Saturday, 25 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 25 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

उत्तर-पूर्वेकडील राज्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास अपूर्ण असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच देशाच्या विकासामध्ये या भागाचा विकास हा प्रमुख विषय असायला हवा, ते म्हणाले. ते आज मणिपूरमधील पश्चिम इंफाळ या जिल्ह्यात एका प्रचारसभेत बोलत होते. सध्याचं मणिपूरमधील सरकार राज्याच्या विकासाबाबत गंभीर नसल्याचं सांगत विकासासाठी त्यांनी भाजपच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन यावेळी केलं.

****

केंद्र सरकारनं तामिळनाडू सरकारला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना - मनरेगाअंतर्गत रोजगारांच्या दिवसांची संख्या १०० हून १५० पर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ जाणवत असल्यामुळे लोकांना जास्तीच्या रोजगाराची आवश्यकता असल्यानं ही वाढ करण्यात आली असल्याचं, राज्य सरकारनं म्हटलं आहे.

****

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यामध्ये हवा ही भाजपच्या बाजूने वाहत असून भाजप सरकार धर्म आणि पंथाच्या आधारे भेदभाव न करता विकासकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. ते उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगरमध्ये एका प्रचारसभेला संबोधित करत होते. केंद्र सरकार अल्प आणि मध्यम शेतकऱ्यांची कर्जं तात्काळ माफ करणार असल्याचं आश्वासन शहा यांनी यावेळी दिलं. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा २९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून काम करत राहू, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांमधील विजयानंतर मुख्यमंत्री आज शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

****

बदलत्या हवामानामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीला समोरं जावं लागत असल्यामुळे बी-बियाणे कंपन्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन दर्जेदार बियाणांचं उत्पादन करण्याचं आवाहन, कृषी, फलोत्पादन आणि विपणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं कृषी विभाग आणि सीड इंडस्ट्रिज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र-सियामच्या वतीनं गोलवाडी इथं भरवण्यात आलेल्या पीक प्रात्यक्षिक आणि शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तूर खरेदी केंद्रांसाठी बारादान्यांची उपलब्धता झाली असून सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी नियमितपणे केली जाणार असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.

जालन्यात सीड पार्कची उभारणी करण्यात येणार असून, पाण्याच्या नियोजनापासून ते शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी राज्यात चार हजार कोटी रूपयांचा पथदर्शी प्रकल्प येत्या मार्च नंतर राबवण्यात येणार असल्याचंही खोत यांनी यावेळी सांगितलं.

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी यावेळी बोलताना, शेतीचं पेरणीयोग्य क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होत असून जे पडीत क्षेत्र आहे त्या शेतमालकांना दंड लावणार असल्याचं सांगितलं. या पीक प्रात्याक्षिक आणि शेतकरी मेळाव्यात २१ कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे.

****

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त औरंगाबाद इथं ग्रंथालय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. समर्थनगर इथल्या शासकीय विभागीय ग्रंथालयात हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून, सरस्वती महाविद्यालयाचे मराठी भाषा विभाग प्रमुख ॠषिकेश कांबळे यांचं मराठी भाषेवर व्याख्यान होणार आहे.

नांदेड इथंही २७ फेब्रुवारीला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं ‘माय मराठीचा उत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल दारुकांडाप्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आलं आहे. यात एक पोलीस उपअधीक्षक, दोन उपनिरीक्षकांसह अन्य तीन पोलिसांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. पांगरमल इथं निवडणूक प्रचारानंतर आयोजित कार्यक्रमात विषारी दारु पिऊन आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पुणे इथं झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ४४२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १०७ धावात सर्वबाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया एक - शून्यनं आघाडीवर आहे. या मालिकेतला दुसरा सामना बंगळुरु इथं येत्या चार मार्चपासून खेळला जाणार आहे.  

****

No comments: