Thursday, 2 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

बँकांनी आपल्या सर्व ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारनं हा आदेश दिला असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. यासाठी सर्व बँकांनी राष्ट्रीय अभियान चालवण्यास सांगण्यात आलं आहे. जे ग्राहक यु पी आय किंवा भिम ॲपचा वापर करतात त्यांना थेट मोबाईल बँकिंगशी जोडलं जाणार आहे. स्टार्ट अप उद्योगात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकार त्यांना भांडवल आणि मार्गदर्शन उपलब्ध करुन देणार असल्याचंही सुंदरराजन यांनी यावेळी सांगितलं.

****

भारतात जागतिक बँकेची भागीदारी वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. जेटली यांनी जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टिलीना आय जियोरजिवा यांची काल भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भारतानं सध्या फक्त आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक - आय बी आर डीच्या माध्यमातून जागतिक बँकेची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. बँक समूहात भांडवल वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.  

****

भारतीय प्रशासकीय सेवेचे वरीष्ठ अधिकारी अजय त्यागी यांची भारतीय प्रतिभूती नियामक महांमडळ - सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यागी यांनी मुंबई इथं सेबीचे माजी अध्यक्ष यु के सिन्हा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा असणार आहे.   

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओनं संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या सुपरसॉनिक लक्ष्यक्षेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थेच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. ओडिशा किनारपट्टीजवळ अब्दुल कलाम बेटावर काल ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे शत्रूच्या, कमी उंचीवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वेध घेण्यास सक्षम तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे, ही बाब देशासाठी गौरवास्पद असल्याचं, पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

मुंबई महापालिकेत यंदा नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी १९ टक्के नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. सुमारे ४३ नगरसेवकांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, यामध्ये हत्येचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, अशा स्वरुपाच्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. मतदानाबाबत मतदारांच्या उदासीन धोरणामुळे राजकीय पक्ष पैसा आणि शक्तीच्या बळावर निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात, असं मत निवडणूक विभागाशी  संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरु असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेनुसार आता येत्या ३० एप्रिल पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज आणि विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. तसंच एक मे ते ३१ जुलै या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज आणि १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी पाच वाजता, शहरातल्या पोलिस आयुक्तालयाची नियोजित प्रशासकीय इमारत तसंच पोलिस अधिकारी कर्मचारी निवासस्थानाच्या नियोजित जागेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे प्रस्थान करतील.

****

दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या जालना इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. पात्रतेनुसार सरळ मुलाखतीद्वारे उमेदवारांची प्रत्यक्ष निवड करण्यात येणार असून, उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बी सी सीआयनं वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर अष्ट्रपैलू  खेळाडू रविचंद्रन आश्विनची दिलीप सरदेसाई पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या आठ  मार्चला बंगळुरू इथं होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

//*******//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...