Tuesday, 2 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या सर्व २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. सुरवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये २० डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. यामध्ये २४ नगराध्यक्ष आणि २०४ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे आज एकूण २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायती जागांसाठी मतदान होत आहे.

सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्वच निकाल एकत्र २१ डिसेंबरला जाहिर करण्याचे आदेश दिले. तसंच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील, आणि नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

**

या निकालावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, हे यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. यावर आपण याआधीही नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

तर न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून, याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

दरम्यान, राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शांततेत मतदान सुरु आहे. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान सुरु राहील. राज्यात साडे अकरा वाजेपर्यंत १७ पूर्णांक ११ टक्के मतदानाची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड, सिल्लोड, पैठण, खुलताबाद, गंगापूर आणि वैजापूर नगरपरिषदेसाठी मतदानाला उत्साहात सुरवात झाली. जिल्ह्यात सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सरासरी २२ पूर्णांक ९१ टक्के मतदान झालं. सर्वाधिक ३० टक्के मतदानाची नोंद सिल्लोड इथं झाली. जिल्ह्यातल्या एकूण २४८ मतदान केंद्रावर सहा नगराध्यक्ष आणि १३५ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून, पैठण शहरातल्या चार जागांवर, वैजापूर शहरातल्या दोन जागांवर, गंगापूर शहरातल्या दोन जागांवर आणि फुलंब्री नगरपंचायतीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरु आहे. भोकरदन इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती तयारी केली असून प्रशासन निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज आहे. भोकरदन इथं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदान केलं.

नांदेड जिल्ह्यात १० नगरपरिषदा आणि एका नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं.

हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली नगरपालिकेत सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत २२ पूर्णांक चार, तर कळमनुरी नगरपरिषदेत २४ पूर्णांक चार टक्के इतकं मतदान झालं.

धाराशिव जिल्ह्यात मतदानाच्या २२ पूर्णांक ८१ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात सहकारी क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण बदल केले असल्याचं, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. मोदी सरकारने देशातल्या सहकारी संस्थांना मजबूत करण्याठी सहकार मंत्रालयाची स्थापना केली, देशभरात आठ लाख सहकारी संस्था असून, जवळपास ३० कोटी लोक त्याचे सदस्य आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मतदार यादी पुनरिक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आजही बाधित झालं. प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी सदस्यांनी समोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेतही याच मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.

****

नाशिक महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ गोदावरी’ रोख्यांना आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी २०० कोटी रुपये उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...