Sunday, 3 March 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 03 March 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची मोठी संधी - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

·      आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा खासदार इम्तियाज जलिल यांचा आरोप

      आणि    

·      नांदेड जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

****

नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची एक मोठी संधी मिळाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बारामती इथं काल नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यापूर्वी नागपूर, लातूर आणि अहमदनगर इथं मेळावे झाले, बारामतीतला हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून, यातून २५ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी बारामतीचं बस स्थानक, बऱ्हाणपूरच्या पोलीस उप - मुख्यालय इमारतीसह बारामती तालुक्यातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, यावेळी उपस्थित होते.

राज्य सरकारनं रोजगाराच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रसंगी, सरकारच्या विविध उप्रकमांची माहिती दिली. पुढचा रोजगार मेळावा ठाणे इथं सहा आणि सात मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या वढु बुद्रुक इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकासकामाचं भूमिपूजन देखील काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

****

भारतीय जनता पक्षानं काल लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेश मधून ५१, मध्य प्रदेश २४, पश्चिम बंगाल २०, गुजरात आणि राजस्थान मधून प्रत्येकी १५, केरळ १२, आसाम, झारखंड आणि छत्तीसगड मधून प्रत्येकी ११, तेलंगणा नऊ, दिल्ली पाच, उत्तराखंड तीन, जम्मू कश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधून प्रत्येकी दोन, तर गोवा, त्रिपुरा, अंदमान निकोबार, आणि दमन दिव मधून प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटा मतदारसंघातून, अमित शहा गांधीनगरमधून, राजनाथ सिंग लखनऊ, स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.

****

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठवणार असल्याची माहिती, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यभरातले भाजपाचे ३३ हजाराहून अधिक कार्यकर्ते सूचनापत्राची पेटी घेऊन घरोघरी जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. येत्या चार तारखेला नागपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाच तारखेला अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यक्रमात सहभागी होतील असं बावनकुळे म्हणाले.

****

नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यंदा पहिल्यांदा मतदान करणारे छत्रपती संभाजीनगर इथले साक्षी वैद्य आणि कैवल्य जोशी यांनी मतदान करणार असल्याचा संकल्प केला,

****

देशातल्या तेहतीस साखर कारखान्यांच्या, एक हजार ३७८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी करण्याला मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे ६१९ कोटी रुपयांचं अतिरिक्त व्याज पुर्णपणे माफ होणार आहे. या एकूण थकीत कर्जामध्ये महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं जवळपास ८६१ कोटी रुपये कर्ज थकीत होतं.

****

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्यात सर्वच शैक्षणिक संस्थांनी येत्या जूनपासून करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आनंदशाळा, या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यासोबतचं मुलींना येत्या १ जूनपासून सर्व शिक्षणाचा लाभ मोफत मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सहकार विभागानं राज्यातल्या सुमारे ३८ हजाराहून अधिक सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत, सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याकरीता ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्र, नांदेड जिल्ह्यात दोन हजार ७६७, लातूर शहरात २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरती पथकं, तर जालना इथं एक हजार ५२१ बुथ तसंच १०९ फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप, खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक वसाहतीत विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ च्या अंतर्गत एका बड्या कंपनीनं २००७ मध्ये २३२ एकर भुखंड संपादित केला होता. त्यावर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता मात्र आता या भूखंडाची परस्पर विक्री होत असल्याचं खासदार जलिल यांनी सांगितलं. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी, औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या दहेली तांडा नजिक काल, दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त तिघे जण, आपला बारावीच्या परीक्षेचा पेपर देवून माहूर तालुक्याच्या अंजनखेड इथून एकाच दुचाकीवरुन वापस येत होते. दुपारच्या सुमारास दुचाकी दहेली तांडा गावाजवळ आली असता, एका वळण रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटून, ती झाडावर आदळली. गावातल्या प्राथमिक उपचार केंद्रात उपचारानंतर त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र यावेळी दोघांना मृत घोषित करण्यात आलं.

****

शेतकऱ्यांच्या हिताच्या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देत, शेती समृद्ध करण्याचं आवाहन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना इथं कृषी विभागातर्फे आयोजित 'गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाला' काल दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवातल्या विविध कृषी विषयक दालनांना भेट देउन, त्यांनी शेतक-यांसोबत चर्चाही केली.

****

लातूर जिल्ह्यात पाणी पुरवठ्याचं सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या, मांजरा प्रकल्पातला पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असल्यानं, शहरी भागात पाणीपुरवठ्यासाठी इतर पर्यायी उपाययोजना सज्ज ठेवाव्यात तसंच कोणत्याही गावाला पाणी टंचाई सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री बनसोडे यांनी संबंधितांना दिले आहेत.

****

छत्रपती संभाजी नगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात काल लेखक माणिक पुरी यांच्या "पक्षी येती अंगणी" या कादंबरीवर परिसंवाद घेण्यात आला. पक्षी नसतील तर माणूसही संपुष्टात येईल, या सलीम अली यांच्या वाक्यानं आपल्याला अंतर्मुख केल्याचं, पुरी यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी पक्षी निरीक्षणाच्या बहुआयामी लेखन प्रवासाबद्दल आपला मनोगत व्यक्त केलं.

****

हिंगोली शहरात जलेश्वर तलाव परिसरातलं अतिक्रमण काल काढण्यात आलं. या तलाव परिसराचं आता सौंदर्यीकरणं करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या, त्यानुसार ही कारवाई झाली.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...