Sunday, 19 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

शाश्वत विकासासाठी दक्षिण आशिया प्रांतात शांतता आवश्यक असल्याचं लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.  इंदोर इथं आयोजित दक्षिण आशियाई देशांमधील संसद सभागृह अध्यक्षांच्या संमेलनात त्या बोलत होत्या. या संमेलनात भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ आणि मालदिव या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दारिद्र्य निर्मूलनासह एक महत्वाकांक्षी, सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित विकास कार्यक्रम आखण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम करण्यासाठी भारत आणि भारतीय संसद कटीबद्ध असल्याचं महाजन यावेळी म्हणाल्या. नागरिक हा सर्वोच्च महत्वाचा घटक असून, कोणत्याही विकासाला मानवी चेहरा असल्याशिवाय तो प्रत्यक्षात येऊ शकत नाही आणि शाश्वत होऊ शकत नाही, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

वस्तू आणि सेवाकरांतर्गत करदात्यांचं विभाजन करणाऱ्या निकषांना बदलण्यासंदर्भातल्या तरतुदींबाबत वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या गेल्या बैठकीचं इतिवृत्त रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष शासित राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. परिषदेच्या या आधीच्या बैठकीत दीड कोटी रूपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या ९० टक्के करदात्यांचं मूल्यमापन राज्यांनी आणि उर्वरित १० टक्के करदात्यांचं मूल्यमापन केंद्र सरकारनं करण्याचा मुद्दा मान्य करण्यात आला होता. मात्र या बैठकीच्या इतिवृत्तानुसार राज्यांना हे मूल्यमापन केंद्राशी सल्लामसलत करून वेगळ्या प्रमाणात करण्याची मुभा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. याला काही राज्यांनी विरोध केला आहे.

****

आरोग्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या भूमिका निश्चित करणारं एक धोरण असणं आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यामुळे राज्यांना आपल्याला अनुकूल पद्धतीने यासंदर्भात काम करण्याचं स्वातंत्र्य मिळेल, असं संघटनेचं म्हणणं आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यं असणाऱ्या देशात विविध आरोग्य समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टीकोनाची गरज असल्याचं संघटनेच्या प्रतिनिधीनं कोलकाता इथं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं.

यावेळी त्यांनी, भारताच्या राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाची प्रशंसा केली तसंच सरकारनं आरोग्याला आणखी प्राधान्य देत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचं आवाहन केलं.

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज सुरू आहे. राज्याच्या १२ जिल्ह्यातल्या ६९ विधानसभा मतदारसंघांसाठी या टप्प्यात निवडणूक होत आहे. यात सुमारे २ कोटी ४१ लाख मतदार आठशे सव्वीस उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. आतापर्यंत साधारण २४ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. एकूण २५ हजार सहाशे तीन मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज सर्वत्र अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरात अनेक संस्था आणि संघटनांनी शिवजयंतीनिमित्त वाहन फेरीचं आयोजन केलं.

लातूर इथं जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर नांदेड शहरातल्या नवा मोंढा भागातून आज शिवजयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत तलवारबाजी आणि काठी चालविण्याची प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. तसंच शहरात मोटारसायकल फेरीचंही आयोजन करण्यात आलं आहे. 

****

राज्यातल्या महिला आणि मुलींना तक्रार दाखल करता यावी यासाठी लवकरच एक ॲप तयार करण्यात येणार आहे. या ॲपमार्फत आपल्या तक्रारी राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचविता येतील. आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी काल ही माहिती दिली. महिला आयोग तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

****

राज्यात वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नीट पीजी किंवा नीट एमडीएसव्दारे राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेली तात्पुरती गुणवत्ता यादी उद्या www.dmer.org आणि www.mahacet.org या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त कमलाकर फड यांनी ही माहिती दिली आहे.

//*****//

No comments: