Sunday, 3 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 03.03.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 03 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०३ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये नेहमी आघाडीवर असलेल्यांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. पृथ्वीचं संवर्धन करण्याच्या वचनबद्धतेसह जीवनातील अतुलनीय विविधता साजरी करण्याचा आजचा दिवस असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर सामाईक केलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं जागतिक स्तरावर ब्रँडिंग अर्थात दखल घेण्यासाठी वनविभागातर्फे आयोजित तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाची सुरुवात काल चंद्रपूर इथं झाली. महोत्सवात काल पहिल्या दिवशी देशभरातील वनं आणि वन्यजीव अभ्यासक, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी  विविध परिसंवादांमध्ये आपले विचार मांडले.

****

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. राज्यातल्या ८९ हजार २९९ केंद्रावर  २ लाख २१ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी लसीकरण कार्यात सहभागी झाले असून पाच वर्षाखालील १ कोटी १३ लाख ७० हजार ४४३ बालकांना पोलिओचा डोस दिला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, हिंगोली, नांदेड इथंही पोलिओ लसीकरणाला सकाळपासूनच मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी सांगितलं. दरम्यान, वाड्या-वस्त्यांसह वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजुरांच्या बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी फिरती पथकं देखील कार्यरत आहेत. पोलिओचा डोस घेऊ न शकणाऱ्या वंचित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. 

****

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं फक्त सीमांचं संरक्षण, दहशतवादाचा मुकाबला करणं म्हणजेच संरक्षण नसून व्यक्तीच्या दैनंदिन दिनचर्येची हाताळणीसुध्दा खूप संवेदनशील असल्याचं परराष्ट्र मंत्री एस.  जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. सायबर डोमेन अर्थात माहिती तंत्रज्ञानाच्या आंतरजालात परकीय हस्तक्षेपाचे प्रयत्न वाढत असून जग कसं बदलत आहे ते सामान्य व्यक्तीनं समजून घ्यायला हवं, असं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेला कृत्रिम बुद्धिमत्ता -ए.आय. आणि फेरफार करण्यात आलेल्या चित्रफित अर्थात डीपफेकसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा संभाव्य धोका असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. 

****

वस्तू आणि सेवा कर -जीएसटी महसुलात यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत साडेबारा टक्के वृद्धी झाली आहे. देशांतर्गत व्यवहारांमुळं १४ टक्के वाढ आणि वस्तुंच्या आयातीमधून साडेआठ टक्के याप्रमाणे जीएसटीतील वाढीमुळं हे शक्य झालं आहे. यापार्श्वभुमीवर चालू आर्थिक वर्षातील एकंदर जीएसटी संकलनही मागच्या वर्षीच्या तुलनेत साडे अकरा टक्क्यांनी जास्त झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

डाळिंब निर्यातीवरची देशातली गेल्या सहा वर्षातील बंदी उठल्यानंतर, आता प्रथमच अमेरिकेला समुद्रामार्गे जहाजाने डाळिंब पाठवले जात आहेत. याबाबतची माहिती पणन विभागातर्फे  देण्यात आली. २०१७-१८ मध्ये डाळिंबाच्या दाण्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानं अमेरिकेनं भारतातून डाळिंब आयातीवर बंदी घातली होती. यासंदर्भात कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण-अपेडा तसंच राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना -एन.पी.पी.ओ. यांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा केल्यानंतर काही नियम आणि अटी घालून अमेरिकेनं ही निर्यात बंदी उठवली आहे.

****

अमली पदार्थ-मेफेड्रोनच्या निर्मितीसाठी लागणारा जवळपास साडेतीनशे किलो कच्चा माल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं काल जप्त केला. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली. पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ, सांगली परिसरात छापे टाकून यापूर्वी सदोतीसशे कोटी रुपयांचं मेफेड्रोन जप्त केलं होतं. यानंतर चौकशीदरम्यान कच्च्या मालाबाबत माहिती मिळाली होती.

                              ****
विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. अन्यत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान, राज्यातील उष्ण जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या विदर्भातील वाशीम जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीनं काल एक दिवसीय उष्माघात मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये  उष्माघात उपचार  कक्ष आणि त्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे.

****

महिला प्रीमियर लीगमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना बंगळुरू इथं संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. दरम्यान, काल बेंगळुरूमध्येच झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित वीस षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सनं १३२ धावांचं लक्ष्य सोळाव्या षटकात तीन गडी गमावून पूर्ण केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...