Wednesday, 22 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 22 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता वीस हजार मेगॅवॉटवरून चाळीस हजार मेगॅवॉटपर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियासोबत नागरी हवाई वाहतुक सुरक्षा सहकार्य करार, भारत आणि ग्रीस दरम्यान हवाई सेवा करार, भारत आणि पोलंड दरम्यान कृषी सहकार्य करार, तसंच नेपाळमधल्या अरुण- तीन, या जलविद्युत प्रकल्पामध्ये पाच हजार सातशे तेवीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावालाही आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

****

भारत पाकिस्तान दरम्यान, नियंत्रणरेषेवरील घडामोडींच्या संख्येत मागील काही महिन्यांच्या किंवा गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचं जाणवत आहे, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक - लक्ष्यभेदी कारवाईमुळे हा परिणाम झाल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यातून सूचित होतं, असं यूएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आधार क्रमांकाशी संलग्नित स्काईप लाईट या सेवेची मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी घोषणा केली आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नडेला यांनी मायक्रोसॉफ्टकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती दिली. प्रोजेक्ट संगम या उपक्रमाच्या माध्यमातून कुशल कारागीरांना रोजगार मिळवून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. ९९ डॉट्स या उपक्रमामुळे डॉक्टरांना क्षयरुग्णांशी संवाद साधणं सोपं झाल्याचं नडेला म्हणाले.

****

अंत्योदय एक्सप्रेस ही सर्वसामान्यांसाठी तयार केलेली रेल्वे गाडी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्राला अर्पण केली. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या श्रेणीतली पहिली रेल्वे लवकरच मुंबई ते टाटानगर मार्गावर धावणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या रेल्वेत सर्व सुविधा प्रथम श्रेणीच्या दर्जाच्या असतील, असं प्रभू यांनी सांगितलं.

****

मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, जालना इथल्या हिरालाल अग्रवाल या उद्योजकाच्या कुटुंबियांना, दक्षिण मध्य रेल्वे आणि विमा कंपनीनं तीस लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि व्याजापोटी पंधरा लाख रुपये, इतकी रक्कम द्यावी, असा आदेश जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिला आहे. या रकमेतील सत्तर टक्के रक्कम दक्षिण मध्य रेल्वेनं आणि तीस टक्के रक्कम विमा कंपनीनं द्यावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे. मार्च २००९ मध्ये औरंगाबाद जवळ करमाड इथं मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या या अपघातात अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता.

****

गंगाखेड नगरपरिषदेच्या मालकीची जागा भाडेतत्वावर देण्याबाबत अंतिम आदेश काढण्यासाठी पंचवीस हजार रुपये लाच घेताना कार्यालयीन अधीक्षक शामकांत काळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली.या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची येत्या सव्वीस फेब्रुवारीला होणार असलेली एम्.फिल. ची प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, ती आता येत्या पाच मार्चला होईल, असं विद्यापीठानं एका परिपत्रकाद्वारे कळवलं आहे. सव्वीस फेब्रुवारीला विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षान्त समारंभ असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पहिला सामना सुरू होईल. भारतानं याआधी इंग्लंड विरुध्दची पाच कसोटी सामन्यांची मालिका चार - शून्य अशा फरकानं तर बांगलादेशसोबतचा एकमेव कसोटी सामनाही जिंकला आहे.

****

राज्यातल्या दहा महानगरपालिका, अकरा जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी काल झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परिषदांचे ४६० गट आणि ७६ पंचायत समित्यांच्या ९३० जागांचा समावेश आहे. उद्या सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून, सायंकाळपर्यंत पूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

****

औरंगाबाद इथल्या सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेचा शालिनीताई सदाव्रते स्मृती सदाचार संवर्धक पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या डॉ मधुश्री संजीव सावजी यांना जाहीर झाला आहे. शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या औरंगाबाद इथं एका छोटेखानी समारंभात डॉ सावजी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

******//


No comments: