Friday, 19 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी मध्ये संपूर्ण सेवा क्षेत्र अंतर्भूत करण्यात आलं आहे. श्रीनगर इथं आज जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. पाच, बारा, अठरा आणि २८ टक्के हे जीएसटीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा जीएसटी मध्ये समावेश करण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटी प्रणाली ही ग्राहकांसाठी अनुकूल अशी तयार करण्यात आल्याचं ते म्हणाले. लक्झरी हॉटेल्सना २८ टक्के, वातानुकुलित उपहार गृहांना १८, तर साध्या उपहार गृहांना १२ टक्के सेवा कर लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जीएसटी परिषदेची पुढची बैठक येत्या तीन जुनला दिल्ली इथं होणार आहे. 

****

दरम्यान, वस्तु आणि सेवा कर - जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्य विधीमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन उद्यापासून मुंबई इथं सुरु होत आहे. या अधिवेशनात राज्य जीएसटी कायद्याच्या विधेयकासह, स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देण्याविषयीचं विधेयक आणि राज्यातले जुने संबंधित कायदे रद्दबातल करण्याविषयीचं विधेयकही, या अधिवेशनात पारित केलं जाणार आहे.

****

दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये ४० लाख कुटुंबांना मोफत वीज पुरवण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. विद्युतिकरणासाठी चार हजार ८१४ कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येईल, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं १५ मे पर्यंत १३ हजार ४६९ गावांचं विद्युतिकरण केलं असून, दारिद्र्यरेषेखालच्या ९ लाख ६२ हजार कुटुंबांना मोफत वीज जोडणी देण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली.

****

मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांसंबंधी बहुतांश राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेणार असून यावेळी मतदान यंत्रे आणि मतदान पावती यंत्रे अचूक असण्यासंदर्भात प्रात्यक्षिक दाखवणार आहे. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत मतदान यंत्रांना आव्हान देण्यासंदर्भातल्या तारखाही आयोगाकडून जाहीर केल्या जाणार आहेत. आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसस आदी पक्षांनी मतदान यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याच्या कारणावरून विरोध दर्शवला आहे. त्यावर आयोग हे प्रात्यक्षिक देणार आहे. भविष्यात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान पावती पर्याय उपलब्ध केला जाणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

****

जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीकपध्दतीचं नियोजन आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यात माण तालुक्यातल्या किरकसाल इथं जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी आज ग्रामस्थांसोबत श्रमदान केलं, त्यानंतर ते बोलत होते. किरकसाल गावानं अत्यंत दर्जेदार पध्दतीनं जलसंधारणाचं काम केलं असून, राज्यातल्या इतर गावांसाठी हे प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी दिली तर सरकारसोबत शिवसेना कायम असल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं शिवसेनेच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी ते आज बोलत होते. राज्यात यंदा विक्रमी तूर उत्पादन झालं, तरीही तूर आयात का करावी लागली, असं सवाल त्यांनी उपस्थित केला. या घोटाळ्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळेही फक्त शेतकऱ्यांचं नुकसान असून, त्याला शिवसेना विरोध करत असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर अभियान राबवणार असून, याअंतर्गत शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

अचानक उद्भवलेली परिस्थिती, जमाव किंवा समजुतदारपणाचा अभाव असणारे लोक यांच्याशी कसं वागावं, हे शिकवणारा अभ्यासक्रम महाराष्ट्र पोलिस आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राबवणार आहे. बऱ्याच वेळा कायदेशीदृष्ट्या योग्य असूनही पोलीसी कारवाईवर टीका होते, आणि पोलिसांची प्रतिमा मलीन होते, म्हणून हा भावनिक बुद्धीमत्तेचा अभ्यासक्रम राबवणार असल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक सतिश माथुर यांनी सांगितलं.     
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...