Friday, 10 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

जागतिक मानसिक आरोग्य दिवस आज पाळण्यात येत आहे. मानसिक आरोग्यासंबंधी जागरुकता वाढवणं आणि मानसिक आरोग्य सेवांना गती देणं, हे या दिनाचं उद्दीष्ट आहे. आपल्याला आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राथमिकता दिली पाहिजे, याची आठवण हा दिवस करुन देतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. यंदाची या दिनाची संकल्पना, आपत्ती आणि आपत्कालिन परिस्थितीत मानसिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आरोग्य सेवांची उपलब्धता, अशी असून, आपत्कालिन परिस्थितीत मानसिक आधार उपलब्ध करुन देण्याच्या गरजेवर प्रकाश टाकत असल्याचं नड्डा म्हणाले.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना आज जारी होणार आहे. या टप्प्यात १२१ मतदारसंघात सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू होईल आणि १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी १८ ऑक्टोबरला होईल तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर आहे. सुमारे साडे आठ लाख निवडणूक अधिकारी तैनात केले जाणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. राज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६हून अधिक योजना राबवून पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं, तसंच काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड, धुळे या नऊ जिल्ह्यांची निवड झाली आहे. डाळी क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठीच्या अभियानाचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे.

****

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून शिरीष चंद्र मुर्मू यांनी काल तीन वर्षांच्या कालावधीसाठी पदभार स्वीकारला. डेप्युटी गव्हर्नर पदावर बढती मिळण्यापूर्वी मुर्मू रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक होते. डेप्युटी गव्हर्नर म्हणून, शिरीष मुर्मू हे नियमन आणि अमंलबजावणी विभाग, सरकारी विभाग आणि बँक विभागाचा कार्यभार पाहतील.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा विभाग भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातल्या विविध विकास कामांसंदर्भात बैठक होणार आहे. संत एकनाथ रंगमंदीरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते सहभागी होणार असून, समर्थनगर इथं शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी आजपासून वितरित केला जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.

****

छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. लातूरच्या आरक्षणाचं प्रारूप १४ तारखेला प्रसिद्ध केलं जाईल, प्रारुपासंदर्भातील हरकती १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान दाखल करता येतील.

****

मराठवाडा साहित्य परिषदेनं या वर्षापासून बालवामयासाठी रघुनाथ शिवराम बोरसे हा विशेष पुरस्कार सुरू केला आहे. पहिला पुरस्कार पुणे इथले पत्रकार संजय ऐलवाड यांच्या झिब्राच्या कथाह्या बालकथासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते येत्या रविवारी १२ तारखेला साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात बालसाहित्यिक विनोद सिनकर हे पुरस्कारप्राप्त कथासंग्रह आणि ऐलवाड यांच्या लेखनावर बोलणार आहेत.

****

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक दोन नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे. २०१३ पासून सलग तीन वेळा अजित पवार अध्यक्ष पदावर आहेत. महासचिव पदासाठी नामदेव शिरगावकर, तर खजिनदार पदासाठी चंद्रशेखर जाधव यांनी अर्ज केले आहेत. अर्ज भरण्याची उद्याची अखेरची मुदत असल्याचं संघटनेनं सांगितलं आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद १५० धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल ७३, तर साई सुदर्शन ३९ धावांवर खेळत आहे. के एल राहुल ३८ धावा करुन बाद झाला.

****

No comments: