Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 17
MAY 2017
Time -
17.25 to 17.30
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १७
मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावाच्या स्थितीकडे संयुक्त राष्ट्र संघाचं
बारकाईनं लक्ष आहे, असं संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं
आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गटरर्स यांचं भारत-पाक सीमेवरच्या तणावाकडे
लक्ष असून, या दोन्ही देशांनी चर्चा आणि संवादाच्या माध्यमातूनच हा वाद सोडवला पाहिजे,
असं त्यांचं मत असल्याचं दुजारिक यांनी म्हटलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयामध्ये
सध्या सुरु असलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज जमात-उलेमा-ए-हिंदच्या वतीनं वरिष्ठ वकील
राजू रामचंद्रन यांनी बाजू मांडली. भारतात विशेष विवाह कायदा अस्तित्वात असून, कोणत्याही
धर्माचा भारतीय नागरिक आपला वैयक्तिक कायदा बाजूला ठेवून विशेष विवाह कायद्यानुसार
विवाह करु शकतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं. तिहेरी तलाक पध्दती रद्द करण्याऱ्या देशांच्या
कायद्याचा आधार याचिकाकर्त्या आणि भारत सरकार घेत असून, भारताच्या वैयक्तिक कायद्यांची
संवैधानिकता दुसऱ्या देशांच्या कायद्यांच्या आधारे ठरवली जाऊ शकत नाही, असं रामचंद्रन
यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण काश्मीरमधल्या
शोपियां जिल्ह्यातल्या हैफ या गावात सुरक्षा दलानं हाती घेलेली शोध मोहिम पूर्ण झाली
आहे. शोपियां जिल्ह्यातून अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वीही
अशीच मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.
****
राष्ट्रीय जनता
दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या बावीस स्थानांवर आयकर विभागानं धाडी घातल्याच्या
पार्श्वभूमीवर, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या पाटणा इथल्या
कार्यालयावर हल्ला केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी मारामारी होऊन,
भाजपचे अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
विधीमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोर्चा काढणार असल्याची
माहिती, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. येत्या
शुक्रवारी नाशिक इथं शिवसेनेच्या वतीनं आयोजित कृषी अधिवेशनासंदर्भात पत्रकारांशी बोलताना
त्यांनी आज नाशिक इथं हि माहिती दिली.
****
अभियांत्रिकीच्या
द्वितीय वर्षाचे परीक्षा झालेले पेपर पुन्हा सोडवत असलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांना
आणि काही प्राध्यापकांना आज गुन्हे शाखेनं औरंगाबादमधून ताब्यात घेतलं. सिडको भागात
नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी पेपर सोडवत असल्याची माहिती
मिळाल्यानंतर गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. बांधकाम अभियांत्रिकी अर्थात सिव्हील इंजिनिअरिंगच्या
‘बिल्डींग कन्स्ट्रक्शन’ या विषयाचे पेपर पुन्हा सोडवत असलेले बावीस विद्यार्थी, तीन
विद्यार्थीनी आणि काही प्राध्यापक यांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं असून पुढची कायदेशीर
कारवाई सुरु केली आहे.
****
औरंगाबाद, जालना,
बीड आणि लातूर या जिल्ह्यातल्या अनुसूचित जमातीच्या इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची सरकारची योजना आहे.
शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसलेल्या आणि एक लाख रुपयांच्या खाली वार्षिक उत्पन्न
असणाऱ्या अनुसूचित पालकांची मुलं या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेसाठीचे अर्ज करण्याची
मुदत येत्या एकतीस तारखेपर्यंत असून यासंबंधीची अधिक माहिती औरंगाबादच्या एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या विजेच्या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीनं पालिकेच्या
मुख्यालयावर सौर ऊर्जा उपकरणं बसवण्यात येणार आहे. मनपा आयुक्त डी.एम.मुगळीकर यांनी
ही माहिती दिली आहे. मनपा मुख्य कार्यालयासोबतच सिद्धार्थ उद्यान, प्राणी संग्रहालय,
मनपाच्या शाळा आणि इस्पितळं यावरही सौर ऊर्जा उपकरणं बसवण्यात येणार असल्याचं मुगळीकर
यांनी सांगितलं आहे. याशिवाय शहरात वीस ग्रीन बसेस सुरू करण्यात येणार असून त्यातून
शहरवासियांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सोलर
सिटी योजनेत देशातल्या पंचावन्न शहरांची निवड झालेली असून त्यात मराठवाड्यातली औरंगाबाद
आणि नांदेड या शहरांचा समावेश आहे.
****
परभणी जिल्ह्यातील
काँग्रेसचे नेते आणि जिंतुरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि परभणी जिल्हा बँकेचे
अध्यक्ष कुंडलिकराव नागरे यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
****
लातूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील खाजगी क्षेत्रातील उद्योजकांकरीता
विविध पदे भरण्यासाठी येत्या १९ मे रोजी सकाळी
१०.३० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औसा रोड, लातूर इथं रोजगार मेळावा आयोजित
करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात लातूर जिल्ह्यातील उमेदवारांकरीता तीन उद्योजक
२६५ पदांकरता पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment