Thursday, 21 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 21.09.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या विशेष अधिवेशन सत्राचा आज चौथा दिवस आहे. हे विशेष अधिवेशन सत्र उद्यापर्यंत चालणार आहे.

****

महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक- नारी शक्ती वंदन आज राज्यसभेत सादर होणार आहे. काल लोकसभेत संमत झालेल्या या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केलं जाईल.

****

लोकसभेत आज चांद्रयान तीन मोहिम आणि आदित्य एल वन या सौर मोहिमेवर चर्चा होणार आहे. काल राज्यसभेत झालेल्या चर्चेमध्ये या मोहिमेची प्रशंसा करण्यात आली आणि यामध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यात आलं.

****

पहिल्या उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्ली इथं ग्रेटर नॉयडामधील इंडिया एक्स्पो सेंटर इथं हे प्रदर्शन होत आहे.

****

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात राज्यभर आज घरोघरी महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा- कनिष्ठा गौरींचं आगमन होणार आहे. गौरींच्या स्वागतासाठी गृहलक्ष्मींची लगबग सुरू आहे. गौरींच्या स्थापनेसाठी आवश्यक पूजा साहित्य, मखर, कपडे, अलंकार तसंच अन्य खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत गर्दी आहे.

****

राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलं. परवा घरोघरी स्थापन झालेल्या गणेशाचं भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन केलं.

****


चीनमध्ये सुरू असलेल्या होंगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आज  महिला क्रिकेट, नौकानयन आणि रोईंगमध्ये आपलं अभियान सुरू करेल. पुरुष आणि महिला रोईंग संघ अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी प्रयत्न करेल तर  भारतीय महिला क्रिकेट संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळत आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्यावतीनं 'माझी माती,माझा देश'अभियानांतर्गत संपूर्ण शहरभर अमृतकुंभ कलश यात्रा काढण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...