Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 August
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१३ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
·
राज्यात ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू;१८ सप्टेंबरला मतदान
·
पोलिस तपास कार्यात उत्कृष्टतेसाठीची केंद्रीय गृहमंत्री पदकं जाहीर; राज्यातले
११ पोलिस तर सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांचा समावेश
·
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत हाय स्पीड बुलेट ट्रेनबाबत चर्चेला सुरवात;
मुंबई-नागपूर प्रवास तीन तासात-रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं सूतोवाच
·
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ९७५ रुग्ण
·
अग्निपथ योजनेअंतर्गत औरंगाबाद इथं आजपासून भरती प्रक्रियेला सुरवात
·
अतिवृष्टीग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सभागृहात आवाज उठवणार-विधान
परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
आणि
·
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा सह विविध उपक्रमांना
प्रारंभ
****
राज्यात पावसाचं प्रमाण कमी असलेल्या
विविध ५१ तालुक्यांतल्या ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक
निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस.
मदान यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. या सर्व ठिकाणी १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल,
असं त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी कालपासून आचारसंहिता लागू झाली
आहे.
यामध्ये मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या २४, किनवट ४७, अर्धापूर
एक, मुदखेड तीन, नायगाव चार, लोहा पाच, कंधार चार, मुखेड पाच, देगलूर एक, हिंगोली जिल्ह्यात
औंढा नागनाथ सहा, परभणी जिल्ह्यात जिंतूर एक तर पालम तालुक्यातल्या चार ग्रामपंचायतींचा
समावेश आहे.
****
पोलिसांना तपास कार्यात उत्कृष्टतेसाठी
दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री पदकं काल जाहीर झाली. राज्यातल्या ११ पोलिसांचा यामध्ये
समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबतचं पत्रक जारी केलं, त्यात दिलेल्या माहितीनुसार
महाराष्ट्रातले पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलिस निरीक्षक प्रमोद तोडरमल,
दिलीप पवार, दीपशिखा वारे, सुरेशकुमार राऊत, जितेंद्र वानकोटी, समीर अहिरराव, सहायक
पोलिस निरीक्षक मनोज पवार, राणी काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर आणि अजित
पाटील यांचा हे पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांना देखील तपासात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं
जाहीर झालं आहे.
****
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात
आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष
पदी तर आशिष शेलार यांची मुंबई महानगर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे महासचिव
अरुण सिंह यांनी यासंदर्भातलं नियुक्तीपत्र जारी केलं आहे.
****
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या
लगत हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत चर्चा सुरू झाली असून, या माध्यमातून मुंबई
ते नागपूर प्रवास तीन तासात करता येणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून पुढील महिन्यात - मुंबई - नागपूर बुलेट
ट्रेन संदर्भात दिल्लीत बैठक होणार आहे अशी माहिती दानवे यांनी दिली.
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानांतर्गत रेल्वे
मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यात भगूर इथं
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानी असलेल्या सावरकर स्मारकात दानवे यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून
दानवे तसंच उपस्थितांनी सावरकरांना अभिवादन केलं. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि
त्यांच्या वारसांचा दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान मोठ्या
उत्साहात आणि जल्लोषात सुरू असून यामुळे देशभरात राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची मोठी
लाट आली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या
वर्धापन दिनाच्या स्वागतानिमित्त मुंबईत काल घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रत्येकाला राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा आनंद मिळाला पाहिजे हा या अभियानामागील उद्देश
असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
****
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी १५ ऑगस्टपासून राज्य शासनाच्या कौशल्य,
रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचं आयोजन
करण्यात आलं आहे. विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी ही माहिती दिली. यासाठी
राज्यातील ६ विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता, युनिकॉर्न याविषयी मोठ्या
प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या
युवक-युवतींना प्रशिक्षण तसंच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार
आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यतची
पारितोषिकंही दिली जाणार आहेत.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ९७५ रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ६८ हजार २१८ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १६७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक
हजार ९०४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख आठ हजार १९५
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या ११ हजार ८५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४१ कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यु झाला. यामध्ये
लातूर जिल्ह्यातल्या ११, औरंगाबाद १६, जालना ०६, तर बीड जिल्ह्यातल्या ८ रुग्णांचा समावेश आहे, जालना
जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यु झाला
****
अग्निपथ योजनेअंतर्गत औरंगाबाद
इथं आजपासून भरती प्रक्रियेला सुरवात होत आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली,
बुलडाणा आणि जळगाव या जिल्ह्यांतले पात्र तरूण या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपाची आहे. तरुणांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरावा. भरती संदर्भातील
शारिरीक चाचणी तसंच इतर प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर
होणार आहे.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्ष
नेते अंबादास दानवे यांनी नांदेड जिल्ह्यात निळा गावाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान
झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत, दानवे यांनी, झालेल्या
नुकसानापोटी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. यासाठी
सभागृहात आवाज उठवू, असं विरोधी पक्षनेते दानवे यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान
भरपाई मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि अन्य मागण्यासाठी काल नांदेड इथं अखिल
भारतीय छावा संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या
नेवरगाव गटासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना शासनानं जाहीर केलेली मदत विनाअट मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य
मधुकर वालतुरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
केली आहे. या भागातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमही तात्काळ मिळावी अशी मागणी
या निवेदनात करण्यात आली आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जीवन गाणे गातच जावे‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.
सर्व कारागृहांमधे सांस्कृतिक, प्रबोधनात्मक आणि समुपदेशनात्मक कार्यक्रम घेऊन, सांस्कृतिक
कार्य संचालनालयानं एक विक्रम केला आहे. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातल्या कैद्यांनीही
या कार्यक्रमात सादरीकरण केलं.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा सह विविध उपक्रमांना सर्वत्र प्रारंभ झाला आहे.
हर घर तिरंगा उपक्रमात आजपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे, त्यामुळे काल तिरंगा घेण्यासाठी नागरिकांनी
टपाल कार्यालयांसह, विविध वितरण केंद्रांवर गर्दी केल्याचं दिसून आलं.
औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग
कार्यालयातून तिरंगा ध्वज वितरण केंद्र सुरू केली आहेत. शहरात रोशन गेट परिसरातल्या
कार्यालयात तिरंगा ध्वज घेण्यासाठी लोकांनी काल गर्दी केली होती. दरम्यान, हर घर तिरंगा
उपक्रमात औरंगाबाद विभागासाठी सहा लाख दोन हजार राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आले
असल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’
अंतर्गत परभणी इथं ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’
या सांस्कृतिक समारोहाचं आमदार डॉ.रत्नाकर
गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांची
आरोग्य तपासणी आणि जाणीव जागृती कार्यक्रमही काल घेण्यात आला.
****
हिंगोली
शहरात काल महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने तिरंगा फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते
या प्रभात फेरीचं उद्घाटन झालं. नगरपालिका, तहसील
कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज उपलब्ध असून, सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयांनी ध्वजसंहितेचं पालन करत १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करावं, असं
त्यांनी सांगितलं. हर घर तिरंगा मोहीम राबवत असताना प्रत्येकाने
कोविड-19 बूस्टर डोस घेण्याचं आवाहन त्यांनी
यावेळी केलं. ते म्हणाले..
‘‘याची स्लोगन आहे, हर घर तिरंगा- हर घर बूस्टर डोस. कोविडच्या
संदर्भात जो काही आपला बूस्टर डोस राहिलेला आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची
अनासक्ती आहे. त्यासाठी माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की, कोविड अजून संपलेला नाही.
तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल, त्या त्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात जाऊन बूस्टर डोस
जो आहे, तो घ्यावा.’’
****
जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाने हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजपासून १५
ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
यांनी केलं आहे. तिरंगा ध्वज फडकवताना प्रत्येकानं ध्वज संहितेचं पालन करून ध्वज सन्मानपूर्वक
फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
लातूर इथं
काँग्रेस पक्षाच्या वतीने १ हजार ७५ फूट लांबीच्या तिरंग्यासह आजादी गौरव पदयात्रा
काढण्यात आली. दयानंद महाविद्यालयातून सुरू झालेली ही पदयात्रा शहराच्या विविध
भागातून मार्गक्रमण करत, संविधान चौकात विसर्जित झाली.
****
नांदेड इथं काल "फ्रीडम
जॉईन" रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिस बँडपथकासह निघालेली
ही तिरंगा फेरी जिल्हा क्रीडा संकुलावर विसर्जित झाली. या तिरंगा फेरीत हर घर तिरंगा
बाबत जनजागृतीसाठी पथनाट्य, गीतं, नृत्य सादर करण्यात आली.
नांदेड तालुक्यातील भायेगाव इथं
सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, यांच्या हस्ते काल तिरंगा ध्वजाचं मोफत वाटप
करण्यात आलं.
****
उस्मानाबाद इथं
परवा स्वातंत्र्यदिनी भव्य शोभा यात्रेचं आयोजन
करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी खेळ आदी
कार्यक्रम या यात्रेदरम्यान घेण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचं
आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील
यांनी केलं आहे
****
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत नांदेड इथं कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची कृषी
संगम कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या
सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून
आयोजित कृषी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत नाबार्ड, प्रधानमंत्री
सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, पोकरा योजना, बँके विषयी माहिती देण्यात आली.
****
महावितरणने मराठवाड्यातील घरगुती
वीजग्राहकांसाठी सुरू केलेल्या बक्षीस योजनेची दुसरी सोडत काल काढण्यात आली. यात नांदेडचे
शशांक गोळेगावकर हे प्रादेशिक स्तरावरील इलेक्ट्रिक स्कूटरच्या बंपर बक्षिसाचे मानकरी
ठरले तर बीडच्या रेखा नखाते यांना फ्रीज, औरंगाबाद इथले राम हरपाळे तसंच माजलगाव इथले
शिवाजी बिंदू यांना एलईडी टीव्ही, जाहीर झाला. जून महिन्याच्या सोडतीत बंपर बक्षीस
मिळवणारे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील ग्राहक बालाजी सोनवळकर यांना सहव्यवस्थापकीय
संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते स्कूटर सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment