणी भारतीय
जनता पक्षाचे नेते संतोष पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली आहे. विमान प्राधिकरणाने बोरामणी
परिसरात जमिन संपादित करून जवळपास दहा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही विमानतळाचं
काम झालेलं नाही असं पाटील म्हणाले.
****
No comments:
Post a Comment