Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 5 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यातल्या विधान परिषदेच्या
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातल्या
एकूण पाच जागांसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. यात औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघांचा,
तर अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदार
संघांचा समावेश आहे. तीन
फेब्रुवारीला औरंगाबाद विभागात आठ जिल्ह्यातल्या २७५ मतदान केंद्रांवर सरासरी ८७ टक्के मतदान झालं.
****
तामिळनाडूच्या सत्ताधारी अण्णाद्रमुक
पक्षाच्या सर्व आमदारांनी आज पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची पक्षाच्या विधिमंडळ
नेत्या म्हणून निवड केली असून, ओ पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
आहे. आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर शशिकला यांचा
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर
पनीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण शशिकला यांनीच
पदभार स्वीकारावा, अशी मागणी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे उपसभापती एम.थंबीदुराई
यांनी केली होती.
****
केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण
क्षेत्रात सुधारणेसाठी विविध स्वरुपाच्या तरतुदी करण्यात आल्याचं, केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी
बोलत होते. शिक्षणतज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाची
गुणवत्ता सुधारण्यावर जास्त भर देण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची
तरतूद केली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
२०१७ हे वर्ष आर्थिक सुधारणांचं
वर्ष म्हणून सदैव लक्षात राहील, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम
मेघवाल यांनी केलं आहे. राजस्थानमधल्या कोटा इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारनं
केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे कर भरणारा समाज निर्माण होत असून, त्यामुळे सामाजिक सुरक्षा
आणि रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले. डिजिटल
अर्थव्यवस्था आणि वस्तु आणि सेवा कर विधेयकामुळे देशाची आर्थिक प्रगती होणार असल्याचं
मत मेघवाल यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
आरक्षित कोट्यातून
निवडून आलेल्या उमेदवारानं सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक
असून, या कायद्याची राज्य निवडणूक आयोग कठोरपणे अंमलबजावणी करत असल्याचं राज्य निवडणूक
आयुक्त जे. एस. सहारिया
यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक
कामांचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. राज्यात अजूनही ४५० नगरसेवकांनी जात पडताळणी
प्रमाणपत्र सादर केलं नाही, त्याचा आढावा आपण घेत असल्याचं ते म्हणाले. आचारसंहितेची
काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असून, निर्भयपणे या निवडणुका पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग
सज्ज आहे, असंही सहारिया यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यातील
पहिले सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी आज वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण
केलं. त्यानिमित्त औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
संशोधन संस्थेच्या वतीनं त्यांचा गौरव समारंभ सध्या सुरु आहे. संस्थेनं आज मराठवाड्याचा विकास
- बँकांचा अनुशेष या विषयावर विशेष चर्चासत्राचंही आयोजन केलं होतं.
****
मुक्ता
साळवे यांनी लिहिलेला निबंध म्हणजे दलित साहित्याची गंगोत्री असल्याचं मत, ज्येष्ठ
साहित्यिक डॉ.जनार्धन
वाघमारे यांनी व्यक्त केलं. लातूर इथं तिसऱ्या राजस्तरीय सत्यशोधिका मुक्ता
साळवे साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज वाघमारे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. संमेलनाध्यक्षा प्राध्यापक प्रतिमा परदेशी आणि प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजिक
कार्यकर्ते रमेश
राक्षे यावेळी उपस्थित होते. मुक्ता साळवे यांच्यासंबंधी अधिक माहिती मिळवून समाजासमोर
आणण्याचं मोठं आव्हान इतिहासकारांपुढे असल्याचं मत संमेलनाचे संयोजक डॉ.माधव गादेकर
यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी
चौकटीबाहेर पडून विचार करायला हवा, असं आवाहन महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे
यांनी केलं आहे.
औरंगाबाद इथल्या वसंतराव नाईक महाविद्यालयात झालेल्या स्पर्धा
परीक्षा करिअर साहित्य संमेलनात ते
आज बोलत होते. स्पर्धा परीक्षांचं बदलतं स्वरुप आणि अडचणींविषयी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम
भापकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं.
****
उस्मानाबाद
इथं येत्या सात ते नऊ एप्रिल दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य
परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेची रुपरेषा ठरवण्यासाठी सात फेब्रुवारीला
बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस नाट्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचं आवाहन अखिल भारतीय
मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेनं केलं आहे.
****
महिलांच्या आरोग्यासाठी कार्य
करणाऱ्या गेट गोईंग संस्थेनं आयोजित केलेली हाफ मॅरेथॉन आज औरंगाबाद इथं पार पडली.
विभागीय क्रीडा संकुलापासून सकाळी सहा वाजता स्पर्धेला सुरवात झाली. पाच, दहा आणि एकवीस
किलोमीटर अशा तीन गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे दोन हाजार नागरिकांनी सहभाग
घेतला.
****
No comments:
Post a Comment