Monday, 19 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 19.06.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 June 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १९ जून २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       वस्तू आणि सेवा कर कायद्या अंतर्गत, उद्योजकांसाठी, कर विवरणपत्रं सादर करण्याचे नियम पहिल्या दोन महिन्यांसाठी शिथिल

·       भारतीय जनता पक्ष राष्ट्रपती पदाचा उमेदवार येत्या २३ जून पूर्वी जाहीर करणार

·       जागतिक हॉकी लीगमध्ये भारताची पाकिस्तानवर ७-१ अशी दणदणीत मात

·       इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या के.श्रीकांतनं पटकावलं पुरुष एकेरीचं विजेतेपद

आणि

·       नांदेड जिल्ह्यात एका बालकासह महिलेचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू; अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा

****

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं, उद्योजकांसाठीचे, कर विवरणपत्रं सादर करण्यासंदर्भातले नियम पहिल्या दोन महिन्यांसाठी शिथिल ठेवले आहेत. यानुसार उद्योजकांना जुलैच्या विक्रीची विवरणपत्रं आता दहा ऑगस्ट ऐवजी पाच सप्टेंबरपर्यंत आणि ऑगस्टची विवरणपत्रं दहा सप्टेंबर ऐवजी वीस सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या काल झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. लॉटरी तसंच हॉटेलवरचे कराचे दर काल निर्धारित करण्यात आले. सरकारी लॉटरीवर बारा टक्के तर शासनमान्य खाजगी लॉटरीवर अट्ठावीस टक्के कर, प्रतिदिवस साडेसात हजार रुपयांहून जास्त भाडं आकारणाऱ्या हॉटेल खोल्यांसाठी अट्ठावीस टक्के तर अडीच हजार ते साडेसात हजार रुपये भाडं आकारणाऱ्या हॉटेल खोल्यांसाठी अठरा टक्के इतका कर आकारला जाणार आहे.

****

भारतीय जनता पक्ष आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार येत्या २३ जून पूर्वी जाहीर करणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. येत्या १७ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपती निवडणूक, शेतकरी कर्जमाफी, सरकारी कर्मचारी संप या मुद्यांसह राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन मध्यावधी निवडणुकांबाबत ही चर्चा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारनं स्थापन केलेली मंत्रिमंडळ उच्चाधिकार समिती आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची आज मुंबईत बैठक होणार आहे. शेतकऱ्यांच्या थकित कर्जमाफीसंदर्भात निकष ठरवण्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. 

****

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचा कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. ते काल सोलापुर इथं बोलत होते. सरकारनं या कर्जवाटपाबाबत बँकांना निर्देश दिले आहेत, मात्र ज्या बँका आर्थिक परिस्थिती चांगली असूनही हे कर्ज देणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं देशमुख म्हणाले.

****

जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात पाणी पुरवठ्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकर्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय, या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यभरात सहा हजार दोनशे टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू होता, या वर्षी मे महिन्यात मात्र फक्त एक हजार दोनशे टँकर्सनेच पाणी पुरवठा करावा लागल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागलेल्या, लातूर जिल्ह्यातही जलयुक्त शिवारची कामं चांगली झाली असल्यानं जिल्ह्यात अनेक गावं टँकरमुक्त होऊ शकल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल पुणे शहरात दाखल झाल्या. शहरातले रस्ते वारकरी आणि भाविकांच्या गर्दीने भरून गेले आहेत. वारकऱ्यांचं स्वागत आणि सुविधासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.  उद्या या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.

****

दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेमध्येऔरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, अर्थात ऑरिक सिटीच्या बिडकीन परिसरातल्या कामाला येत्या तीन महिन्यात सुरूवात होणार आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार एकर परिसरात पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ऑरिक सिटीच्या पायाभूत सुविधांसाठी मंजूर केलेल्या सुमारे सहा हजार आठशे अट्ठ्यांऐशी कोटी रूपय निधीतून, तीन टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केलं जाणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्ताननं भारतावर १८० धावांनी विजय मिळवत चॅम्पियन्स चषक पटकावला  आहे. काल लंडन इथं झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी ३३९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, मात्र भारताचे फलंदाज ३१ व्या षटकांत १५८ धावांवर बाद झाले.

दरम्यान, पुढच्या वर्षी टी-ट्वेंटी विश्वचषक होणार नसल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं सांगितलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मालिकांची संख्या पाहता या विश्वचषकाचं आयोजन शक्य नसल्याचं परिषदेच्या सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता थेट २०२० मध्येच टी-ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन होणार आहे.

****

लंडन इथं सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतीय संघानं उपांत्य फेरीच्या काल झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर ७-१ अशी दणदणीत मात केली. भारताकडून हरमनप्रीत सिंग, तलविंदर सिंग आणि आकाशदीपसिंग यांनी प्रत्येकी दोन गोल तर प्रदीप मोरनं एक गोल केला.

****

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या के.श्रीकांतनं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जकार्ता इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं जपानच्या काजुमासा सकाईवर अवघ्या ३७ मिनिटांत दोन सरळ सेटमध्ये २१-११, २१-१९ असा विजय मिळवला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या वल्लूर इथं, पावसामुळे नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्यानं एक महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.

परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोनपेठ तालुक्यातला गोदावरी नदीवरचा खडका बंधारा शंभर टक्के भरला आहे. बंधाऱ्याच्या दहा दरवाजांपैकी एक दरवाजा उघडण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्यानं तेरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे या नदीवरच्या सहा बंधाऱ्यांची दारं उघडण्यात आली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात पाचोड परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. या भागातली अनेक घरं तसंच फळबागांना या वादळी वाऱ्याचा तडाखा बसला होता. 

****

राज्य शासनानं शेतकऱ्यांना ३० हजार कोटींची कर्जमाफी देऊन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं आहे असं प्रतिपादन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं. ते काल औरंगाबाद जिल्ह्या करमाड इथं एका कार्यक्रमात बोलत होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांचा विकास आणि समृध्दी हेच शासनाचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

रजू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठपुरावा करणार असल्याचं, पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शून्य टक्के व्याज दरानं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर अंमलबजावणी, आदी मागण्यांचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

//******//


No comments: