Friday, 3 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:03.05.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 May 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस;उद्या छाननी 

·      तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग;प्रचार सभांसाठी नेत्यांचे झंझावाती दौरे

·      राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रलोभनं दाखवण्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

·      छत्रपती संभाजीनगर इथं दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

आणि

·      बांगलादेश विरुद्ध महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय संघाची विजयी आघाडी

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पाचव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.

दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुक्रमे भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच दिंडोरी इथून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, संयुक्त भारत पक्षाचे संभाजी जाधव, तर चंद्रकांत मोटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर तर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे भूषण पाटील यांनी काल अर्ज दाखल केले.

ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार राजीव भोसले, पालघर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या भारती कामडी, धुळे मतदारसंघासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी काल अर्ज भरले.

पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत सवरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे पुत्र आहेत.

****

निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी, तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रत्नागिरी इथं सभा होईल. तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात प्रचारसभा घेणार आहेत.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सात तारखेला अहमदनगर आणि नंदुरबार इथं सभा घेणार आहेत.

****

इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबाबत अजून चर्चा झालेली नसून पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात घेण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

****

वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि उस्मानाबादचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल सभा घेतल्या.

जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची काल जालना जिल्ह्यात रामनगर इथं प्रचार सभा झाली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल धाराशिव इथं महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ रिपाई कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं.

सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली.

कोल्हापूर इथले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड इथं सभा घेतली.

****

राजकीय पक्षांनी प्रस्तावित लाभार्थी योजनांसाठी सर्वेक्षण तसंच नोंदणीच्या नावाखाली मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत. निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पक्षाला कल्याणकारी योजना, त्यावरील निधी तसंच कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पांची पायाभरणी यासारखे कार्यक्रम घेता येणार नसल्याचं, या सूचनांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यायची असल्यास १० मे पर्यंत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. पैठण तालुक्यात सुलतानपूर इथं एका चौदा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकानं हा विवाह रोखला. पोलिसांच्या समुपदेशनामुळे वधू-वर पक्षाने मुलगी सज्ञान होईपर्यंत विवाह न करण्याचा निर्णय घेतला.

करोडी परिसरात होत असलेल्या दुसरा विवाह देखील पोलिसांनी थांबवला. मुलीच्या आई - वडिलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.

****

लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ. संदिपान जगदाळे यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा तयार केला आहे. या पोवाड्याचं काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रकाशन केलं. डॉ. जगदाळे यांनी या पोवाड्यातून नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ते म्हणतात,

****

लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी काल निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी केली.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची तपासणी, निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास, उद्या चार, आठ, आणि १२ मे रोजी करणार आहेत.

****

लातूर लोकसभा मतदार संघात काल गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिव्यांग तसंच ८५ वर्षावरील मतदारांनी गृह मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली.

****

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. उन्हाळ्याच्या अनुषंगाने प्रथमोपचार पेटी, पाळणा घर आणि चाकाची खुर्ची या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यासाठी महिला बालविकास, सामाजिक न्याय आणि आरोग्य विभागांनी समन्वय राखावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी अंध, अस्थिव्यंग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका मदत करणार आहेत. यासाठी या सेविकांना वाहन भाडे भत्ता देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितलं.

****

नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं, शहरातला उत्तर भाग तसंच देगलूरनाका, वजिराबाद आणि खडकपुरा भागात आगामी चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात पुढील दीड महिना जलसंधारण कामांची मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावर्षी सात जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशीरा पेरणी करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत.

****

बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाने विजयी आघाडी घेतली आहे. बांगलादेशात सिल्हट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर सात फलंदाज राखून विजय मिळवला. बांगलादेश संघानं दिलेलं ११८ धावांचं आव्हान भारतानं १९ व्या षटकातच पार केलं. मालिकेत चौथा सामना सोमवारी तर पाचवा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.

****

राज्यात आजपासून पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात आजपासून पाच मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे.

राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं ४२ पूर्णांक सहा, नांदेड ४१ पूर्णांक आठ, परभणी ४१ पूर्णांक चार तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन स्वत:चा बचाव करावा, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या पाच मे रोजी मुंबईहून सुटणारी ही गाडी बल्लारशा पर्यंत धावणार असून, परतीच्या प्रवासात सात मे रोजी बल्लारशा इथून सुटेल. ही गाडी पिंपळकुटी, वणी, भांडक, चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर थांबेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...