Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
· राज्यातल्या दहा महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदां आणि
११८ पंचायत समित्यांसाठी आज मतदान
· मुख्यमंत्र्यांविरूद्ध आचारसंहिता भंगाची शिवसेनेची तक्रार
· मराठवाड्यातल्या बाजारात तुरीची मोठी आवक
आणि
· माजी शिक्षण संचालक पं. तु. महाजन यांचं निधन
****
राज्यातल्या दहा महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा
जिल्हा परिषदां आणि ११८ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी साडे सात ते
सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत हे मतदान होईल. सर्व जिल्ह्यांमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर
कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड,
सोलापूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या १० महापालिकांमध्ये एक हजार २६८ जागांसाठी मतदान
होणार असून तब्बल ९ हजार २०८ उमेदवार रिंगणात
आहेत.
जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती,
गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार असून
जिल्हा परिषदेसाठी २ हजार ९५६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पंचायत समित्यांच्या एक हजार २८८ जागांवर ५ हजार १६७ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.
दरम्यान, परवानाधारक व्यावसायिकांना महानगरपालिका निवडणुकीचा
निकाल घोषित झाल्यानंतर मद्य विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं
मुभा दिली आहे. १५ फेब्रुवारी रोजी सरकारनं
आदेश जारी करून, २०, २१ आणि २३ फेब्रुवारी
रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवण्यास सांगितले होते.
****
प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हे मुलाखत देत आहेत, त्यामुळे आचारसंहितेचा
भंग झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे काल
तक्रार केली. शिवसेनेच्यावतीनं अनिल देसाई यांनी ही तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असल्याची
माहिती, खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली. आचारसंहिता परवा दुपारी
पाच वाजता संपल्यांनंतरही भारतीय जनता पक्षाचं
निवडणूक चिन्ह लावून, सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखत दिली, असं राऊत यांनी
संगितलं.
****
किशोर
वयातल्या मुलां- मुलींमधल्या शारिरीक आणि मानसिक बदलांसह अन्य आरोग्य समस्या सोडवण्यासाठी
केंद्र सरकारनं कालपासून एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या एक लाख साठ हजार मुलामुलींना प्रशिक्षण दिलं
जाणार आहे. यासाठी साथिया आणि साथिया सलाह या मोबाईल ॲपचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य
सचिव सी.के मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमांतर्गत
हा कार्यक्रम राबवला जात आहे.
****
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी, तसंच शांतता परिसरात काढण्यात
येणाऱ्या फेऱ्या आणि उभारण्यात येणारे मंडप यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती
कधी स्थापन करणार, अशी विचारणा, मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला केली. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांच्या सुनावणी
दरम्यान उच्च न्यायालयानं ही विचारणा केली. या समितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाचे अधिकारीही घेण्याची, सूचना न्यायालयानं केली आहे. तक्रार करण्यासाठी एक स्वतंत्र
यंत्रणा असावी, असंही न्यायालयानं सूचवलं आहे, सध्या अशी तक्रार पोलिसांकडे केली जाते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या, २६ फेब्रुवारीला आकाशवाणीवरील,
‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा
हा २९ वा भाग असेल. या कार्यक्रमांसाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार २२ फेब्रुवारी पर्यंत नरेंद्र मोदी ॲप वर किंवा
माय जी ओ व्ही खुल्या मंचावर, तसंच, १८०० ११
७८०० या टोल फ्री क्रमांकावर पाठवता येणार आहेत.
****
मराठवाड्यात यंदा तुरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे
बाजारात तुरीची आवक वाढली आहे, तुरीचे दर कमी होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय
कृषी पणन महासंघ नाफेडनं हमी भाव देत प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी तूर खरेदी केंद्र
सुरू केली आहेत, मात्र आवक अपेक्षेपेक्षा अधिक होत असल्यामुळे तूर साठवणुकीसाठी बारदाना
आणि गोदामं कमी पडू लागली आहेत, परीणामी काही खरेदी केंद्र बंद करावी लागली आहेत. यामुळे
शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरात तूर विक्री करण्याची वेळ
आली आहे.
काल ही तूर खरेदी केंद्रांवर मोठी आवक झाली. लातूर इथं, २५
हजार क्विंटल, बीड इथं आतापर्यंत चाळीस हजार क्विंटल, हिंगोली इथं, ९ हजार क्विंटल,
मानवत इथं साडेपाच हजार क्विंटल, उस्मानाबाद इथंही मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाली.
परभणी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. सोयाबिन आणि
हरभऱ्याचीही आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारीत केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं शिवजयंती मिरवणुकीमध्ये झालेल्या
दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेच्या निषेधार्थ काल परतूर शहरात बंद पाळण्यात आला. या घटनेप्रकरणी
३४ जणांविरुद्ध गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत काल शांतता
समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलतांना लोणीकर यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना
राज्य सरकारकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन दिलं.
****
माजी शिक्षण संचालक आणि महाराष्ट्र
राज्य शिक्षण मंडळांचे माजी अध्यक्ष, पं. तु. महाजन यांचं काल सायंकाळी औरंगाबाद इथं
ह्रदयविकारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. आज सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थीव
देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या धोंडराई इथं स्टेट बँक
ऑफ हैद्राबादची रोकड लु़टणाऱ्या दोन आरोपींना
गेवराईच्या न्यायालयानं तीन वर्षांची कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड
ठोठावला आहे. १४ जुलै २०१६ रोजी बँकेच्या
धोंडराई इथल्या शाखेचे रोखपाल १५ लाख रुपयांची रोकड गेवराईच्या शाखेत भरण्यासाठी
घेऊन जात असतांना या दोघांनी ही रक्कम लुटली होती.
****
बीड जिल्ह्यातल्या वडवणी नगर पंचायतीच्या
नगराध्यक्ष मंगल राजाभाऊ मुंडे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल
करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी हा ठराव दाखल केला.
****
कॉम्रेड गोविंद
पानसरेंची हत्या होऊन दोन वर्ष झाले तरी, त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही,
याच्या निषेधार्थ आणि पानसरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव
इथं, निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा
तपास लवकरात लवकर लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
नायगाव शाखेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मॉर्निंग वॉकमध्ये शाखा सचिव भाऊराव मोरे
यांच्या सह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद इथंही काल पानसरे यांच्या
पुण्यतिथी निमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आंबेडकरांच्या
पुतळ्या पासून ते शहरातल्या भडकल गेट पर्यंत मॉर्निंग वॉक काढण्यात आला. या वॉकमध्ये,
लोकशाहीवादी पक्ष, संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभाग झाले होते. दाभोलकर, पानसरे,
कलबुर्गी यांच्या हत्यांच्या तपासाला गती मिळावी, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन
समिती तर्फे जिल्हाधिकारी निधी पांडेय यांना निवेदन देण्यात आलं.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षान्त समारंभ, येत्या रविवारी २६ फेब्रुवारीला होणार आहे.
या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून, राज्यपाल आणि कुलपति सी. विद्यासागर राव, तर प्रमुख पाहुणे
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्यावतीनं पवार यांना यावेळी डी लिट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्त्यावर
वाळूनं भरलेल्या हायवा ट्रकनं एका दुचाकीला
चिरडल्यानं, झालेल्या अपघातात काल दुचाकीवरील तीन वर्षीय मुलगी जागीच ठार झाली. तर
पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या
घटनेनंतर पोलिसांनी चालकास अटक केली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथल्या
दारुकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करावी
आणि या प्रकरणी विशेष सरकारी विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागण्यांसाठी
पांगरमल ग्रामस्थांनी काल पांढरीपूल इथं रस्ता रोको आंदोलन केलं.
//*******//
No comments:
Post a Comment