Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
मुंबईतल्या १९९३ साली झालेल्या
बॉम्बस्फोट प्रकरणी आज मुंबईच्या विशेष टाडा
न्यायालयात अबु सालेमसह सहा जणांवर निकाल सुनावण्यात येत आहे. कट रचल्याप्रकरणी, हत्या आणि दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी मुस्तफा डोसा याला दोषी ठरवण्यात
आलं आहे. तसंच फिरोज अब्दुल राशीद खान आणि ताहिर मर्चंट यांनाही दोषी ठरवण्यात आलं
आहे. मुंबईत १२ ठिकाणी झालेल्या हा बॉम्ब हल्ल्यात
१५७ जणांचा मृत्यू झाला, तर ७१३ जण जखमी झाले होते.
****
राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा करण्यासाठी
भाजप नेते राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली.
यावेळी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांची चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेते गुलाम नबी
आझाद आणि मल्लिकार्जुन खरगे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून कोणाच्याही नावाची शिफारस झाली नसल्याचं
गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष अमित शहा आजपासून तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून, आज सकाळी त्यांचं
मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या
उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत
शिवसेना स्वतंत्र भूमिका घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफी आणि मध्यावधी निवडणुकीसंदर्भातही या भेटीदरम्यान चर्चा
होण्याची शक्यता आहे.
****
वस्तु आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी ग्राहकांना सदनिकांचे
पूर्ण पैसे भरायला लावणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना सरकारनं चाप लावला आहे. कमी होणाऱ्या
कराचे लाभ ग्राहकांना कमी किमतीच्या किंवा कमी हफ्त्याच्या स्वरुपात पोहोचवावेत असं
सरकारचं म्हणणं असून, वस्तु आणि सेवा कर लागू झाल्यावर ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या
घरांच्या हफ्त्यावर ज्यादा दरानं कर आकारु नये, असंही सांगितलं आहे. अशा व्यवसायिकांवर
कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं सरकारनं बजावलं आहे.
****
आगामी पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी विशेष कायदा करण्याची मागणी मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सिताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे
केली आहे. पिकाचं आधारभूत मुल्य वाढवण्यासाठी शेतकरी सरकारवर अवलंबून राहू नये यासाठी
हा कायदा करण्यात यावा, अशी मागणी येचुरी यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. किमान आधारभूत मुल्य शेतकऱ्यांच्या खर्चाच्या ५० टक्क्यांपेक्षा
अधिक असावं, असंही ते म्हणाले.
****
आज आकाशवाणीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आहे. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आणि राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या
हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित
करण्यात येणार आहे. कार्यक्रमांची निर्मिती, बातम्या, व्यवस्थापन, श्रोता संशोधन आदी
बाबतीत आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या कल्पकतेचा आणि नैपुण्यतेचा गौरव करण्यासाठी
प्रसार भारतीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
****
सुशिक्षित तरुणांना व्यवसाय करण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग
विभागामार्फत सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत मृदु कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.
याअंतर्गत तरुणांना उद्योग व्यापारासाठी सहा टक्के सरळ व्याजानं कर्ज उपलब्ध करून देण्यात
येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असं आवाहन उद्योग विभागानं
केलं आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन उद्योगासाठी २५ लाख रूपये इतक्या प्रकल्प खर्च मर्यादेच्या
१५ टक्के आणि जास्तीत जास्त ३ लाख ७५ हजार एवढे मृदु कर्ज देण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम
कामगार कल्याणकारी मंडळातले नोंदीत बांधकाम कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून
असलेल्या कुटुंबियांना आता आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार
आणि त्यांच्या कुटुंबियांना ‘महात्मा ज्योतिबा फुले
जन आरोग्य योजना’ लागू करण्यात आल्याचं कामगार
मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांनी सांगितलं.
****
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरु
असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणय आणि के
श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. सायना नेहवाल आणि पी व्ही
सिंधूचा उपान्त्यपूर्व सामन्यात पराभव झाल्यानं या स्पर्धेतलं भारताचं महिला एकेरीतलं
आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी चिपळूण
बसस्थानकाच्या परिसरात केटामाइन नावाचा सुमारे अकरा किलो अंमली पदार्थ ताब्यात घेतला
असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत आठ कोटी ७७ लाख रुपये एवढी आहे. जिल्हा पोलीस
अधीक्षक प्रणय अशोक यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
//*******//
No comments:
Post a Comment