Monday, 8 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरु झालं. १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १८ विधेयकं मांडली जाणार आहे.

****

राज्याच्या महाधिवक्ता पदी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागपूर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त १० तासांची विशेष चर्चा होणार आहे. दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेची औपचारिक सुरुवात करतील, तर समारोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करतील. काँग्रेसचे गौरव गोगोई, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षांचे आठ खासदार आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यसभेत उद्या ‘वंदे मातरम’ विषयी विशेष चर्चा आयोजित असून, गृहमंत्री अमित शाह प्रारंभ करतील. स्वातंत्र्य संग्रामापासून राष्ट्राच्या एकात्मता, स्वाभिमान आणि सांस्कृतिक चैतन्याला प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रीय गीताच्या महत्त्वावर दोन्ही सदनांत भर दिला जाणार आहे.

****

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जिल्ह्यात बकरकट्टा इथल्या खैरागडमध्ये १२ कट्टर नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. तर बालाघाट जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांनी काल मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. त्यात ७७ लाख रुपयांच बक्षीस असलेल्या सुरेंदर उर्फ कबीर या नक्षलवादी नेत्याचा समावेश आहे.

****

देशांतर्गत विमान वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेने, सुरळीतपणे सुरू असल्याचं आणि इंडिगोच्या कामगिरीतही सुधारणा होत असल्याचं काल नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. विमान प्रवासाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमाल प्रवासभाड्याची मर्यादा ठरवण्यात आली असून त्याची तत्काळ प्रभावानं अंमलबजावणी केली जाणार आहे. रद्द झालेल्या अथवा वारंवार विलंब झालेल्या विमानांच्या प्रवासभाड्याची रक्कम परत देण्याचे आणि प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेऊन ते २४ तासांत त्यांना परत देण्याचे आदेश इंडिगो कंपनीला देण्यात आले आहेत. तसंच प्रवासभाड्याबाबतच्या नवीन नियमावलीचं काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही मंत्रालयानं सर्व विमान कंपन्यांना दिल्या आहेत.

****

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला होणारा अर्थपुरवठा थांबवण्यासंदर्भात कोणतेही दिशानिर्देश सरकारनं जारी केलेले नाहीत, याबाबत प्रसारित होणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत, असं नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि उपकरणं उत्पादन केंद्रांना होणारा वित्तपुरवठा थांबवावा, असे निर्देश मंत्रालयानं कोणत्याही वित्तीय संस्थेला दिलेले नाहीत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक पातळीवर सौरऊर्जा क्षेत्रात भारताची जागा मजबूत करायला मंत्रालय वचनबद्ध असल्याचंही यात नमूद केलं आहे.

****

आपल्या बलिदानातून धर्माचे जपलेले तत्व आणि मानवतेसाठी धर्माप्रती स्विकारलेली निष्ठा याचा मूलमंत्र देणारे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या हुतात्मा शताब्दी समारोहानिमित्त नागपूर इथं आयोजित महोत्सवात देशभरातून सुमारे पाच लाख भाविक जमले होते. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या  साडेतिनशेव्या शहिदी समागम शताब्दी वर्षाचं औचित्य साधून नागपूरच्या नारा भागातल्या डॉ. सुरेशचंद्र सुरी मैदानात ‘हिंद दी चादर’ या  कार्यक्रमाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. या धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. गुरु तेगबहादुर यांनी संपूर्ण मानवतेसाठी, सत्य, आणि धर्मासाठी संघर्ष केला, असे गौरवोद्गार गडकरी यांनी आपल्या संबोधनातून काढले.

****

मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचं नाव नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी हा नामांतर सोहळा होणार आहे. राज्यातल्या सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांचं नाव देण्याचा निर्णय कौशल्य विभागाने घेतला असून, या निर्णयाचं हे पुढचं पाऊल असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त पुढचे तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याची सुरुवात आज महानगरपालिकेच्या वतीने विविध राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करुन होणार आहे. महानगरपालिकेच्या वाहनांचं पथसंचलन, प्रधानमंत्री जनआरोग्य कार्ड शिबिर, गृह प्रकल्पांची ऑनलाईन सोडत, आरोग्य शिबिर, आंनद नगरी आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

****

आय एस एस एफ नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताचा ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यानं रौप्यपदक पटकावलं आहे. त्यानं ४१३ पूर्णांक ३ गुणांची कमाई केली. दोहा इथं सुरू झालेल्या या स्पर्धेतलं भारताचं हे चौथं पदक आहे.

****

No comments: