Tuesday, 16 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.05.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 May 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०१ दुपारी .००वा.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्थी चिदंबरम यांच्या घरावर आज सीबीआयनं छापे मारले. मनी लाँडरिंगच्या आरोपावरून हे छापे मारण्यात आले आहेत. सन २००६ मध्ये झालेल्या एअरसेल-मॅक्सिस यांच्या तीन हजार ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारास परकीय गुंतवणूक वृद्धी मंडळानं मान्यता दिल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं हे छापे मारले. चिदंबरम यांच्या चेन्नई इथल्या आठ निवासस्थानांसह दिल्ली आणि नोएडा इथली आठ ठिकाणं, अशा एकूण सोळा ठिकाणी हे धाडसत्र सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, सीबीआय आणि इतर संस्थांच्या माध्यमातून आपल्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना लक्ष्य केलं जात असून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच सरकारच्या धोरणांविरोधातलं आपलं लिखाण आणि वक्तव्य थांबणार नसल्याचं चिदंबरम यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.  

****

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या किमान २२ मालमत्तांवर आज सकाळी आयकर विभागानं छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी तसंच एक हजार कोटींचा जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोप यादव यांच्यावर आहे. तसंच बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या संबंधित कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. दिल्ली, गुरुग्राम आणि पाटणा येथील लालू प्रसाद यादव यांच्या मालमत्तांच्या ठिकाणी आयकर विभागानं हे छापे टाकले आहेत.

****

भारताचे माजी लष्कर अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी भारताच्या तरतुदीत्मक उपाययोजनांच्या विनंतीवर लवकरात लवकर आदेश जारी केले जातील, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयानं सांगितलं आहे. भारतांना जाधव यांची फाशीची शिक्षा तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी पूर्ण होण्याआधी पाकिस्तान जाधव यांना फाशी देवू शकतो, अशी शंका भारतानं व्यक्त केली आहे. न्यायालयानं यासंदर्भातील आपला निकाल राखून ठेवला असून, आदेश जारी करण्याची तारीख दोन्ही पक्षांना कळवली जाईल असं सांगितलं आहे.

****

जगभरात रॅन्समवेअर या व्हायरसद्वारे झालेल्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महत्वाच्या आणि संवदेनशील क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना  सूचना आणि विवरण सुरक्षित ठेवण्यासाठी इंटरनेटचा पुरवठा असणाऱ्या संगणकाऐवजी स्वतःच्या संगणकावर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत काही मंत्रालयं आणि विभागांना वारंवार सूचना देण्यात येत असल्याचं नवी दिल्ली इथं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतात या सायबर हल्ल्याचा विशेष परिणाम झाला नसल्याचं म्हटलं आहे.

****

प्रत्येकानं आपला परिसर डासमुक्त ठेवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी देशातील जनतेला केलं आहे. ट्विटर या सामाजिक माध्यमावर आपल्या संदेशात त्यांनी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्रत्येक व्यक्तीनं डेंग्यू नियंत्रणात सहभाग नोंदवण्याचंही आवाहन केलं आहे. डेंग्यूबाबत जागरूकता निर्माण करणं, त्याचं निवारण करणं आणि या रोगाचा प्रसार होण्याचा मोसम समाप्त होईपर्यंत डेंग्यूला नियंत्रित करण्याच्या उद्देशानं आजचा हा दिवस साजरा केला जातो.

****

परभणी इथं आज झालेल्या महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या  निवडणुकीत काँग्रेसच्या मिनाताई वरपुडकर या महापौरपदी तर काँग्रेसचेच सय्यद समी सय्यद साहेबखान हे उपमहापौरपदी विजयी झाले. वरपुडकर यांना ४० मतं मिळाली तर सय्यद समी सय्यद साहेबखान यांना ३२ मतं मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या एका सदस्यानं तटस्थ भूमिका घेतली तर शिवसनेचे पाच सदस्य अनुपस्थित होते.

****

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ४८ वर्षांचे होते. सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. नवनाथ कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुण्यात भाजप बरोबर युती केल्यानंतर रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांना उपमहापौर बनण्याची संधी मिळाली होती. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असलेले नवनाथ कांबळे रामदास आठवले यांचे निकटचे स्नेही होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथला ऐतिहासिक भुईकोट किल्ला हा मराठवाड्याचं आदर्श पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होईल, तसंच या किल्ल्याला जगाच्या नकाशावर आणण्याचं प्रतिपादन राज्याच्या गड, कोट किल्ले संवर्धन समितीचे सदिच्छा दूत-ब्रँण्ड अँबेसेडर खासदार संभाजी राजे यांनी केलं. त्यांनी काल परंडा इथल्या भुईकोट किल्ल्याला भेट देवून विविध विकास कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. किल्ल्यात लाईट आणि संगीत कार्यक्रमाकरीता निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 12 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 12 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...