Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 18 August 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाच्या व्याजावर दीड टक्का अनुदान
देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
· राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, पहिल्याच दिवशी २५ हजार ८२६
कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
· विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी
· शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी
करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
· निवडणुकीत राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून रोखता येणार नाही- सर्वोच्च
न्यायालयाचा निर्वाळा
· स्वराज्य महोत्सवा अंतर्गत राज्यात सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात नागरिकांचा
उत्स्फुर्त सहभाग
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८०० रुग्ण, मराठवाड्यात ३७ बाधित
· पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ, १८ दरवाजे चार फुटानं उघडले
आणि
· भारत - झिम्बाब्वेत आज पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना
सविस्तर बातम्या
तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाच्या व्याजावर दीड टक्का अनुदान
देण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना ही
माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना,
चौतीस हजार आठशे छप्पन्न कोटी रुपये देणार आहे. अशा संस्थांमधे सार्वजनिक आणि खासगी
क्षेत्रातल्या बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि व्यावसायिक
बँकांशी थेट जोडलेल्या संगणकीकृत प्राथमिक कृषी पतसंस्थांचा समावेश होतो. बदलती आर्थिक
परिस्थिती लक्षात घेऊन, सरकारनं या वित्तीय संस्थांना दिल्या जाणाऱ्या व्याज सवलतीच्या
दरांचा आढावा घेतला. यामुळे शेतकऱ्याला कृषी क्षेत्रात पुरेसा कर्ज पुरवठा सुनिश्चित
होईल, तसंच कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांचं आर्थिक आरोग्य सुधारेल, अशी अपेक्षा आहे.
प्रवास, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रासाठी आणिबाणीच्या कर्ज हमी योजनेची मर्यादा
५० हजार कोटी रुपयांनी वाढवण्यासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे हॉटेल, पर्यटन
आणि संबंधित क्षेत्रांना चालना मिळेल, असं ठाकूर यांनी सांगितलं. पारंपरिक ज्ञान डिजिटल
लायब्ररी डेटाबेसची व्याप्ती वाढवण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती ठाकूर
यांनी दिली.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच
दिवशी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, २५ हजार ८२६ कोटींच्या
पुरवणी मागण्या मांडल्या. यावर येत्या २२ आणि २३ ऑगस्टला चर्चा होऊन मतदान होईल, अशी
घोषणा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर
मंत्र्यांनी विविध अध्यादेश तसंच विधेयकं सभागृहात मांडली.
काँग्रेसकडून नाना पटोले यांनी पूर परिस्थितीवर चर्चेची मागणी केली, त्यावर,
विरोधी पक्षाच्या आजच्या प्रस्तावात याचा समावेश करण्याची सूचना अध्यक्षांनी केली.
राज्यातल्या पूरस्थितीवर राज्य सरकारचं पूर्ण लक्ष असून, लवकरच त्यावर विस्तृत निवेदन
देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं.
अधिवेशन कालावधीतल्या विधानसभा तालिका अध्यक्षांची नावं काल जाहीर करण्यात आली.
यामध्ये संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे आणि शिरीष चौधरी यांचा समावेश
आहे.
विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून
देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक झाल्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास
दानवे यांचा परिचय उपसभापतींनी सभागृहाला करून दिला.
विधिमंडळाच्या दोन्ही सदनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप
धनखड यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली
अर्पण करून दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
दरम्यान, विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, अशा घोषणा देतानाच विरोधकांनी
सरकारच्या विरोधातही घोषणा दिल्या.
****
शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य
गुन्हे अन्वेषण- सीआयडी विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी दिले आहेत. मेटे यांचं १४ ऑगस्टला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात निधन
झालं होतं.
****
येत्या रविवारी, एकवीस ऑगस्टला, बी.एड. आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांसाठीची
सीईटी परीक्षा तसंच राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी या दोन्ही
परीक्षा देणार आहेत, त्यांनी सीईटी सेलला यासंदर्भात इमेलद्वारे अर्ज करावा, त्यांना
सीईटी परीक्षेची तारीख बदलून दिली जाईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी काल विधीमंडळात केली. अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र डाॉट सी ई टी सेल
ॲट जीमेल डाॉट कॅाम या आयडीवर इमेल करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
देशामध्ये २०२१-२२ या वर्षात अन्नधान्याचं उत्पादन तीनशे पंधरा दशलक्ष टनांपेक्षा
जास्त होईल असा अंदाज आहे. कृषी मंत्रालयानं या वर्षातल्या प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा
अंदाज काल जाहीर केला. २०२१-२२ वर्षाचं उत्पादन मागच्या पाच वर्षांच्या अन्नधान्याच्या
सरासरी उत्पादनापेक्षा पंचवीस दशलक्ष टनांनी जास्त आहे. भात, मका, हरभरा, कडधान्य,
मोहरी, तेलबिया आणि उसाच्या उत्पादनात विक्रमी वाढ अपेक्षित आहे.
****
निवडणुकीत राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून रोखता येणार नाही, असं सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे. निवडणूक काळात मोफत योजनांच्या घोषणांना स्थगिती देण्याची
मागणी करणाऱ्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान, यासंदर्भात एक तज्ज्ञ समिती
स्थापन करण्याच्या मागणीचा याचिकाकर्त्यानं पुनरुच्चार केला. त्यावर, समिती स्थापन
करण्याबाबत सगळ्या पक्षकारांनी शनिवारपर्यंत आपआपल्या सूचना द्याव्यात, असे निर्देश
न्यायालयानं दिले. आम आदमी पक्षानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत, अशी
समिती स्थापन करण्याला यापूर्वीच विरोध दर्शवला आहे.
****
काँग्रेय पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षांतर्गत सर्व
पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांच्या राजीनाम्याच्या कारणाबाबत स्पष्टपणे काहीही
सांगण्यात आलेलं नाही.
****
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळ तसंच केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना
करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय मंडळात, पंतप्रधान नरेंद्र
मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्यासह, कर्नाटकचे माजी
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, माजी मंत्री सर्वानंद सोनोवाल, आदींचा समावेश केला
आहे. निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
तसंच खासदार ओम माथूर यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
रेल्वे प्रवासात बालकांच्या तिकीट प्रक्रियेत काहीही बदल केला नसल्याचा खुलासा
रेल्वे मंत्रालयानं केला आहे. पाच वर्षाच्या आतल्या बालकांसाठी स्वतंत्र आसन नको असल्यास,
त्यांना तिकीट आकारलं जाणार नाही. मात्र अशा बालकांसाठी स्वतंत्र आसन आरक्षित केल्यास,
त्यासाठी पूर्ण तिकीट आकारलं जातं. हा नियम पूर्वीपासून लागू असल्याचं, रेल्वेकडून
सांगण्यात आलं. एक ते चार वर्षं वयाच्या बालकांना रेल्वे प्रवासासाठी तिकिटं घ्यावी
लागतील, अशा आशयाच्या बातम्या भ्रामक असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
सक्तवसुली संचालनालय-ईडीनं पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी काल मुंबईत दादर आणि
कांजुरमार्ग इथं दोन ठिकाणी धाडी घातल्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चौकशीदरम्यान
ईडीला दिलेल्या माहितीवरून या धाडी घालण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. राऊत
सध्या बावीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी
ईडी आणखी काही व्यक्तींना समन बजावण्याची शक्यता आहे.
****
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा - जेईई आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा - एनईईटी,
या दोन्ही परीक्षा, केंद्रीय विद्यापीठ पदवी प्रवेश परीक्षा - सी ई यू टी मध्ये विलीन
करण्याच्या प्रक्रियेवर विचार करणार असल्याचं, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश
कुमार यांनी म्हटलं आहे. यासाठी या महिनाअखेरपर्यंत एक तज्ज्ञ समिती स्थापन होणार आहे.
ही समिती जगभरात होणाऱ्या अशा परीक्षा प्रक्रियेचा अभ्यास करेल, त्यानंतर याबाबतचा
निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सांस्कृतिक कार्य
विभागानं सुरू केलेल्या स्वराज्य महोत्सवात राज्यात काल सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात
नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. विधिमंडळाच्या दोन्ही सदनात तसंच मंत्रालयात
मुख्य प्रवेशद्वार आणि त्रिमूर्ती प्रांगणात, समूह राष्ट्रगीत गायन केलं. राज्यातल्या
सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्येही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहानं सामूहिक
राष्ट्रगीत गायन केलं. राज्यभरातल्या विविध शाळा आणि शासकीय, निमशासकीय तसंच खाजगी
संस्थांमध्येही विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहानं राष्ट्रगीताचं
सामूहिक गायन केलं.
लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात सुमारे एक हजार नऊशे विद्यार्थ्यांनी सामूहिक
राष्ट्रगीत गायन केलं. यावेळी देशीकेंद्र विद्यालय आणि गोदावरी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी
देशाचा नकाशा, तिरंगा आणि अमृत महोत्सव दर्शवणारी प्रतिकृती तयार केली होती.
नांदेड इथं गुरु गोविंदसिंहजी क्रीडा संकुलावर सुमारे १५ हजार विद्यार्थी आणि
त्यांच्या शिक्षकांनी सामुहिक राष्ट्रगीत गायलं.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात
शहरातल्या अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या सुकळी गावात शेतकरी आणि शेतमजुरांनी
शेतशिवारात सामूहिक राष्ट्रगीत गायन करून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८०० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७६ हजार १६५ झाली आहे. काल या संसर्गानं सहा रुग्णांचा
मृत्यू झाला. तर दोन हजार ८१२ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख १६ हजार ६१५
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश
टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
१६, लातूर दहा, उस्मानाबाद पाच, तर बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा
समावेश आहे. जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची १८ हजारांवर पदं रिक्त असल्याची
बाब समोर आली आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक यानुसार शिक्षकांच्या नेमणुकांना
मंजुरी दिली जाते. सध्या याच पटसंख्येच्या आधारे मंजूर पदांपैकी १८ हजारांवर पदे रिक्त
आहेत. यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यात ७८८, औरंगाबाद ६६५, बीड ५८६, जालना
२३४ तर हिंगोली जिल्ह्यात ८७ जागा रिक्त असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
राज्यभरातल्या नगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय
आश्रमशाळा इथल्या शिक्षक पदांचा आढावा घेतल्यास, राज्यातला शिक्षकांच्या रिक्तपदाचा
आकडा ५० हजारांवर पोहोचत असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या परतूर इथल्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यास एक लाख रुपयाची
लाच घेताना काल पकडण्यात आलं. गजानन सोनकांबळे असं या अधिकार्याचं नाव असून, शेडनेटचं
अनुदान देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ
करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे चार फुटानं उघडण्यात आले असून, ७५ हजार ४५६ घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पैठण शहर तसंच नदीच्या
काठावर असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला
सामना आज झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी बारा
वाजून ४५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.
****
औरंगाबाद इथं एका महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी पोलिसांनी एका पत्रकाराला अटक
केली आहे. सौरभ लाखे असं त्याचं नाव असून, त्याने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत
असलेल्या एका महिलेची औरंगाबाद इथल्या राहत्या घरी गेल्या सोमवारी हत्या केली. त्याने
मृतदेहाचे तुकडे करून काही अवयव वैजापूर तालुक्यात शिऊर या गावी नेले होते. दरम्यान,
औरंगाबाद इथल्या घरातून दुर्गंधी सुटल्याने, नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास
केला असता, हा प्रकार उघड झाला. आरोपीला पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केल्याचं वृत्त
आहे.
****
हिंगोली इथं झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित १८८ प्रकरणं तसंच विद्युत
महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत तसंच नगरपालिका, आणि घरकुल योजनेची दाखलपूर्व
२४५ प्रकरणं तडजोडीआधारे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात शांताबाई जिजाबा वसू
या ६५ वर्षीय महिलेला जिना चढून वरच्या मजल्यावर जाणं शक्य नसल्यानं, मोटार अपघात वाद
निवारण मंचासमोरच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावणीसाठी जिल्हा न्यायाधीश आर. व्ही.
लोखंडे हे स्वत: पॅनलवरुन उतरुन लॉबीमध्ये बसलेल्या शांताबाईंपर्यंत गेले, त्यांची
बाजू ऐकून घेतली, आणि साडे नऊ लाख रुपये नुकसान भरपाईवर तडजोड करुन प्रकरण निकाली काढलं.
****
अहमदनगर - पुणे महामार्गावर काल पहाटे झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू
झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. अहमदनगर जिल्ह्यातल्या आव्हाने गावचे रहिवासी,
लग्नासमारंभासाठी पनवेल इथं जात असताना रांजणगाव औद्योगिक वसाहतीजवळ कंटेनर आणि शाळेच्या
बसमध्ये हा अपघात झाला.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही
ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली
आहे.
****
No comments:
Post a Comment