Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 08 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर
इथं सुरुवात, सरकारकडून १८ विधेयकं मांडली जाणार
·
९० लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ९२ टक्के शेतकऱ्यांना
मदत मिळाली, मुख्यमंत्र्यांची माहिती
·
विरोधी पक्षनेतेपदावरुन काँग्रेससह विरोधी पक्षांची सरकारवर
टीका
·
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या घोटाळ्यासंबंधी
११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
आणि
·
राज्यात तापमानात लक्षणीय घट, येत्या दोन
दिवसात विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता
****
राज्य विधिमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात होत आहे. १४ तारखेपर्यंत चालणार्या या
अधिवेशनात १८ विधेयकं मांडली जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल झालेल्या पत्रकार
परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, लोककल्याणकारी योजनांसाठी
निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत, हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मराठवाडा आणि विदर्भातल्या सर्वच महत्त्वाच्या विषयांवर
चर्चा करण्यास शासन तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सुमारे ९० लाख अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांपैकी ९२ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विरोधी
पक्षनेते पदाच्यासंदर्भात जो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती
घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विरोधकांच्या
सगळ्या विषयांवर अधिवेशनात चर्चा करायला सरकार तयार आहे, विरोधकांच्या
प्रश्नाला समर्पक उत्तर देऊ, असं ते म्हणाले.
**
दरम्यान, अधिवेशनाच्या
पार्श्वभूमीवर काल सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. काँग्रेस
नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सत्ताधाऱ्यांनी दोन्ही
सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवलं आहे, त्यामुळे सरकारचा
राज्यघटनेवर अविश्वास असल्याचा संशय निर्माण होतो अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
ते म्हणाले,
बाईट – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते.
कापसावरचा
आयातकर ११ टक्क्यावरून शून्य टक्के केल्यानं राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी संकटात
सापडला आहे, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, देशातल्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी ३८ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी राज्यातले आहेत,
अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तर राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षीत
आहेत, कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, महार वतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीनं खरेदी केल्याप्रकरणी जमीन विकत घेणाऱ्यांविरोधात
कारवाई होत नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
****
भोगवटादार
वर्ग-दोन च्या जमिनी अकृषिक करणासाठी बँकांकडे गहाण ठेवताना आकारल्या जाणाऱ्या तारण
शुल्काबाबतचा कायदेशीर पेच आता सुटला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या
कलम ३६(४) मध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. काल नागपूर
इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
सशस्त्र
सेना ध्वज दिन काल पाळण्यात आला. देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहिदांचा सन्मान
करण्यासाठी १९४९ पासून, सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून पाळला जातो.
या दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी
त्यांचं एका महिन्याचं वेतन दान केलं.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सशस्त्र दलातल्या शूर सैनिकांप्रती
आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. सशस्त्र दलाच्या पराक्रम आणि सेवेचा सन्मान म्हणून
सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहनही
पंतप्रधानांनी यानिमित्त केलं.
****
वंदे मातरम
या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं झाल्यानिमित्त आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत
या गीतावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करतील.
****
गोव्यात
आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची
संख्या २५ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा
समावेश आहे. ही आग गॅस सिलिंडर स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या क्लबमध्ये
अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे. या प्रकरणी चार जणांना
अटक करण्यात आली असून, यात क्लबचा मुख्य सरव्यवस्थापक आणि तीन कर्मचार्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना
५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
****
इंडिगो
विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर
काल मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून २२० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली. मात्र, लवकरच आपली
सेवा पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू असून, पंधराशेहून जास्त उड्डाणं
चालवायचं आश्वासन इंडिगोनं आपल्या निवेदनात दिलं आहे.
दरम्यान, गेल्या काही
दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वेनं आपल्या विविध विभागांमध्ये
पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष गाड्या सोडायची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात
पुणे ते बंगळुरू, पुणे ते दिल्ली, आणि मुंबई
ते दिल्ली, यासह विविध मार्गांवर १४ विशेष गाड्या, पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई, आणि मुंबई ते
शकुरबस्ती, अशा विविध मार्गांवर ७ विशेष गाड्या सोडल्या जाणार
आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागात चेरलापल्ली ते शालीमार, सिंकदराबाद
ते चेन्नई- एगमोर, आणि हैदराबाद ते मुंबई, अशा तीन विशेष गाड्या चालवल्या जातील.
****
राज्याचे
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयाला
अचानक भेट देऊन, आरोग्य सेवांची पाहणी केली. आपत्कालीन सेवा, स्वच्छता स्थिती, औषधी साठा, विविध
विभागांचं कामकाज-यंत्रसामग्रीची कार्यस्थिती यांची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.
रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रीयाही आरोग्यमंत्र्यांनी जाणून
घेतल्या आणि त्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दरम्यान, आयुष्मान
भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात
आढावा बैठकही काल आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. जनहिताचा विचार करून डॉक्टर,
शुश्रुषा कर्मचारी तसंच रुग्णांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण सूचना यावेळी
मांडण्यात आल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत राबवण्यात येत
असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातल्या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कारवाई केली आहे. यात सात रोजगार सेवकांच्या सेवा
समाप्तीचे आदेश देण्यात आले असून, दोन सहायक कार्यक्रम अधिकारी,
सात अभियंता आणि दोन संगणक कर्मचारी, अशा एकूण
अकरा कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. फुलंब्री तालुक्यात ३३ गावांमध्ये
९६ कामांसाठी मजुरांचं एकच सामूहिक छायाचित्र, तसंच महिला मजुरांच्या
जागेवर पुरुषांचे, तर पुरुषांच्या जागेवर महिलांची छायाचित्रं
देऊन पाच कोटी १८ लाख रुपयांची देयकं उचलल्याच्या वृत्तावरुन तत्काळ ही कारवाई करण्यात
आली.
****
नाशिक जिल्ह्यात
वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या गडाजवळ इनोव्हा कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा
भाविकांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी हा अपघात झाला. मृत सर्व जण नाशिक जिल्ह्यातल्या
पिंपळगाव बसवंत इथले रहीवाशी होते.
****
बीड जिल्ह्यातून
जाणा-या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची
गंभीर दखल घेण्याच्या मागणीचं निवेदन खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना
काल सादर केलं. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड न करता, पोलिस गस्त
वाढवणं, रात्री विशेष पथकं नियुक्ती, सी.सी.टी.व्ही.
प्रणाली बळकटीकरण आदी मुद्द्यांचा यात समावेश आहे.
****
राज्यात
तापमानात लक्षणीय घट झाली आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता
पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात काल
सर्वात कमी आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. परभणी इथं
११ पूर्णांक पाच, तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तसंच बीड इथं सरासरी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment