Sunday, 26 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२६ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

कर्ज थकवणाऱ्या आणि बुडवणाऱ्यांना कायद्याच्या तावडीतून सुटू देणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. लंडन इथं आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. कर्ज बुडवणं ही मोठी समस्या असून, यासंदर्भात पहिल्यांदाच कडक कारवाई केली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. किंगफिशर कंपनीचा मालक विजय माल्ल्यावर बॅंकांनी अब्जावधी रुपयांच्या थकीत कर्जाबाबत दावा दाखल केल्यानंतर तो इंग्लंडला निघून गेल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सांगितलं. या खटल्यासाठी इंग्लंड कडून माल्ल्याचं प्रत्यार्पण केलं जावं यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.    

****

हमारी धरोहर या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय नवी दिल्ली इथं सांस्कृतिक सौहार्द संमेलन आयोजित करणार आहे. देशात कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य क्षेत्रात विलक्षण प्रतिभावंत व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत काढले. हा संपन्न वारसा देशात सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्दासाठी प्रभावी ठरु शकतो, असं ते यावेळी म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा २९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परिक्षा परवा मंगळवारी २८ तारखेपासून सुरु होणार आहे. या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर मदतवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. तसंच विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं जिल्हापातळीवर समुपदेशनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

//*******//

No comments: