Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 27 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी
सर्वांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन साहित्यिक ॠषीकेश कांबळे यांनी केलं आहे. औरंगाबाद
इथं आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथांच्या
प्रदर्शनाचं उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शहरात विभागीय आयुक्त कार्यालयासह अनेक ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
****
अस्सल मराठी
बोलणं आजकाल दुरापास्त होत असल्याची खंत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केली आहे. ते आज मराठी
भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भाषेचा योग्य वापर होत नसल्यामुळे
ती ऱ्हास पावते, भाषा जोपासण्याची गरज असल्यामुळे अस्सल
मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प करण्याचं आवाहन कुलगुरुंनी यावेळी केलं.
****
देशातल्या तरुणांमध्ये
प्रचंड क्षमता असून वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानासाठी इच्छाशक्तीची गरज असल्याचं
वोक्हार्ट संशोधन केंद्राचे व्यवस्थापक डॉ.प्रकाश
चांडक यांनी म्हटलं आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय
विज्ञान दिनानिमित्त आयोजित स्पर्धेचं उद्घाटन आज चांडक यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. कुलगुरु बी.ए.चोपडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारताचा गेल्या
अनेक वर्षांपासून विकसनशील देशामध्ये समावेश असून विकसित देशात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
नांदेड इथं
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं होतं. तंत्रज्ञानासोबतच भाषा संवर्धनाची मनोवृत्तीही विकसित व्हायला
पाहिजे, असं मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षणशास्त्र संकुलाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.महेश जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ
विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. परीक्षार्थ्यांसाठी मंडळानं विभागीय स्तरावर हेल्पलाइन सुरू केली असून, परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध
राहणार आहे. यामार्फत परीक्षेचं वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना
माहिती पुरवली जाणार आहे. दरम्यानं, दहावीच्या लेखी परीक्षेला येत्या सात मार्चपासून सुरुवात होणार आहे.
****
२०१४ च्या लाचखोरी प्रकरणात उस्मानाबाद इथल्या तत्कालिन महसूल अधिकारी शोभा
राऊत याना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयानं राऊत याना शेतजमीन संपादन प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात दोषी
धरून, चार वर्षे सश्रम कारावास आणि पन्नास हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. उस्मानाबाद तालुक्यात कौडगाव शिवारात औद्योगिक वसाहतीकरता शेतजमीन संपादित करताना राऊत यांनी शेतकऱ्यांना
मिळणाऱ्या मोबदल्यातून पाच टक्के रक्कम मागितली होती.
****
राज्यात डिझेलवर होणारी रेल्वे वाहतुक येत्या तीन ते चार वर्षांत इतिहासजमा होईल, असं मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी के शर्मा यांनी म्हटलं आहे. ते सोलापूर इथं बोलत होते. राज्यातल्या सर्वच रेल्वे मार्गांचं येत्या तीन ते चार वर्षात विद्युतीकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासखर्चात चौपट वाढ केली असल्यानं, रेल्वेची सर्व विकासकामं येत्या दोन वर्षात मार्गी लागतील,
असं त्यांनी सांगितलं. मनमाड दौंड रेल्वे मार्गावरच्या विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
****
नवी दिल्ली
इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज जीतू राय आणि हीना
सिंधू यांनी आज १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. पुरुषांच्या गटात अंकूर मित्तल यानं डबल ट्रॅप प्रकारात
रौप्य पदक पटकावलं, या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत
चार पदकं मिळवली आहेत.
****
देशातल्या क्रीडापटूंना उच्च
दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ३५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, भारतीय
क्रीडा प्राधिकरणात २०० प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कुरुक्षेत्र इथं
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक हीरा बल्लभ यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
खेळाडूंना दुखापत झाल्यास लवकर उपचार मिळण्यासाठी देशभरात फिजिओथेरपी केंद्र उभारणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण हमी योजनेप्रमाणे
राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येक गावात खेळाचा प्रचार प्रसार करणार असल्याचं बल्लभ
यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment